उन्हाळा संपून लवकरच सुरू होणाऱ्या पावसाचे वेध अनेकांना लागले आहेत. या काळात प्रत्येकाला सुखद वाटणारा असा पावसाळा हिरवाईने नटलेला असतो. अशा या पावसाळ्यात आपल्यापैकी अनेक जण निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे बेत आखतात. पावसाळ्यात, गड-किल्ल्यांवर फिरण्यासाठी जाणारे तसेच दुचाकीवरून दूरवरच्या सफरीवर जाणाऱ्या फिरस्त्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान पावसाळ्यात फिरताना पर्यटकाला मोबाइलवरून व्हिडीओ किंवा फोटो काढणे अनेकदा जिकरीचे जाते. अशावेळेस कामी येतो तो अद्ययावत यंत्रणा आणि हाताळण्यास साजेसा असणारा असा पाणीरोधक अ‍ॅक्शन कॅमेरा, या अशा कॅमेऱ्यांची बाजारात मोठी चलती असून अनेक जण छायाचित्रणाचा छंद जोपसण्यासाठी मोठय़ा डीएसएलआर कॅमेऱ्याऐवजी एका हातात माऊ शकेल अशा अ‍ॅक्शन कॅमेऱ्याची खरेदी करण्यास प्राधान्य देतात. बाजारात सुप्रसिद्ध असणाऱ्या अशा अ‍ॅक्शन कॅमेऱ्याविषयी जाणून घेऊयात..

डीजीआय पॉकेट ऑस्मो

सहज खिशात ठेवता येणारा आणि वापरण्यासाठी सोपा अशी डीजीआय पॉकेट ऑस्मोची ओळख आहे. आकाराने लहान असला तरी कॅमेऱ्याला योग्य ठिकाणी स्थिर ठेवणारे गिंम्बल उपकरण या कॅमेऱ्याला देण्यात आल्याने हा अ‍ॅक्शन कॅमेरा अधिक आकर्षक ठरतो. भटकंतीच्या चित्रफितींचे छायांकन करणाऱ्यांसाठी हा कॅमेरा उत्तम पर्याय ठरतो. १२ मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या डीजीआय पॉकेट ऑस्मोमध्ये ध्वनी मुंद्राकनही उत्तम होते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यू-टय़ुबवर थेट प्रक्षेपण करणाऱ्यांना हा कॅमेरा सहज हातात पकडता येत असल्याने छायांकन करत असताना आत्मविश्वास वाढतो.

किंमत – ३० हजारांपासून पुढे

डीजीआय ऑस्मो

स्थिर कॅमेऱ्याचा अनुभव देणारे हे उत्तम उपकरण आहे. अगदी कमी प्रकाशातही  डीजीआय ऑस्मोच्या साहाय्याने उत्तम छायांकनाचा अनुभव मिळतो. तसेच या उपकरणामार्फत छायांकन करताना कमी आवाजाचेही उत्तम मुद्रांकन होते. डीजीआय ऑस्मोला गोप्रोप्रमाणे ४ के रिझोल्युशनचे छायांकनही करता येते. डीजीआय ऑस्मोला भ्रमणध्वनी थेट जोडता येतो. या कॅमेऱ्याच्या साहाय्याने वेगात केलेले छायांकनही उत्तम दर्जाचे असते. सहज आणि वापरासाठी सोपा असणारा डीजीआय ऑस्मोच्या छायांकनातही रंगसंगती उत्तम असते. लहानतल्या लाहान छायाचित्रकारापासून ते व्यावसायिक छायाचित्रकार डीजीआय ऑस्मोचा छायांकनासाठी वापर करतात.

किंमत – १५ हजारांपासून पुढे.

कॅमेले आर १०० जीपीएस स्मार्ट कॅमेरा

सायकलस्वारी करतानाही छायांकन करण्याचा कल हल्ली वाढत आहे. अशा सर्व हौशी छायांकन करणाऱ्यांसाठी कॅमेले आर १०० जीपीएस स्मार्ट कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. तसेच या कॅमेऱ्यामध्ये जीपीएस देण्यात आल्याने लांबपल्ल्याच्या सायकलस्वारांना हा अधिक उपयोगाचा ठरतो. सायकलला जोडण्यासाठी या कॅमेऱ्याला मनगटी घडय़ाळाप्रमाणे व्यवस्था देण्यात आली आहे. तसेच या कॅमेऱ्यामध्ये ३२ जीबीपर्यंत साठवणुकीची क्षमता असून ८ तासापर्यंत बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. मात्र, हा कॅमेरा फक्त ऑनलाइन विविध वेबसाइटवरच उपलब्ध आहे.

किंमत – ६ हजारांपासून पुढे

गोप्रो अ‍ॅक्शन कॅमेरा

दुचाकीस्वार आणि गिर्यारोहक  भटकंती करताना सर्वाधिक गोप्रो अ‍ॅक्शन कॅमेराचा वापर करतात. हा कॅमेरा आकाराने छोटा असूनही या कॅमेऱ्याच्या साहाय्याने ४ के रिझोल्युशनचे छायांकनही करता येते. हा कॅमेरा ८ मेगापिक्सल, १२ मेगापिक्सल अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सायकल आणि दुचाकी चालवताना हा कॅमेरा सहज बसवता येतो. या कॅमेऱ्यामध्ये छायांकन केलेल्या चित्रफिती या थेट गोप्रो अ‍ॅपवर पाठवता येतात. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अंधारात १० मीटपर्यंत चित्रीकरण करता येते. चित्रीकरण करताना कॅमेऱ्याची हालचाल झाली तरी चित्रीकरण मात्र स्थिर राहते. तसेच हा कॅमेरा वॉटरप्रूफ असल्याने पावसाळ्यातही हा कॅमेरा वापरताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही.

किंमत – १२ हजारांपासून पुढे.

नॉईज प्ले अ‍ॅक्शन कॅमेरा

स्वस्त आणि मस्त असाणाऱ्या नॉईज प्ले अ‍ॅक्शन कॅमेराला १७० अंशाची वाईड अ‍ॅंगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच या कॅमेऱ्याला वायफायनेही जोडता येते. गोप्रो प्रमाणे हा अ‍ॅक्शन कॅमेराही वॉटरप्रूफ आहे. या कॅमेऱ्यामध्ये ६४ जीबीपर्यंतचे छायांकन साठवता येते. हा कॅमेरा १६ मेगापिक्सलचा असून दुचाकी चालवताना या कॅमेऱ्याने उत्तम छायांकन करता येते. तसेच या कॅमेऱ्याचेही इतर कॅमेऱ्याप्रमाणे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या कॅमेऱ्याला रिमोट कंट्रोल देण्यात आल्याने हा कॅमेरा वापरण्यास अतिशय सोपा आहे.

किंमत – ४ हजारांपासून पुढे

संकलन-  आशीष धनगर