स्मार्टवॉच ही वापरकर्त्यांची गरज बनत चालली आहे. आरोग्यविषयक तपशील मिळण्याच्या फायद्याखेरीज इतर अनेक वैशिष्टय़ांमुळे वेअरेबल डिव्हाइसेसच्या गटात स्मार्टवॉचला सध्या जास्त मागणी आहे. पण किंमत हा स्मार्टवॉच आणि वापरकर्त्यांमधील सर्वात मोठा अडथळा आहे. तो अडथळा वॉचआऊटया भारतीय कंपनीच्या स्मार्टवॉचने निश्चित दूर केला आहे.

सध्याच्या धावत्या जीवनशैलीत ‘स्मार्टवॉच’ हे अतिशय उपयुक्त उपकरण ठरत आहे. भारतीय बाजारात गेल्या दोनेक वर्षांत स्मार्टवॉचचा ग्राहकवर्ग तयार होऊ लागला आहे. मात्र, यातील मोठा ग्राहकवर्ग अ‍ॅप्पल, फॉसिल, गार्मिन अशा नामांकित पण महागडय़ा ब्रॅण्डशी जोडला गेलेला आहे. या महागडय़ा ब्रॅण्डखेरीज अनेक चिनी आणि भारतीय ब्रॅण्डचे स्मार्टवॉचही बाजारात उपलब्ध आहेत. अगदी पाचशे रुपयांपासूनचे स्मार्टवॉच सध्या ईकॉमर्स संकेतस्थळांवरून मिळतात. मात्र, किंमत कमी तर उपयुक्तताही कमी हे समीकरण या स्वस्त स्मार्टवॉचच्या बाबतीत दिसून येते. याला अपवाद ठरू शकतो तो ‘वॉचआऊट’चा. ‘वॉचआऊट’ या भारतीय कंपनीचे स्मार्टवॉच अनेक बाबतीत वैशिष्टय़पूर्ण आहे, असे म्हणता येईल. सहा हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेले हे स्मार्टवॉच म्हणजे कमी किमतीत उच्च दर्जाची वैशिष्टय़े पुरवणारे उपकरण आहे.

डिझाइन

‘वॉचआऊट’चे स्मार्टवॉच दुरूनही लक्ष वेधून घेणारे आहे. कमी किमतीतील स्मार्टवॉचमध्ये डिझाइन अथवा लूक या गोष्टींना फाटा देण्यात येतो. त्यामुळेच त्याची किंमत आटोक्यात ठेवता येते. मात्र, ‘वॉचआऊट’ने ही परंपरा खंडित केली आहे, असे म्हणता येईल. कोणत्याही मोठय़ा ब्रॅण्डेड स्मार्टवॉचशी तुलना करता येईल, इतका सफाईदार आणि आकर्षक ‘लुक’ या स्मार्टवॉचचा आहे. पूर्णपणे काळय़ा रंगात असलेल्या या स्मार्टवॉचची बॉडी ‘झिंकअ‍ॅलॉय’मध्ये घडवलेली आहे. तिचा फिनिश अतिशय चमकदार आहे. स्मार्टवॉच म्हटले की, मनगटाला पूर्णपणे व्यापून टाकणारी आयताकृती घडय़ाळे नजरेसमोर येतात. परंतु ‘वॉचआऊट’चे स्मार्टवॉच हे गोल आकाराचे आहे. गोल आकारामुळे पारंपरिक घडय़ाळांचा लुक आणि कम्फर्ट हे स्मार्टवॉच परिधान केल्यानंतही जाणवतो.

या स्मार्टवॉचच्या उजवीकडे पारंपरिक घडय़ाळात असते त्यासारखी छोटी कळ आहे. ही कळ अर्थात बटण ‘मल्टिफंक्शनल’ असून त्याद्वारे स्मार्टवॉच चालू-बंद करणे, लॉक-अनलॉक करणे आदी गोष्टी करता येतात. वॉचच्या मागच्या बाजूस स्पीकर, चार्जिग पॉइंट आणि ‘हार्टबिट’ मोजण्यासाठीचा सेन्सर पुरवण्यात आला आहे. या गोष्टी वगळता स्मार्टवॉचवर अन्य कोणत्याही गोष्टी नाहीत.

नोटिफिकेशन

ब्लूटुथद्वारे स्मार्टफोनशी जोडल्यानंतर स्मार्टवॉचवर लगेच विविध अ‍ॅपचे नोटिफिकेशन दर्शवण्यास सुरुवात होते. तुम्ही ठरावीक अ‍ॅपच्या नोटिफिकेशनचा पर्याय निवडू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक किंवा टेकमेड हे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागतील. या अ‍ॅपबाबत स्मार्टवॉचच्या बॉक्समध्ये स्वतंत्रपणे तपशील देण्यात आलेला आहे. स्मार्टवॉचवर येणारे नोटिफिकेशन एका ओळीचे असतात. उदाहरणार्थ व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या एखादा संदेश तुम्हाला स्मार्टवॉचवर पूर्णपणे वाचता येणार नाही. त्याची पहिली ओळ तुम्हाला पाहता येईल. याखेरीज स्मार्टफोनवर आलेले कॉल, ई-मेल यांचेही नोटिफिकेशन हे स्मार्टवॉच व्यवस्थितपणे दाखवते.

आरोग्यविषयक वैशिष्टय़े

या स्मार्टवॉचमध्ये पेडोमीटर, हार्टरेट मॉनिटर, सेडनटरी रिमाइंडर, स्लीप मॉनिटर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. पेडोमीटरद्वारे तुम्ही दिवसभरात किती पावले चालला, याचा तपशील नोंदवला जातो. हा तपशील ९० टक्के वेळा अचूक असल्याचे आम्हाला आढळून आले. ‘हार्टरेट मॉनिटर’ हा या स्मार्टवॉचचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सहा हजार रुपयांपेक्षा खालील किमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉचमध्ये अभावानेच हार्टरेट मॉनिटरची सुविधा दिली जाते. मात्र, या वॉचमध्ये ती सुविधा पुरवण्यात आली असून ती अतिशय व्यवस्थितपणे आपले काम करते. यात एकदाच हार्टरेट मोजण्याची सुविधा आहेच; पण त्यासोबत सातत्याने हार्टरेट मोजण्याचीही सुविधा आहे. याशिवार ‘स्लीप मॉनिटर’द्वारे तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळांची नोंद ठेवू शकता. त्याचप्रमाणे ‘सेडनटरी रिमाइंडर’ तुम्हाला झोपेपासून परावृत्त करण्याचे काम करतो. ही सर्व आरोग्यविषयक वैशिष्टय़े अतिशय उत्तमपणे काम करत असल्याचे दिसून आले.

मेमरी

या स्मार्टवॉचमध्ये १२८ एमबी + ६४एमबी मेमरी पुरवण्यात आली आहे. याबाबतीत ‘वॉचआऊट’ने काटकसर केल्याचे जाणवते. जास्त मेमरी नसल्याने स्मार्टवॉचमध्ये नवीन अ‍ॅप्स इन्स्टॉल करणे कठीण होते. तसे पाहता या स्मार्टवॉचच्या डिजिटल क्लॉकसाठी कंपनीने अनेक ‘स्कीन’ आपल्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिल्या आहेत. या ‘स्कीन’च्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळय़ा रंगातील घडय़ाळाच्या डिझाइन स्मार्टवॉचवर लावता येतात. पण मेमरी कमी असल्यामुळे तुम्ही चारपेक्षा अधिक स्कीन वापरू शकत नाही.

अन्य वैशिष्टय़े

स्मार्टवॉचमध्ये स्वतंत्र कॅमेरा पुरवण्यात आलेला नाही. मात्र, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा या वॉचद्वारे हाताळू शकता. अर्थात कॅमेरा तितक्या वेगाने हाताळता येत नसल्याचे आम्हाला आढळून आले. परंतु फोकस केलेल्या भागाचे छायाचित्र क्लिक करण्यात स्मार्टवॉचचे कॅमेरा अ‍ॅप अजिबात कसूर करत नाही. या स्मार्टवॉचद्वारे तुम्ही स्मार्टफोनमधील गाणी वाजवू शकता आणि ती हाताळूही शकता. स्मार्टवॉचचे स्पीकर सुस्पष्टपणे काम करतात. याखेरीज यामध्ये फोन कॉल करण्याची व बोलण्याचीही सुविधा पुरवण्यात आली आहे.

मॅग्नेटिक चार्जिग

या स्मार्टवॉचमध्ये ३०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली असून ती साधारणपणे एक दिवस चालते. बॅटरी चार्ज करण्यासाठी चुंबकीय पीनची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. अर्थात तुम्ही यूएसबीद्वारे चार्जर कनेक्ट केल्यानंतर त्याच्या पिनवरील चुंबक स्मार्टवॉचच्या मागील भागात असलेल्या सर्किटवर चिकटून चार्जिग सुरू करतो. ही व्यवस्था नवीन आणि रंजक असली तरी, ती काहीशी गैरसोयीची आहे. अनेकदा चार्जिग होत असताना स्मार्टवॉच जरासे हलले तरी चार्जर निसटत असल्याचे आम्हाला आढळून आले.

पट्टा

‘वॉचआऊट’चे स्मार्टवॉच दोन प्रकारांत उपलब्ध आहेत. यापैकी एकात घडय़ाळाचा पट्टा संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलने बनवलेला मात्र काळय़ा रंगाचा आहे. तर दुसऱ्यात चामडय़ाने बनवलेला पट्टा आहे. आमच्याकडे परीक्षणासाठी आलेल्या ‘स्मार्टवॉच’मध्ये स्टेनलेस स्टीलचा पट्टा होता. त्यावर ‘रेट्रो इंटरलॉक’ पद्धतीने छोटय़ा छोटय़ा पट्टय़ा एकमेकींशी जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा पट्टा अतिशय सुंदर दिसतो. मात्र, धातूमुळे स्मार्टवॉच काहीसे जड झाले आहे. मात्र, चामडय़ाचा पट्टा असलेल्या स्मार्टवॉचमध्ये वापरकर्त्यांना आकर्षक प्रकार उपलब्ध आहेत. काळय़ा रंगाचा ‘ब्लॅक पँथर’, शेवाळी रंगाचा ‘किलर क्रोको’, तपकिरी रंगाचा ‘ब्राऊन बिस्ट’ अशा आकर्षक रंगांतले पट्टेही या स्मार्टवॉचसाठी उपलब्ध आहेत.

व्यवस्था

‘वॉचआऊट’च्या स्मार्टवॉचचा डिस्प्ले हा १.२२ इंच आकाराचा आयपीएस स्क्रीनने बनलेला आहे. डिस्प्ले अतिशय स्पष्ट असून त्यात उमटणारी अक्षरे आणि रंग दोन्हीही अतिशय सुस्पष्ट दिसतात. टचस्क्रीन असल्याने स्क्रीनवर बोटे फिरतात. मात्र, मऊ कापडाने पुसताच स्क्रीन पूर्णपणे स्वच्छ झाल्याचे आम्हाला दिसून आले. स्मार्टवॉचची स्क्रीन ‘वॉटरप्रूफ’ असल्याने पाणी पडल्यानेही त्याचे नुकसान होत नाही. यामध्ये ब्ल्यूटुथ ४.० पुरवण्यात आले असून त्याद्वारे कोणत्याही स्मार्टफोनशी वॉच जोडता येते. अँड्रॉइड फोनवर वॉच पटकन कनेक्ट झाल्याचे दिसून आले. मात्र, आयफोनवर आम्हाला कनेक्टिव्हीटीमध्ये थोडासा विलंब लागला. स्मार्टवॉच स्मार्टफोनशी जोडण्यासाठी वॉचच्या ब्लूटुथमधून जोडणी करावी, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यानुसार वॉच पटकन स्मार्टफोनशी जोडला जातो. ब्लूटुथ कनेक्टिव्हीटी अतिशय व्यवस्थित असून अगदी दहा मीटरच्या परिघात स्मार्टफोनशी वॉच संलग्न रहात असल्याचे आढळून आले. काही कारणाने फोन डिस्कनेक्ट झाल्यास स्मार्टवॉचकडून लगेच अ‍ॅलर्ट देण्यात येतो.