07 December 2019

News Flash

व्हिंटेज वॉर : वाफेवर चालणारी मोटार

पर्यावरणाच्या आणि संभाव्य इंधन तुटवडय़ाच्या समस्येवर तोडगा म्हणून सध्या इलेक्ट्रिक कारकडे पाहिले जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

मोटार निर्मिती क्षेत्र पहिल्या काही दशकांमध्ये अत्यंत प्रयोगशील होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक मोटार, आणि वाफेच्या इंजिनवर चालणाऱ्या मोटारी उत्पादित केल्या जात होत्या. या गाडय़ा अंतर्गत ज्वलन इंजिनवर चालणाऱ्या मोटारीच्या तुलनेत हाताळण्यास कठीण होत्या, त्याचप्रमाणे त्यांचा वेगदेखील कमी होता. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला वाफेचे इंजिन असणारी वाहने मोठय़ा प्रमाणात वापरली जात होती. वाफेवर चालणाऱ्या मोटारींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये डोबल हे एक प्रतिष्ठित नाव होतं. जवळपास दोन दशके वाफेच्या इंजिनवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या डोबल या कंपनीचा चाहता वर्ग मोठा होता.

पर्यावरणाच्या आणि संभाव्य इंधन तुटवडय़ाच्या समस्येवर तोडगा म्हणून सध्या इलेक्ट्रिक कारकडे पाहिले जात आहे.  हायड्रोजन कारचाही पर्याय संशोधकांकडून चाचपून पाहिला जात आहे. अशा वेळी पारंपरिक इंधनाचा एक सक्षम आणि व्यवहार्य पर्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत मोटार विश्व आहे. १९ व्या शतकात वाफेच्या इंजिनवर चालणाऱ्या मोटारींची निर्मिती केली जात होती. मात्र हा पर्यावरण रक्षणाचा उपाय नव्हता. तर त्या काळी मोटारजगतावर वाफेच्या इंजिनची मक्तेदारी होती. या काळात वाफेच्या इंजिनवर चालणाऱ्या गाडीचादेखील प्रयोग करण्यात आला आणि हा प्रयोग काही अंशी यशस्वीदेखील झाला होता. अमेरिकी कार उत्पादक कंपनी डोबल कारने १९०९ ते १९३१ पर्यंत वाफेच्या इंजिनवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती केली होती. या गाडय़ांमध्ये काळानुरूप बदलदेखील होत गेले. १९२५ ‘डोबल ई-२०’ या गाडीला जगातील सर्वोत्तम वाफेवर चालणारी मोटार म्हणून संबोधले जाते. त्या काळातील इतर वाफेवर चालणाऱ्या मोटारींच्या तुलनेत ही गाडी क्रांतिकारी होती. यापूर्वीच्या गाडय़ांना सुरू केल्यानंतर त्यात वाफ तयार होण्यासाठी १०-१५ मिनिटांचा कालावधी लागायचा.  एकदा वाफेचा दाब तयार होऊ  लागला की त्यांनतर त्या गाडय़ा चालवण्यासाठी तयार व्हायच्या. पण ‘डोबल ई-२०’ ही तुलनेने बरीच प्रगत आणि हाताळण्यास सोपी होती.

डोबलची ई शृंखला वाफेच्या इंजिनवर चालणाऱ्या इतर वाहनांच्या तुलनेत अतिशय सक्षम होती. या गाडीत पाण्याची २४ गॅलनची टाकी होती. या ‘इंधना’वर ही गाडी २,४०० किमी प्रवास करते असा कंपनीचा दावा होता. पण ही गाडी जास्तीतजास्त २०० ते ३०० मैल प्रवास करायची, मग पुन्हा पाणी भरावे लागायचे. अमेरिकेच्या थंडीतदेखील ही ३० सेकंदात सुरू व्हायची. वाफेचे इंजिन असणाऱ्या इतर गाडय़ांच्या तुलनेत ही गाडी हाताळण्यास खूप सोपी होती. एकदा इंजिन गरम झाले की ही गाडी १४० किमी प्रतितास एवढा वेग गाठत असे. ई-सिरीज ही वेगाच्या बाबतीतही दमदार होती. शून्य ते १२१ किमी प्रतितास हा वेग गाठण्यासाठी या गाडीला केवळ १० सेकंदांचा अवधी लागायचा. ११० च्या वेगावर हे गाडी चालवताना कंपन जाणवायचे असे तज्ज्ञांचे मत आहे. मोटार चाहत्यांनी आजही काही डोबल सुस्थितीत जतन करून ठेवल्या आहेत.  गाडीला वाफेतून ताकद मिळत असल्याने या गाडीत क्लच आणि गिअरबॉक्स नव्हते. वाफेचा दाब जेवढा वाढायचा तेवढय़ा वेगाने ही गाडी पळवता यायची. आज कागदावर हे आकडे जरी अतिशय प्रभावी वाटत असले, तरी प्रत्यक्षात वाहन चालवताना तिच्या अनेक उणिवा ठळकपणे स्पष्ट व्हायच्या.  वाफेच्या इंजिनवर चालणारी ही गाडी बरीच विचित्र होती. गाडी सुरू करण्याची प्रक्रियाच ही १३ टप्प्यांची होती. १९२३ मध्ये या गाडीची किंमत ८ ते ११ हजार डॉलरच्या दरम्यान होती. १९२२ ते १९२५ दरम्यान २४ ई-मॉडेलचे उत्पादन करण्यात आले.

वाफेच्या इंजिनवर चालणारी डोबलची रचना इतर गाडय़ांसारखीच होती. ही गाडी विकत घेण्यासाठी मोठी किंमत ग्राहकांना मोजावी लागत होती. १९२५ मध्ये जेव्हा फोर्ड २६० डॉलरला गाडी विकत होते, तेव्हा या गाडीची किंमत हजारो डॉलरच्या घरात होती. १९२५ पर्यंत वाफेच्या इंजिनचा काळ संपला होता. वाफेच्या इंजिनच्या सुवर्णकाळाची ही गाडी शेवटची प्रतिनिधी असावी. यात रोडस्टरपासून लिमोजीन या प्रकारचादेखील समावेश होता. उद्योजक आणि चित्रपट निर्माते हावर्ड ह्यूज आणि भरतपूरचे महाराज डोबलच्या अनेक मालकांपैकी एक होते. सध्या ९ डोबल कार अस्तित्वात आहेत. वाफेच्या इंजिनच्या मर्यादा असूनही एक दमदार मोटार असलेल्या डोबलचा इतिहास काहीसा दुर्लक्षित राहिला आहे.

First Published on November 2, 2019 12:12 am

Web Title: article on steam motor car abn 97
Just Now!
X