रणरणते ऊन आणि घामाच्या धारा, अशा स्थितीत ट्रेकर्ससुद्धा दुर्गम गडांवर जाणे टाळतात. किल्लय़ांवर पाण्याचे दुर्भिक्ष असते आणि पावलापावलावर शारीरिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे बहुतेक ट्रेकर्स कमी श्रमाच्या आणि त्यातल्या त्यात गारवा देणाऱ्या गडांवर जातात. भटकंतीत खंड मात्र पडून देत नाहीत. तरीही गिरीप्रेमींच्या साहसाला, दुर्गभ्रमंतीला या काळात काहीशा मर्यादा येतात. शाळा-महाविद्यालयांच्याही सुट्टय़ा सुरू झालेल्या असतात. सर्वानाच ही भटकंतीची संधी साधायची असते, मात्र पर्यटनावरही मर्यादा येतात. अशा स्थितीत कुठे जाता येईल, यावर एक दृष्टिक्षेप..

वनदुर्ग

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक दुर्गप्रेमी वनदुर्गाचा पर्याय निवडतात. घनदाट अरण्यात असलेले दुर्ग म्हणजे वनदुर्ग. तिथे अरण्यवाचन आणि दुर्गदर्शन असा दुहेरी बोनस मिळतो. गर्द वनराईमुळे उन्हाच्या झळाही कमी लागतात. त्यामुळे भटकंतीही सुसह्य़ होते. व्यवस्थित नियोजन केल्यास कमी श्रमांत हे किल्ले पाहता येऊ  शकतात. पुणे जिल्ह्य़ाच्या मुळशी तालुक्यात अगदी घाटमाथ्यावर असणारा घनगड, सदाहरित वृक्षवल्ली आणि वन्यजीवनाने समृद्ध असलेल्या कोयना अभयारण्यातील जंगली जयगड व वासोटा, चांदोली अभयारण्याच्या पदराआड लपलेला प्रचितगड, जावळीच्या खोऱ्यातील मधू-मकरंद गड आदी किल्ले यात मोडतात. वनदुर्गावर फिरताना आवश्यकतेनुसार स्थानिक प्रशासन तसेच वनखात्याची परवानगी घेणे गरजेचे आहे.

जंगले-अभयारण्ये

सह्य़ाद्रीच्या कुशीत असलेली जंगले-अभयारण्ये हा तास डोंगर भटक्यांच्या आवडीचा विषय. केवळ डोंगर भटकेच या जंगलांच्या वाटेवर येतात असे नाही, तर अरण्यवाचनाची आवड असणारे, पशू-पक्षी निरीक्षण करणारे, जीवसृष्टीचा अभ्यास करणारे, जंगल वाटांवर आनंद वेचणारे अनेकजण तिथे भेटतात. डोंगरांनी वेढलेल्या गर्द रानांतील विश्व आवर्जून अनुभवावे असेच असते. भीमाशंकरचे अभयारण्य, चांदोली, कोयना, नगर जिल्ह्य़ातील रेहेकुरी, चाळीसगावजवळचे गौताळा, कोल्हापूरचे राधानगरी अभयारण्य, पुणे जिल्ह्य़ातील मावळ तालुक्यातली अजिवली देवराई पाहण्यासारखी आहे. अशा अभयारण्यात फिरताना वनखात्याची पूर्व-परवानगी घेणे आवश्यक ठरते. पर्यटक म्हणून वावरताना जंगलास कोणत्याही प्रकारची हानी होईल असे वागणे कटाक्षाने टाळावे.

प्राचीन मंदिरे

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांत आणि सह्य़ाद्रीच्या कुशीत असलेली प्राचीन मंदिरे पाहणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. शेकडो वर्षांपूर्वी निर्माण केलेली ही मंदिरे हे महाराष्ट्राला पडलेले स्वप्नच आहे. सातारा जिल्ह्य़ातील पाटेश्वराचे शिवमंदिर, सिन्नरजवळचे गोंदेश्वर, पोलादपूर-वाई घाटवाटेवरचे श्रीरामवरदायिनी, पुणे जिल्ह्य़ातील सोलापूर महामार्गावरील यवतजवळील भुलेश्वर मंदिर, भंडारदरा धरणाच्या सान्निध्यातले अमृतेश्वर मंदिर ही मंदिरे आवर्जून पाहावीत, अशी आहेत. इथे इतिहास, वास्तुकलेचा वारसा अनुभवता येतो. यातील बहुतेक मंदिरे दगडी बांधणीची असल्यामुळे तिथे बाहेर उन्हाच्या झळा लागत असतानाही गारवा अनुभवता येतो.

सह्य़ाद्रीच्या लेण्या

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची यादी तयार केली तर कातळात खोदलेल्या लेण्या अग्रस्थानी राहतील यात शंकाच नाही. मानवाची अजोड निर्मिती म्हणजे या लेण्या. या कातळकोरीव लेण्या पाहणे हा एक आनंदयोग ठरतो. आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या लेण्या पाहण्यासाठी इतिहास संशोधक, विद्यार्थी कायमच अशा ठिकाणांना भेट देतात. एखाद्या अभ्यासकासह अशा लेण्या पाहायला गेल्यास त्यांचे भौगोलिक स्थान, भोवतालचा निसर्ग, कलाकुसर, तिथे नांदणारी शांतता यामुळे कोणत्याही वयाचा आणि कोणत्याही आवडी-निवडी असलेला पर्यटक या सहलीचा आनंद घेऊ शकतो. बहुतेक लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतजवळील मावळ तालुक्यातील बेडसे लेणी, अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेरजवळची टाकळी-ढोकेश्वर लेणी, पुणे जिल्ह्यातील शिवनेरीच्या मागील बाजूची जुन्नरची तुळजा लेणी, सातारा जिल्ह्य़ातील शिरवळ येथील लयणगिरी आदी अपरिचित लेण्या आपल्याला हा अनुभव मिळवून देतात.

उन्हात फिरताना घेण्याची काळजी

उन्हाळ्यात गड-किल्ले-लेणी फिरताना विशेष काळजी घ्यावी लागते. सोबत पुरेसे पाणी बाळगणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच गडांवरील टाक्यांमध्ये पाणी नसते. डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल आणि संपूर्ण अंग झाकले जाईल, असे सुती कपडे परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने उन्हाळ्यात भटकंती केल्यास ती नक्कीच आनंददायी ठरेल.

– ओंकार वर्तले

ovartale@gmail.com