12 November 2019

News Flash

‘टिकटॉक’ची खबरदारी

या अ‍ॅपमध्ये १३ वर्षांखालील मुलांना नोंदणी करता येत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

सध्या भारतात ‘टिकटॉक’ हे अ‍ॅप प्रचंड गाजत आहे. वापरकर्त्यांना त्यांचे कलागुण दाखवणारे व्हिडीओ शेअर करण्यासाठी व्यासपीठ देणाऱ्या ‘टिकटॉक’वर भारतीयांच्या उडय़ा पडत आहेत. तरुणवर्गासोबतच लहान मुले आणि वयोवृद्धही या अ‍ॅपच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. अल्पावधीतच भारतात जवळपास २० कोटींहून अधिक वापरकर्ते कमवणाऱ्या या अ‍ॅपच्या एकूण वापरकर्त्यांच्या संख्येत भारतीयांचा वाटा जवळपास निम्मा इतका आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संवाद, गाणी, नृत्य यांची नक्कल करून स्वत:चे अभिनयगुण दाखवण्यासाठी ‘टिकटॉक’ला पसंती मिळत असली तरी त्यामुळे स्वैराचार वाढत असल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. विशेषत: या अ‍ॅपवरील अंगप्रदर्शन, हिंसक दृश्ये आणि अश्लील संवाद यांचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्यावरून या अ‍ॅपवर बंदीची मागणी तीव्र करण्यात आली आहे. मध्यंतरी या अ‍ॅपवर न्यायालयानेही बंदी आणली होती. या पाश्र्वभूमीवर ‘टिकटॉक’ निर्मात्या ‘बाइटडान्स’ या कंपनीने अ‍ॅपमध्ये सुरक्षेसंदर्भातील अनेक बदल केले आहेत.

‘टिकटॉक वापरकर्त्यांनी सर्जनशीलता दाखवावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मात्र, समाजातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतील, अशा कोणत्याही गोष्टी अथवा व्हिडीओंना आम्ही प्रोत्साहन देणार नाही,’ असे कंपनीने म्हटले आहे. एकीकडे अ‍ॅपची सुरक्षितता चांगली करण्यासाठी कंपनीने पावले उचलली असतानाच या वर्षअखेरीपर्यंत भारतातील ‘बाइटडान्स’च्या एक हजार कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचारी वर्ग केवळ ‘कंटेन्ट’ तपासणीच्या कामाला लावण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

‘टिकटॉक’वरील सुरक्षिततेसाठी..

* या अ‍ॅपमध्ये १३ वर्षांखालील मुलांना नोंदणी करता येत नाही. अ‍ॅपमध्ये ‘एज गेट’ वैशिष्टय़ाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे १३ वर्षांखालील मुलांना अ‍ॅपवर थेट व्हिडीओ शेअर करता येत नाहीत.

*   या अ‍ॅपमध्ये ‘पॅरेंटल कंट्रोल’ची सुविधा देण्यात आली असून त्यात ‘स्क्रीन टाइम मॅनेजमेंट’ आणि ‘रिस्ट्रिक्टेड मोड’ या दोन्हींचा मिलाफ साधण्यात आला आहे. या अ‍ॅपमध्ये ही सुविधा ‘डिजिटल वेल बीइंग’ या नावाने ओळखली जाते. या सुविधेच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांनी किती वेळ टिकटॉक पाहावे, याची वेळ निश्चित करू शकता. तसेच अश्लील, हिंसक किंवा आक्षेपार्ह व्हिडीओ पाहण्यापासून त्यांना रोखण्याची सुविधाही अ‍ॅपमध्ये आहे. यासाठी पासवर्ड टाकता येतो. ‘स्क्रीन टाइम मॅनेजमेंट’मध्ये पालक ४०, ६०, ९० किंवा १२० मिनिटांची वेळमर्यादा निर्धारित करून मुलांना या अ‍ॅपचा अधिक वापर करण्यापासून रोखू शकतात.

* टिकटॉकवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या साहसी कसरती किंवा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सशी संबंधित व्हिडीओखाली धोक्याची सूचनाही जोडण्यात आली आहे.

* वापरकर्त्यांकडून शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया येतात. हा प्रकार टाळण्यासाठी वापरकर्ते व्हिडीओ शेअर करतानाच त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची चाळणी ठरवू शकतात. त्यासाठी त्यांना ३० ‘कीवर्ड’ पुरवावे लागतात. हे कीवर्ड पुरवल्यानंतर संबंधित शब्दांचा वापर असलेल्या आक्षेपार्ह प्रतिक्रिया कोणालाही करता येणार नाही.

* वापरकर्त्यांना ऑनलाइन सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी ‘टिकटॉक सिक्युरिटी सेंटर’ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळावरून विविध भारतीय भाषांत टिकटॉकची आणि त्यावरील सुरक्षा उपायांची माहिती पुरवली जाते.

First Published on June 20, 2019 12:16 am

Web Title: article on tic talk caution