14 October 2019

News Flash

व्हिंटेज वॉर : ‘अ‍ॅम्बेसेडर’चा काळ

पक्की भारतीय वाटणाऱ्या अ‍ॅम्बेसेडरचा जन्म ब्रिटनमध्ये झाला.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

नव्या पिढीचा अपवाद सोडला तर बहुतांश भारतीयांना हिंदुस्थान अ‍ॅम्बेसेडर ही गाडी माहिती आहे. भारतीय मोटार इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या गाडीने देशातील मोटार क्षेत्रावर एकेकाळी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांनीदेखील या गाडीला विशेष पसंती दिली. इतकी की अ‍ॅम्बेसेडर दिसली की राजकीय नेताच येणार आहे, अशी लोकांना समजूत व्हायची. पण बऱ्याच जणांच्या या गाडीशी बालपणाच्या आठवणीदेखील जुळल्या आहेत. कुणाच्या घरात पहिली गाडी म्हणून दाखल झालेली अ‍ॅम्बेसेडर, तर प्रथम ज्या गाडीत आपण बसलो ती अ‍ॅम्बेसेडर अशा अनेक अनुभवांमुळे ही गाडी अनेकांशी जोडली गेली आहे.  पक्की भारतीय वाटणाऱ्या अ‍ॅम्बेसेडरचा जन्म ब्रिटनमध्ये झाला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सी. के. बिर्ला ग्रुपने ‘हिंदुस्थान मोटर्स’ची स्थापना केली. ऑक्सफर्डमधल्या मॉरिस मोटर लिमिटेडच्या मॉरिस ऑक्सफर्ड सिरिज थ्री या गाडीला तेव्हा लोकप्रियता मिळत होती. बिर्ला समूहाने मॉरिस मोटारीच्या सहयोगाने मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज थ्री या मॉडेलवर आधारित कार भारतात निर्माण करायचे ठरवले आणि अ‍ॅम्बेसेडरचा जन्म झाला. ब्रिटनशी अशा प्रकारे नाळ जोडली असली तरी भारतीयांचा विचार करूनच तिचे भारतात उत्पादन करण्यात आले.

१९५८ मध्ये अ‍ॅम्बेसेडर एम के १ ही बाजारात दाखल करण्यात आली. परंतु या गाडीचे अ‍ॅम्बेसेडर म्हणून नामकरण करण्यात आले.  १९५८ ते १९६२ पर्यंत या गाडीचे उत्पादन सुरू होते. त्यानंतर १९६२ ते १९७५ दरम्यान एम के २ दाखल झाली. त्यांनर येणाऱ्या प्रत्येक नवीन संस्करणात छोटे छोटे बदल करण्यात येत होते.

भारतीय रस्ते आणि भारतीय ग्राहकांची नस या गाडीने अचूक पकडली होती. दमदार इंजिन, दणकट बॉडी, आणि ऐसपैस जागा यामुळे ही भारतीयांची आवडती गाडी बनली. अ‍ॅम्बेसेडरच्या चाहत्यांनी तिचे ‘अँबी’ असे  नामकरण केले. दणकट बॉडी आणि सुरक्षित असल्याकारणाने असावे बहुतेक; पण राजकारणी या गाडीच्या प्रेमात पडले. आणि या गाडीवर लालबत्तीचा मुकूट चढवला गेला. राष्ट्रपतींपासून ते नगरसेवक, शासकीय अधिकारी सर्वानी या गाडीला पसंती  दिली. ७० आणि ८० च्या दशकात अ‍ॅम्बेसेडरने कर्नाटक १००० रेसिंग आणि हिमालयन रॅलीमध्येही भाग घेतला. एश्वर्याचं प्रतीक झालेली ही अ‍ॅम्बेसेडर नंतरच्या काळात टॅक्सी म्हणून देखील  रस्त्यांवर धावायची म्हणून सर्वसामान्यांशी देखील तिचे ऋणानुबंध जुळले.      नवीन गाडय़ा बाजारात यायला सुरुवात झाल्यानंतर गाडीच्या याच जमेच्या बाजू तिच्या मोठय़ा उणीव ठरल्या आधीचा मोठा भक्कम आकार नव्या ग्राहकांना फुगीर आणि अवाजवी मोठा वाटू लागला.

छोटय़ा गाडय़ांनी कार बाजारात लोकप्रियता मिळवली आणि काळाच्या ओघात ग्राहकांच्या गरज बदलू लागल्या. मागणी बंद झाल्याने २००४ रोजी   अ‍ॅम्बेसेडरचे उत्पादन बंद करण्यात आले.  एक काळ असा होता जेव्हा अ‍ॅम्बेसेडर बुक केल्यानंतर तिच्या डिलिव्हरीसाठी एक वर्ष वाट पाहावी लागत होती. परंतु १९८० दरम्यान मारुतीने ८०० सीसी इंजिनची गाडी बाजारात उतरवली. मारुतीच्या गाडीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. १९९०नंतर भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली झाल्यानंतर नवे खेळाडू मैदानात आले. लोकांनी वेगवेगळ्या गाडय़ांचे मॉडेल विकत घेण्यास सुरुवात केली. बदलत्या काळानुसार अ‍ॅम्बेसेडरमध्ये आवश्यक बदल करण्यात आले नाही. जेव्हा जास्त गाडय़ा भारतीय बाजारात आल्या तेव्हा या बाजाराचे गाडीनुसार वर्गीकरण झाले. परंतु अ‍ॅम्बेसेडरला कोणत्या श्रेणीत बसवावे ही समस्या निर्माण झाली हॅचबॅकसाठी या गाडीचा आकार मोठा होता तर एसयूव्ही म्हणण्यासाठी ही गाडी आकाराने लहान पडत होती. ९०च्या दशकांनंतर अ‍ॅम्बेसेडर केवळ टॅक्सी म्हणूनच जास्त नजरेस पडत होती. पण आजही अ‍ॅम्बेसेडर म्हटले की तोच राजेशाही दिमाख डोळ्यासमोर येतो. क्वचित रस्त्यावर एखाद वेळी हा गतकाळचा शाही सदस्य दिसला की नजरा नकळत वळतात.

First Published on May 25, 2019 12:08 am

Web Title: article on time of assembler