आशुतोष बापट

* उन्हाळ्यात पर्यटनासाठी हिमालय किंवा थंड हवेची ठिकाणे निवडली जातात, पण सगळेच काही तिकडे जात नाहीत. अनेकजण कोकणात भटकायला जातात. कोकणात वसंत ऋतू सगळीकडे अगदी बहरलेला असतो. आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ ही फळे फक्त उन्हाळ्यातच येतात. दिवसा उन असलं, तरी संध्याकाळी किनाऱ्यावर भटकणे ही पर्वणी असते. त्यासाठी मुख्य म्हणजे गॉगल आणि टोपी अगदी अनिवार्य आहे. तसेच कोकणातली हवा दमट असल्यामुळे पाणी सोबत असायलाच हवे.

*  कधी कधी उन्हामुळे थकवा येऊ  शकतो म्हणून पाण्यासोबत ग्लुकोज किंवा ओआरएस ची पाकिटे पण जवळ ठेवावीत. हल्ली स्वत:च्या वातानुकूलित वाहनामधून प्रवास केला जातो. वातानुकूलित गाडीतून एकदम बाहेर पडल्यावर चक्कर येऊ  शकते, म्हणून काही काळ सावलीत थांबणे आणि नंतर भटकंतीला जाणे उत्तम. ऐन वसंत ऋतूत कोकणात मिळणारे जांब, शहाळे, कोकम सरबत, आवळा सरबत यांचा वापर पुरेपूर करावा. खाण्यामध्ये शक्यतो हलके पदार्थ असावेत. कारण उन्हाळ्यात बरेच पाणी प्यायल्यामुळे भूक मंदावलेली असते. कोकणात खूप घाम येत असल्यामुळे फक्त कॉटनचेच कपडे वापरावेत.

*  याच काळात बुलबुल, कोतवाल, तांबट, किंगफिशर, स्वर्गीय नर्तक असे सुंदर पक्षी दिसतात. त्यासाठी दुर्बीण सोबत ठेवावी. समुद्रस्नान किंवा समुद्राच्या पाण्यात खेळणे होतेच. त्यामुळे कपडय़ाचा जास्तीचा संच बरोबर ठेवावा. मंदिरात चपला बाहेर काढाव्या लागतात आणि तापलेल्या फरशीवरून चालावे लागते त्यासाठी पायात मोजे असलेले उत्तम. कोकणात समुद्रकिनारी असलेली दीपगृहे आवर्जून आतून बघा.