राजेंद्र श्री. भट

rsbhat1957@gmail.com

कुंडय़ामध्ये कंदफुलांचे अनेक प्रकार लावून आपण आपल्या गॅलरीची शोभा वाढवू शकतो. काही कंदफुलांचे हंगाम असतात तर काही वर्षभर फुलतात. काही कंदफुलझाडांना फुले येऊन गेल्यावर  झाडे मरून जातात व कंद सुप्तावस्थेत जातात. बहुतेकदा ही अवस्था ८-९ महिन्यांची असते.  काही वेळा कंद सुप्तावस्थेत जाण्यासाठी फुले येऊन गेल्यावर पाणी बंद करावे, म्हणजे कंदांना सुप्तावस्था येते.

वर्षभर येणारी कंदफुले : कर्दळ, ग्लॅडिओलस, निशिगंध इत्यादी. विशिष्ट हंगामात येणारी कंदफुले : डेलिया, फायरबॉल, भुईचाफा, लिलीचे प्रकार, सोनटक्का (पांढरा, पिवळा व गुलाबी)

कर्दळ : साधारणपणे ही बागेत लावतात.   यात बुटक्या जाती आहेत. या कंदांना सुप्तावस्था नसते. भरपूर पाण्यात चांगली वाढ होते. पाणी शोषून घेण्यासाठी कर्दळीची लागवड करतात. लागवड कंदापासून होते.

ग्लॅडिओलस : विविधरंगी फुले असतात. कंदाला एक दांडा येतो व त्यावर खालपासून वपर्यंत क्रमाने फुले फुलत असतात. फुलांची संख्या ६ ते १६ पर्यंत असू शकते.  मोड आलेले कंद  लावण्यापूर्वी ते बुरशी नाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावेत. कंदावर पापुद्रे असतात. ते सुटतात.  मध्यम आकाराच्या लिंबाएवढा कंद असावा. कंद जर उथळ लावला तर फुलाचा दांडा लवकर येतो. पण कंदांना पिल्ले (कॉर्मेल) कमी मिळतात. म्हणून कंद मध्यम खोलीवर म्हणजे त्याच्या जाडीएवढे खोल लावावेत. फुलांच्या दांडय़ाला काठीचा आधार द्यावा. फुले येऊन गेल्यावर पाणी बंद करावे. ५-६ दिवसांनी कंद बाहेर काढून सावलीत ठेवावा. ७-८ दिवसांनी तो भोके पाडलेल्या प्लास्टिक पिशवीत ठेवून हवेशीर पण अंधाऱ्या जागी ठेवावा. ३-४ महिन्यांत सुप्तावस्था संपते. छोटे पिल्लू कंद  लिंबाच्या आकाराचे झाल्यावर त्यांना फुलांचे दांडे येतात.

निशिगंध/रजनीगंधा/टय़ुबरोझ : याचे ३ प्रकार आढळतात. एकेरी, दुहेरी पाकळ्यांचा व व्हेरिगेटेड पाने असणारा (म्हणजे पानावर हिरवे पांढरे पट्टे असणारा) एकेरी फुलांचा वापर जास्त करून हारासाठी करतात. दुहेरी पाकळ्यांच्या फुलांचा दांडा बुकेमध्ये वापरतात. याचे उभट आकाराचे कंद मिळतात. साधारण जाडय़ा तोंडल्याएवढय़ा कंदाला फुलांचा दांडा येतो. असा कंद घेऊन तो बुरशीनाशक द्रावणात बुडवून त्याच्या शेंडय़ावर एक  पेर माती पडेल एवढय़ा खोलीवर लावावा.   महिन्या दोन महिन्यांत फुलांची दांडी येते. बाजूनेसुद्धा रोपे येतात.  खालचे फूल फुलल्यावर फुलांचा दांडा काढतात. प्लॉवरपॉटमध्ये तो ८-१० दिवस राहतो व क्रमाने फुले फुलत राहतात. फुलदाणीतील पाण्यात चमचाभर साखर टाकावी व पाणी रोज बदलावे. फुलांचा दांडा न काढतासुद्धा कुंडी हॉलमध्ये ठेवू शकता. दिवसभर सुगंध दरवळतो. दांडा कापल्यावर बाजूच्या कंदातून दांडा येतो. दर १-२ महिन्यांनी नवीन दांडा येतो. ८-१० महिन्यांनंतर पाणी बंद करावे. रोपे सुकल्यावर कंद उकरून काढावे. कंदाचा गठ्ठा झालेला असतो. कंद वेगळे करून सावलीत १५-२० दिवस ठेवावे. नंतर मोठा कंद परत कुंडीत लावावा. बाकीचे कंद मोठे होण्यासाठी कुंडीत वेगवेगळे लावावेत. जसा आकार वाढेल तसे त्यांना फुलाचे दांडे येतात.