आत्माराम परब

आर्कटिक सर्कलच्या काठावर वसलेला पिटुकला देश- आइसलँड महाराष्ट्राच्या एक तृतीयांश इतका. लोकसंख्या जेमतेम साडेतीन लाख, पण या देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल २५ लाख,  इतका हा पर्यटकप्रिय देश. उन्हाळा असो की हिवाळा कोणत्याही ऋतूत येथे पर्यटकांसाठी सृष्टिसौंदर्याचा अफाट खजिनाच पसरलेला असतो. धबधबे, ज्वालामुखी, डायमंड बीच, गरम पाण्याची कुंडं, मैलोन्मैल पसरलेली गवताळ कुरणे आणि बहुतांश संपूर्ण वर्षभर दिसणारे नॉर्दन लाईट्स असं सारं काही पाहायला पर्यटकांची झुंबड उडते.

देशाच्या नावात आइसलॅण्ड असले तरी येथील केवळ आठ टक्के भूभागावरच बर्फ आहे. उरलेली जमीन. पण ज्या कोणी या देशाला सर्वप्रथम भेट दिली असेल त्याने तो बर्फाळ भागच आधी पाहिला असावा कदाचित. याच भागात एक अतिशय प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे, डायमंड बीच नावाचा. समुद्राच्या जवळच असलेल्या जोकुसलराना या ग्लेशियरमधून हिमखंड तुटून एका लगूनमध्ये साठतात. समुद्राच्या बाजूस असणारे लगूनचे तोंड अत्यंत अरुंद आहे. परिणामी मोठे हिमखंड जसेच्या तसे समुद्रात न जाता त्याचे छोटेमोठे तुकडे होतात. समुद्रात जाणारे हे छोटे छोटे तुकडे पुन्हा भरतीबरोबर समुद्र किनारी येऊन पडतात. नॉर्वेजियन समुद्राचा हा किनारा मग अशा असंख्य छोटय़ामोठय़ा तुकडय़ांनी भरून जातो. विविध आकारांच्या, असंख्य तुकडय़ांनी या किनाऱ्याला डायमंड बीच हे सार्थ नाव बहाल केले आहे.

आइसलॅण्डला लॅण्ड ऑफ आइस अण्ड फायर असे देखील म्हटले जाते. कारण येथे अनेक ठिकाणी कमीअधिक प्रमाणात असलेला निद्रिस्त ज्वालामुखी. यातील काही ठिकाणी अधूनमधून ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. येथील डोंगर तर ज्वालामुखीनेच तयार झाले आहेत. सात आठ वर्षांपूर्वी येथील एका ज्वालामुखीच्या उद्रेकामुळ युरोपातील काही भागावर तीनचार महिने विमानउड्डाण करणेच कठीण होऊन बसले होते. या ज्वालामुखीच्या डोंगराचे भव्य रूप मोहक आहे हे मात्र निश्चित. तशीच येथील गरम पाण्याची कुंडेदेखील! अनेक ठिकाणी जिओ थर्मल अशी ही कारंजे उसळताना सहजच दिसतात. गरम पाण्याच्या कुंडांना येथे जिओ थर्मल पूल म्हणून संबोधले जाते. त्यात आंघोळीची सोय असते आणि त्यासाठी चांगले ३५-४० डॉलर मोजावे लागतात.

आइसलॅण्डचे सध्या सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे जवळपास वर्षभर दिसणारा नॉर्दन लाईट. आर्कटिक सर्कलच्या काठावर वसल्यामुळे येथून नॉर्दन लाईट पाहण्याची संधी हमखास मिळते. एरवी आर्कटिक सर्कलच्या देशांमध्ये २४ तास दिवस किंवा रात्र असते तसा प्रकार येथे नाही. तुलनेने दिवस छोटाच असतो. हिवाळ्यात तर आणखीनच छोटा होतो. भौगोलिक स्थानाचे सारे लाभ सहजपणे नॉर्दन लाइट्स दिसण्यास पूरक ठरतात. त्यामुळे सध्या आइसलॅण्ड नॉर्दन लाईट्स पाहण्यासाठी हॉट डेस्टिनेशन झाले आहे.

वर्षांतील जवळपास सहा महिने हिवाळा आणि एरवी प्रचंड वारे त्यामुळे येथे झाडांचे अस्तित्व जवळपास नसल्यातच जमा आहे. पण उन्हाळा असला की मैलोन्मैल खुरटय़ा गवताचे रान दिसून लागते. तशीही येथील वस्ती विरळच आहे. त्यामुळे नुसते हिरव्यागार गवताने आच्छादलेल्या डोंगरांचेच येथे साम्राज्य असते. मायक्रोसॉफ्ट विडोंजच्या डेस्कटॉपवर जी हिरवाई दिसते ती आइसलॅण्डचीच आहे. या जोडीला असतात ते धबधबे. प्रचंड प्रमाणात असणाऱ्या धबधब्यांनी हा देश नटला आहे. अनेक धबधब्यांमध्ये त्याच्या आतील बाजूस जाता येते. मे—जून महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी त्या धबधब्याच्या प्रपातासमोर सूर्य येतो. ती वेळ कॅमेऱ्यात पकडणे हे अनेक छायाचित्रकारांचे स्वप्न असते. तर अनेक ठिकाणी सपाटीवरून जाताना अचानक धबधब्यांचा आवाज येऊ लागतो. थोडे पुढे गेल्यावर लगेचच एखाद्या घळीत कोसळणारा धबधबा दिसतो. धबधब्यांचे हे इतके वैविध्य आहे की केवळ त्यासाठी देखील येथे भेट देणारे अनेकजण आहेत.

छोटासा देश असल्याने येथील काही बाबी मात्र अतिशय वाखणण्याजोग्या आहेत. ख्रिश्चन धर्म अधिकृत असला तरी इतर धर्मीयांचे वास्तव्य तेथे आहे. मात्र कोणत्याही धर्मास त्यांच्या धार्मिक कृत्याचे प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी करण्यास सक्त मनाई करणारा सरकारी आदेशच काढणारा कदाचित हा एकमेव देश असावा. त्यामुळे प्रत्येक गावात केवळ एकच चर्च आहे. वस्ती विरळ आणि दोन गावा—शहरांमधील अंतर खूप असले तरी वाटेत हॉटेल, मोटेल वगैरेचे प्रमाण जवळपास नाहीच. जी काही हॉटेल आहे ती शहरातच. या रस्त्यांवरून पर्यटकांना स्वत: वाहन चालवण्याची सुविधा आहे. तशा गाडय़ा मिळतात. मात्र लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह असल्याने पर्यटकांच्या अपघाताचे प्रमाण वाढते आहे. या रहदारीच्या नियमाची जाणीव ठेवूनच वाहन चालवावे.

दुसरी एक मजेशीर बाब म्हणजे येथे जन्माला आलेल्या मुलामुलींना आपल्या आवडीने नामकरण करता येत नाही. सरकारी कार्यालयातून त्यासाठी उपलब्ध नावांची यादी जाहीर केली जाते. त्यातून नाव निवडावे लागते. र्चिडसन, अन्डरसन ही खास नावं आइसलॅण्डचीच.

तसा हा पिटुकला देश असला तरी संपूर्ण देश भटकायचा असेल तर किमान आठ दिवस हाताशी हवेतच. तुलनेने अधिक महागडा असा देश आहे. मात्र भारतीय पर्यटकांची संख्या चांगलीच वाढत आहे. रेकाविक गावात तर भारतीय पद्धतीची चार हॉटेल्स आहेत यावरूनच याची जाणीव होते. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत या देशाचे दर्शन घडते. मात्र खर्चीक असले तरी काही हटके पाहायचे असेल तर नक्कीच एकदा भेट द्यावी लागेल.

केव्हा जावे?

उन्हाळा : मे ते सप्टेंबर.

हिवाळा : ऑक्टोबर ते एप्रिल या दोन्ही ऋतूंत येथे पर्यटनाची धम्माल आहे. डायमंड बीच वर्षभर पाहता येतो.

कसे जावे : भारतातून थेट विमानसेवा नाही. युरोपातील बहुतांश देशांतून विमानाने जावे लागते. अनेक वर्षे हा देश डेन्मार्कच्या आधिपत्याखाली होता. आजही या देशाचा स्वतंत्र दूतावास नाही. डेन्मार्कच्या दूतावासातून व्हिसा घ्यावा लागतो.

atmparab@yahoo.com