ऋषिकेश बामणे

bamnersurya17@gmail.com

भारतीय महिला संघाची युवा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील मनोरंजनासाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अखेरच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केल्यानंतर जेमिमाने ड्रेसिंग रूममध्ये परतताना एका महिला सुरक्षारक्षकासह ‘लव आज कल २’ या चित्रपटातील गाण्यावर पाय थिरकवले. ‘आयसीसी’ने या नृत्याची चित्रफीत ट्विटरवर पोस्ट केली. त्यानंतर चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यननेसुद्धा या चित्रफितीवर प्रतिक्रिया व्यक्त करून जेमिमासह संपूर्ण भारतीय संघाला विश्वचषकासह मायदेशी परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेले काही दिवस समाजमाध्यमांवर या चित्रफितीविषयी फार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

मॅक्सवेलचा साखरपुडा

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाची प्रेमिका विनी रामण हिच्याशी साखरपुडा केल्याचे काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर जाहीर केले. सध्या मेलबर्न येथे स्थायिक असलेल्या विनीशी मॅक्सवेलचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहेत. इन्स्टाग्रामवर मॅक्सवेलने विनीसहचे छायाचित्र पोस्ट करून सर्वाना त्यांच्या साखरपुडय़ाविषयी कल्पना दिली. ‘आयपीएल’मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा मॅक्सवेल लवकरच भारतात दाखल होणार आहे.

रेयाल माद्रिदला रोनाल्डो पावला

विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी झालेल्या बार्सिलोना विरुद्ध रेयाल माद्रिद यांच्यातील ‘एल क्लासिको’ लढतीसाठी स्टेडियममध्ये हजेरी लावून तमाम चाहत्यांना आनंदाची पर्वणी दिली. सध्या युव्हेंटसकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने एके काळी माद्रिदला अनेक विजेतेपदे मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे रोनाल्डो गेल्यापासून रेयालला एकदाही लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाला नमवता आले नव्हते; परंतु रोनाल्डोला अतिथी कक्षात पाहून रेयालच्या खेळाडूंचीही कामगिरी उंचावली आणि त्यांनी बार्सिलोनावर २-० अशी मात केली. त्यामुळे सगळीकडे रेयाल माद्रिदला रोनाल्डो पावला, अशा प्रकारच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मानेसुद्धा या सामन्यासाठी उपस्थिती लावली होती, हे विशेष.

धोनीच्या पुनरागमनाने ‘नेटिझन्स’ बेभान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने २ मार्च रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर ‘आयपीएल’च्या सुरुवातीला प्रारंभ केला. धोनीच्या पुनरागमनाविषयी संपूर्ण भारतातील चाहत्यांना उत्सुकता लागून होती. त्यामुळे त्याने सरावासाठी मैदानावर उतरताच समाजमाध्यमांवरही शुभेच्छांचा आणि गमतीदार प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘हेलिकॉप्टरचे चेन्नईत आगमन झाले असून लवकरच ते प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर उड्डाण घेण्यासाठी सज्ज होईल’, ‘एव्हरीवन इज गँगस्टर, अनटिल द रियल वन अराइव्स’, ‘देखो वो आ गया’, ‘धोनी आला, म्हणजे आमच्या जिवात जीव आला’ अशा प्रकारच्या प्रतिक्रियांपासून ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर चाहत्यांनी धोनीविषयीचे प्रेम व्यक्त केले.