जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक भयंकर ‘स्पायवेअर’ शिरला आहे. सायबर पाळत करण्यात पटाईत असलेल्या इस्रायलमधील एका कंपनीने विकसित केलेला हा स्पायवेअर एकदा का तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये शिरला की, हॅकर्स तुमचे फोटो, फोन संभाषण, ईमेल, मेसेज, ठिकाण या सगळ्या गोष्टी तुमच्या नकळत पाहू शकतात.

स्मार्टफोन आणि इंटरनेटचा ‘अ‍ॅक्सेस’ आहे, पण व्हॉट्सअ‍ॅप वापरत नाही, अशी माणसे सापडणे कठीणच. जगभरातील दीड अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेले हे मेसेजिंग अ‍ॅप सदैव या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, समाजात तेढ निर्माण करणारे संदेश, आक्षेपार्ह मजकूर यांमुळे हे अ‍ॅप अनेकदा वादग्रस्तही ठरले आहे. मात्र, तरीही त्याच्या वापरकर्त्यांमध्ये सातत्याने भर पडत आहे. असे असतानाच या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या बातमीने व्हॉट्सअ‍ॅपची मालक कंपनी असलेल्या फेसबुकचीच नव्हे तर तमाम वापरकर्त्यांचीही झोप उडवली आहे. ती बातमी आहे व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘स्पायवेअर’ हल्ल्याची.

व्हॉट्सअ‍ॅप असलेल्या अँड्रॉइड आणि आयओएस फोनवर हा ‘स्पायवेअर’ हल्ला करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या कॉलद्वारे हा ‘स्पायवेअर’ वापरकर्त्यांच्या फोनमध्ये शिरकाव करतो. तुम्ही तो फोन उचला अगर नको, तो ‘स्पायवेअर’ तुमच्या फोनमध्ये शिरतो. एकदा का तो फोनमध्ये शिरला की, तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा आणि माइक सुरू करतो. तसेच तुमचे ईमेल-मेसेज तपासतो आणि तुमचे ‘लोकेशन’ही माहीत करून घेतो. ‘पेगॅसस’ नावाचा हा स्पायवेअर सर्वप्रथम लक्षात आला तो ब्रिटनमधील एका मानवाधिकारांवर काम करणाऱ्या वकिलाच्या फोनमध्ये. हा ‘स्पायवेअर’ हल्ला असल्याचे लक्षात येताच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने तातडीने तो रोखला. मात्र, जगभरातील हजारो वापरकर्त्यांना या स्पायवेअरचा धोका कायम आहे. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपने तातडीने एक अपडेट जारी केले असून आपल्या सर्व वापरकर्त्यांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

हल्लेखोर कोण?

‘पेगॅसस’ची एकूण रचना आणि हल्ल्याची पद्धत पाहून तो इस्रायलमधील ‘एनएसओ’ नावाच्या तंत्रज्ञान कंपनीने विकसित केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायबर हल्ल्यासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी म्हणून ‘एनएसओ’ प्रसिद्ध आहे. ‘पेगॅसस स्पायवेअरचा अभ्यास केला असता, तो सरकारी यंत्रणेसाठी काम करणाऱ्या खासगी कंपनीने बनवला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते,’ असे व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटले आहे. एनएसओ ही कंपनी सायबर दहशतवाद्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना मदत करते. मात्र, हे करत असताना या कंपनीने अनेकदा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठीही ‘स्पायवेअर’चा वापर केल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गेल्याच वर्षी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षाशी संबंधित एका वादग्रस्त प्रकरणाचा शोध घेणाऱ्या कार्मेन अ‍ॅरिस्टॅग्वे या टीव्ही पत्रकारासह ११ जणांच्या मोबाइल-संगणकावर अशाच एका स्पायवेअरचा हल्ला करण्यात ‘एनएसओ’चा सहभाग होता, असे उघड झाले आहे.

अपडेट कसे कराल?

अँड्रॉइडवर

* गुगल प्ले स्टोअर सुरू करा.

*  स्क्रीनवरील डाव्या कोपऱ्याच्या शीर्ष भागातील मेन्यू ‘क्लिक’ करा.

* ‘माय अ‍ॅप्स अ‍ॅण्ड गेम्स’मध्ये जा. तेथे तुमच्या मोबाइलमधील सर्व अ‍ॅपची अपडेट स्थिती पाहता येईल.

* जर तुमचा व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाला नसेल तर, ‘अपडेट’वर क्लिक करून इन्स्टॉल करा.

* व्हॉट्सअ‍ॅपची ही अपडेटेड आवृत्ती ‘२.१९.१३४’ आहे, याची खात्री करून घ्या.

आयफोनवर

* अ‍ॅप स्टोअर सुरू करा.

* स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘अपडेट्स’ बटणावर क्लिक करा.

* व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा.

* ‘आयओएस’वर व्हॉट्सअ‍ॅपची आवृत्ती ‘२.१९.५१’ ही आहे.

धोका काय?

व्हॉट्सअ‍ॅपला या स्पायवेअरचा पत्ता लागताच कंपनीने तातडीने आपली सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी नवीन अ‍ॅप अपडेट जारी केले आहे. या अपडेट मुळे ‘पेगॅसस’चा धोका नाहीसा होईल, असा कंपनीचा दावा आहे. परंतु, अनेकजणांनी अजूनही हे अ‍ॅप अपडेट केले नसल्याने हा धोका टळलेला नाही.

हल्ला कसा होतो?

वापरकर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक अज्ञात कॉल येतो. तुम्ही तो कॉल उचलला नाही तरी हा ‘स्पायवेअर’ सॉफ्टवेअरच्या रूपाने तुमच्या मोबाइलमध्ये शिरतो. विशेष म्हणजे, हा कॉल तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉल लॉगमध्येही दिसत नाही.