अमित सामंत

आफ्रिकेत फिरताना हॉटेलात खायला काय मागवायचे हा नेहमी प्रश्न असायचा. एका हॉटेलातील मेन्यूमध्ये झांजिबार फिश सूप दिसले. मासे हा आवडीचा विषय असल्यामुळे झांजिबार फिश सूप मागवून बघायचे ठरले. मासा स्थानिक नदीतला आहे आणि चविष्ट आहे अशी वेटरने ग्वाही दिली.

हिंदी महासागरात असलेली झांजिबार हा बेटांचा समूह टांझानिया देशाचा भाग आहे. सुंदर समुद्रकिनारे, कोरल्स यासाठी ही बेटे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. इथे मसाल्याचे पदार्थ आणि नारळ विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे नारळाचे दूध, मसाल्याचे पदार्थ आणि माशाचे काटेविरहित (बोनलेस) तुकडे वापरून हे सूप तयार केले जाते. त्यामुळे आपल्याकडच्या मालवणी किंवा गोवन फिश करीच्या जवळ जाणारा याचा स्वाद असतो. काही ठिकाणी हे सूप बनवताना व्हाईट वाईनचा वापर केला जातो.

स्वाहीली लोकांच्या पारंपरिक जेवणात झांजिबार फिश सूप असते आणि फिश स्टय़ू असते. आफ्रिकेतील देशांच्या सहलीला गेलात तर झांजिबार सूपचा आस्वाद नक्की घ्या.