अंबर हडप, लेखक

वेगवेगळ्या प्रकारचे लेखन एकाचवेळी सुरू असते. त्यातून स्वाभाविकपणे मनावर ताण येतो. एखादी संहिता लिहीत असताना मध्येच अडते. पुढे काय लिहावे सुचत नाही. अशा वेळी लेखनाचा सारा पसारा बाजूला ठेवून शांतपणे बसणेच हितावह असते. अन्यथा चिडचिड होऊ शकते. मला हे अनुभवाने माहिती आहे. त्यामुळे मी शांतपणे संगीत ऐकत बसतो. त्यातही अर्थ वाहून आणणारे शब्द नको असतात. त्यामुळे वाद्यसंगीत पसंत करतो. त्यातून विचारचक्र पुन्हा ताळ्यावर येण्यास मदत होते. मृदुंगाचा घुमणारा नाद, तबल्यावरील बोटांची फिरकत अथवा छेडल्या जाणाऱ्या तारेने मनाचे कोडे सुटते. ते पुन्हा आनंदी होते. विचारचक्र प्रवाही होते. अशा रीतीने माझ्यावरील ताण हलका झाला की मग मी पुन्हा संहितेकडे वळतो. ताण हलका करण्याची ही माझी साधी, सोपी पद्धत आहे. कधी कधी थोडे वेगळेही करतो. जुन्या रम्य आठवणींना उजाळा देतो. त्यानेही मला बरे वाटू लागते.

मिळालेल्या पुरस्कारांचे कोणतेही जुने फोटो काढतो. व्हिडीओ बघतो. त्यामुळे काम करण्याची स्फूर्ती येते. आपल्या कामाची स्वत:च दखल घेतली की मनावरचा ताण हलका होण्यास मदत होते. बऱ्याचदा मनासारखे सुचत नाही. त्यामुळे अधिक उत्कंठावर्धक लिहिण्यासाठी एखाद्या गोष्टीच्या खूप मागे लागतो. मात्र होते भलतेच. खूप चांगले काही लिहिण्याच्या भानगडीत नेमके उलटेच घडते. त्यानेही ताण वाढतो. मग चक्क सारे काही बंद करून घराबाहेर पडतो. मस्तपैकी नवा सिनेमा पाहतो. कधी कधी घरातच जुने सिनेमे पाहतो. त्यातून विविध संकल्पना स्पष्ट होत जातात. माझ्या लेखन प्रक्रियेसाठी हे सारे पूरक ठरते. कधी कधी मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी गप्पा मारतो. त्यातूनही मनावरील ताण हलका होतो. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे आणि व. पु.काळे यांच्या कथा ऐकतो. मला विविध एकांकिकाही पाहायला आवडतात. त्यातून काही नव्या कल्पना सुचतात. मग नव्या उत्साहाने त्यावर काम सुरू करतो. एकांकिका करणाऱ्या तरुणांमध्ये जबरदस्त ऊर्जा आणि उत्साह असतो. त्याचाही खूप उपयोग होतो. थोडक्यात काय नेहमी एकच एक गोष्ट करीत राहिले तर कळत- नकळतपणे मनावर ताण येणारच. त्यामुळे ठरावीक अंतराने वेगवेगळ्या गोष्टींत मन रमविले की छान वाटते. एकच गोष्ट करीत असाल तरी ती वेगवेगळ्या पद्धतीने करा. त्यामुळे त्यातून तुम्हाला आनंद मिळत राहील. तरुणांना मी सांगेन की कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण घेऊ नका. त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईलच, शिवाय तुमची मन:स्थितीही बिघडेल. ‘मन चंगा तो तन चंगा’ हेच खरं. आपल्याकडच्या संतांनीही हेच सांगितले आहे. कोणतेही काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. कारण तेवढेच आपल्या हाती असतं. त्यानंतर फारसा विचार करू नका. तुमचे कामच तुमची ओळख निर्माण करेल. यशाच्या मागे लागू नका. इतके चांगले काम करा, की अखेरीस यशच तुमच्या मागे लागेल

शब्दांकन : भाग्यश्री प्रधान