देशातील दुसरे मोठे वाहन प्रदर्शन ‘ऑटो एक्स्पो २०२०’ दिल्लीत सुरू असून बुधवार व गुरुवार दोन दिवस माध्यमांसाठी खुले होते. यात आधुनिक तंत्रज्ञान ई मोबिलिटी व कन्सेप्ट कार या वाहन खरेदीदारांच्या आशाआकांक्षा डोळ्यांसमोर ठेवत तसेच शासनाचे विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या धोरणानुसार विजेवर चालणारी वाहने सादर करण्यात आली. देशविदेशातील कार उत्पादक कंपन्यांनी या दोन दिवसांत नवीन व सुधारित अशा ६० पेक्षा जास्त कारचे सादीकरण करण्यात आले. यातील काही कार बाजारात उतरवल्या आहेत.

मारुतीची विद्युत कार ‘फ्युचरो-ई’

सध्या भारतात विद्युत वाहनांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असून बाजारात काही मोजक्याच विद्युत कार आल्या आहेत. यात नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या एमजी मोटर्सची झेडएक्स व टाटाची नेक्झॉन या दोन कारची स्पर्धा सुरू आहे. यात आता पुढील काळात अनेक विद्युत कारची भर पडणार आहे. मारुती सुझुकीने प्रदर्शनात विद्युत सेगमेंटमध्ये आपली पहिली कार ‘फ्यूचरो-ई’चे सादरीकरण केले. या कारची किंमत १५ लाखांपासून पुढे असण्याची शक्यता असून ती मेटॅलिक रंगात असेल. ही कार भारतीय बनावटीची असून कार उत्पादनातही तिची बांधणी पथदर्शी ठरेल, असा विश्वास कंपनीनी व्यक्त केला आहे. याबरोबरच मारुतीने आपली सर्वाधिक खपाची ‘व्हिटेरा ब्रेजा’ या कारची पेट्रोल कार बाजारात आणली आहे. पुढच्या काही दिवसांत ती रस्त्यावर दिसेल.

‘केयूव्ही १००’ आता विजेवर

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने विद्युत प्रकारात स्वस्त कार देण्याचा आपला शब्द कायम ठेवत ‘केयूव्ही १००’ ही विद्युत कार बाजारात आणली असून तिची किंमत ही ८ लाख २५ हजार असेल. आतापर्यंत विद्युत प्रकारात आलेल्या चांगल्या दर्जाच्या कार या १५ लाखांच्या पुढे आहेत. त्यामुळे विद्युत कार घ्यायची आहे, पण किंमत जास्त आहे, म्हणून थांबलेल्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या कारमधील हा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

रेनो ट्रायबर ऑटोमॅटिक

रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून वाहन प्रदर्शनात ट्रायबर इझी-आर एएमटीच्या अनावरणाची घोषणा करण्यात आली. ही कार वर्षांच्या पूर्वार्धात बाजारात येईल. रेनो ट्रायबर प्रशस्त, परिपूर्ण बांधणी, किफायतशीर, इंधनस्नेही वाहन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. इझी-आर-टेक्नॉलॉजी ट्रॅफिक असिस्टसोबत वाहतूक कोंडीत सहजपणे मार्गक्रमण करण्याची संधी देते. किफायतशीर म्हणजे हे वाहन सर्वोत्तम इंधन सक्षमतेने सज्ज असूनही बाजारातील इतर समान वाहनपर्यायांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

‘एमजी’ची ‘माव्‍‌र्हल एक्स’

एमजी मोटर इंडियाने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये जागतिक पातळीच्या उत्पादनांची एक मोठी मालिका सादर करून मोबिलिटीचे भविष्य प्रस्तुत केले. इंटरनेट, इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस क्षमता यांचा समन्वय असलेली अत्याधुनिक उत्पादने विकसित करण्यावर एमजीचा भर असून ‘माव्‍‌र्हल एक्स’ हा त्याचाच एक भाग आहे. व्हिजन-आय संकल्पना ‘जगातील पहिली ५जी झिरो-स्क्रीन स्मार्ट कॉकपिट’ म्हटली जाते. ही संकल्पना वाहनाची नवी श्रेणी व्याख्यायित करणारी संकल्पना म्हणून विकसित करण्यात येत आहे. अशी श्रेणी जी ५जी ट्रॅव्हलिंगच्या दुनियेत सर्वोत्तम असेल, असा कंपनीचा दावा आहे.

किआ कार्निव्हल

कोरियन वाहन उत्पादक कंपनी ‘किआ’ने भारतातील बाजारात आपल्या सल्टोस या एसयूव्हीला मिळत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आणखी एक महत्त्वपूर्ण कार ‘किआ कार्निव्हल’चे अनावरण केले. या गाडीची गेली अनेक दिवस चर्चा होती. २५ लाखांपासून एक्सशोरूम किंमत असेल.२.२ एल व्हीजीटी बीएस ६ डिझेल इंजिन प्रकारात ही गाडी असेल. किआने दुसरी कॉनसेप्ट एसयूव्ही ‘सोनेट’ कारचे अनावरण केले.

दोन दशकांनंतर ‘सियरा’ परतली

टाटा कंपनीने त्यांच्या ‘सियरा’ या कारच्या सुधारित ‘ई’ आवृत्तीचे अनावरण केले. ही कार तीन दरवाजे असलेली आहे. ही कार पहिल्यांदा १९९१ मध्ये बाजारात आली होती. मात्र गेली दोन दशके ती बाजारात नव्हती. याशिवाय टाटाने टियागो, टिगोर, अल्ट्रोज, नेक्सॉन आणि विंगर या गाडय़ांची झलकही दाखवली आहे. टाटाने प्रवासी इलेक्ट्रिक आणि खासगी वाहनांची कनेक्टेड, इलेक्ट्रिक, शेअर्ड आणि सेफवर लक्ष केंद्रित करत बनवलेली पूर्णत: नवीन रेंज सादर केली.