उदयन पाठक

भारतीय वाहन उद्योग सध्या एका संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यात वाढत्या वाहन प्रदूषणामुळे केंद्र सरकारने पर्यावरणपूरक वाहननिर्मितीसाठी ‘भारत मानक ६’ लागू केले आहे. सरकारच्या या निर्णयानुसार आता सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांनी नव्या इंधन मानांकन असलेली आपली वाहने बाजारात आणली आहेत. एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. यामुळे शहरांमधील वाहनांचे होणारे प्रदूषण कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहेत. त्यामुळे ‘भारत मानक ६’ नेमके काय आहे. त्याविषयी…

आज जागतिक स्तरावरील युरो प्रदूषण मानके आणि भारत मानक यात सुमारे तीन ते सात वर्षांचा फरक आहे. इ.स. १९९२ पासून लागू झालेल्या ‘युरो १’ला समकक्ष भारत मानक १ इ.स. २००० लागू होण्यात सहा वर्षांचा फरक होता. टप्प्याटप्प्याने हा फरक फक्त २ वर्षे असा कमी झाला.

चित्र क्रमांक १ : युरो प्रदूषण मानके आणि भारत मानक यातील फरक

दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे ‘भारत मानक १’ ते ‘भारत मानक ४’ ही मानके देशात सर्वत्र एकदम लागू न होता सुरुवातीला मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूरु इ. महानगरांमध्ये आणि नंतर देशव्यापी स्तरावर लागू झाली. यातसुद्धा सुमारे पाच वर्षांचा फरक होता. देशांतर्गत हा फरक असण्याचे कारण म्हणजे त्या त्या भारत मानकाला पूरक इंधनाची एकाच वेळी देशव्यापी उपलब्धता करून देणे तत्कालीन सरकारला शक्य झाले नाही.

केंद्रीय भूपृष्ठ वाहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पुढाकार घेऊन, दोन दूरगामी फरक पडणारे निर्णय घेतलेत. पहिला म्हणजे ‘भारत मानक ५’ हा टप्पा वगळून सरळ ‘भारत मानक ४’वरून ‘भारत मानक ६’ एप्रिल २०२० पासून लागू करणे. दुसरा ‘भारत मानक ६’ एप्रिल २०२० मध्ये देशव्यापी एकदमच लागू करणे. भारतीय वाहन उद्योगासाठी हे एक कठीण आव्हान होते. ‘भारत मानक ६’ला पूरक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनेसुद्धा तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये प्रक्रियांचे उत्थान करण्यासाठी ६०,००० कोटी खर्च केले आहेत.

इंधन (Fuel) : भारत मानक लागू झाल्यानंतर इंधनातील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे इंधन शिसेविरहित झाले. आजघडीला १ किलोग्रॅम पेट्रोलमध्ये फक्त ५ मिलिग्रॅम शिसे असते. त्याचबरोबर पेट्रोलमधल्या गंधकाचे प्रमाण १० मिलिग्रॅम प्रति किलो आहे. शिश्यानंतर गंधकाचे प्रमाण कमी करायला सुरुवात झाली. पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या गुणवत्तेत  पण असे अनेक बदल होताहेत. कधीकाळी १ टक्का- १० लक्ष भागात १०,००० या प्रमाणात (ppm) असणारे गंधक आता १० लक्ष भागात १० (ppm) इतके कमी झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनांमध्ये हीच पातळी राखली जाते.

इंजिन आणि उत्सर्जन (Engine & Exhaust) : भारत मानक ६ची प्रदूषण उद्दिष्टे गाठण्यासाठी इंजिन आणि उत्सर्जन हाताळणाऱ्या यंत्रणेत अनेक बदल करावे लागलेत. अर्थात ते करण्यासाठी प्रत्येक वाहन निर्मात्याने त्याचे स्वत:चे वैशिष्टय़ राखण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. पारंपरिक इंजिनातील काब्र्युरेटरची जागा आता इंधन फवारणी पंपांनी घेतली. यामुळे  इंधन आणि हवेचे मिश्रण संगणकाद्वारे योग्य परिमाण राखून आणि नियंत्रित होते.

ज्वलन पश्चात इंजिनाने उत्सर्जित केलेल्या वायूत गंधक आणि नत्र ऑक्साइड प्रमाण जास्त असते तसेच या वायूचे तापमान जास्त असते. या वायूला उत्सर्जन वायू नियमकामार्फत (Exhaust Gas Regulator) थंड केले जाते. यातील नत्र ऑक्साइडचे प्रमाण कमी कराण्यासाठी त्याला उत्प्रेरक नियामकातून (Catalytic  Converter) पाठवतात आणि त्याच वेळी त्यात द्रव स्वरूपातील युरियाची फवारणी करून त्याद्वारे अमोनिया पुरविला जातो. हा अमोनिया आणि उत्सर्जित वायू ह्याची प्रक्रिया होऊन नत्र ऑक्साइडचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाते. डिझेल इंजिनाच्या उत्सर्जित वायूत असणारे तरंगते कण डिझेल तरंगत्या कणांच्या चाळणीत (Diesel Particulate Filter) अडवले जातात.

मापके आणि नियंत्रक घटके (Sensors and ECUs) : नवीन प्रदूषण नियंत्रक प्रणालीत अनेक मापके (Sensors) वापरली  जात असून त्यातून मिळालेला संदेशांचे विश्लेषण करून युरिया फवारणीचे प्रमाण ठरवणे उत्सर्जक वायू नियामकाला कार्यरत करणे इ. बाबी नियंत्रक घटकांच्या माध्यमातून केल्या जातात. यालाच सामान्य भाषेत आपण संगणक म्हणतो. या बदलांमुळे वाहन आणि इंजिन हे केवळ यांत्रिक घटक राहिले नसून ते पराविद्युत (Electronic) संयंत्र झाले आहे. त्यामुळे वाहनांची दुरुस्ती हे केवळ पारंपरिक मेस्त्रींचे काम राहणार नसून संगणक सोबत घेऊन वाहने दुरुस्त करणाऱ्या आधुनिक मेस्त्रींना आता नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.