13 August 2020

News Flash

चुका टाळा कारचे आयुष्य वाढवा

गाडी चालवताना सर्वसाधारण प्रत्येक चालकाचा एक हात स्टेअरिंगवर व दुसरा हात गिअर बॉक्सवर असतो.

 

कार हवी हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येक जण कष्ट करून पै पै जमवून लाखमोलाची कार घेत असतो. मात्र या लाखमोलाच्या कारचेही एक आयुष्य ठरलेले असते. पण आपण गाडी चालवताना योग्य काळजी न घेतल्याने तिचे आयुष्य कमी करत असतो. उलट वारंवार नादुरुस्तीमुळे वारंवार आर्थिक फटका सहन करीत असतो. त्यामुळे आपण चांगले चालक असा किंवा नवखे, गाडी चालवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नकळत उत्साह व जोशात आपण अनेक चुका करीत असतो, आणि लाखमोलाच्या गाडीचे मोठे नुकसान होते. एक तर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत किंवा सरावातून आपण गाडी शिकतो. पण काही तांत्रिक बाबी माहीत नसल्याने नकळत अनेक चुका करीत असतो. त्यामुळे चालक प्रशिक्षित असो वा नवशिका प्रत्येकाने गाडी चालवताना काही गोष्टींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी काही उपयुक्त माहिती.

दोन्ही हात स्टेअरिंगवरच असावेत..

गाडी चालवताना सर्वसाधारण प्रत्येक चालकाचा एक हात स्टेअरिंगवर व दुसरा हात गिअर बॉक्सवर असतो. हीच पद्धत प्रत्येकालाच योग्य वाटते. पण हे योग्य नाही. कारण यामुळे काही धोके असतात. जर आपला दुसरा हात गिअर बॉक्सवर ठेवला तर ट्रान्समिशनच्या आत असलेले शिप्टिंग फॉग हे एका गिअरमधून दुसऱ्या गिअरमध्ये जाण्यासाठी तयार राहतात. त्यामुळे सिन्क्रोनायझेशनवर दबाव येतो व त्यामुळे गिअर झिजतात. त्यामुळे गिअर बॉक्स नादुरुस्त होऊ शकतो. त्यामुळे आपले दोन्ही हात हे स्टेअरिंगवरच ठेवावेत. लांबचा प्रवास करीत असाल तर कायम दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवता येणे शक्य नसते. त्यामुळे अधूनमधून डावा हात आर्मरेस्टवर ठेवावा.

क्लचवर लगातार पाय ठेवल्यास..

क्लचवर कायम पाय ठेवणे ही काही चालकांची सवय झालेली असते. पण हे धोक्याचे ठरू शकते. यामुळे गाडी पेटही घेऊ शकते. तसेच क्लचपॅड खराब होऊ शकते. तसेच सिग्नल असो किंवा काही कामानिमित्त गाडी बाजूला घेतली असता चालक क्लचवर पाय ठेवत इंजिन चालू ठेवतो. यामुळे क्लच व गिअर बॉक्स खराब होऊ शकतो. त्यामुळे क्लचवर पाय न ठेवता गाडी न्यूट्रल करून हॅण्ड ब्रेक लावूनच गाडी थांबवा.

पहिल्या गिअरवरच टेकऑफ..

पार्किंग करताना आपण गिअरमध्ये हॅन्डलॉक करून गाडी पार्क करतो. पण ज्यावेळी गाडी चालू करतो त्यावेळी प्रथम गाडी न्यूट्रल करा. नंतर पहिला गिअर टाकत टेकऑफ करा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या गिअरमध्ये कधीही गाडी टेकऑफ करू नका.

स्वयंचलित गाडी  पार्क करताना..

सध्या स्वयंचलित गिअर असलेल्या कार बाजारात आल्या आहेत. या गाडय़ा पार्क करताना हॅण्डब्रेक जरून लावा. पी मोडवर गाडी असताना त्याचा ट्रान्समिशनवर दबाव येतो व नुकसान होते. गाडी पूर्ण थांबल्याशिवाय रिव्हर्स गिअर टाकू नका. गाडी रिव्हर्स गिअरवर असेल तर थेट पहिल्या गिअरवर आणू नका.

वेगानुसार गिअरवर नियंत्रण हवे

गाडी चालवताना रस्त्यात गतिरोधक किंवा खड्डा येतो. त्यावेळी चालक लगेच ब्रेकवर पाय ठेवत गाडीचा वेग कमी करतो. पण बरेचदा गिअर कमी करण्यास तो विसरतो. आणि गतिरोधक किंवा खड्डय़ातून पास होताच आहे त्या गिअरवर गाडी पुन्हा एक्सलेटर देत गाडी वेगाने पुढे नेतो. पण हे चुकीचे आहे. यामुळे मोठे नुकसान होत असते. या स्थितीत गाडीचा गिअरबॉक्स, क्लच, सिलेंडर बाद होऊ शकतो. आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे अशा स्थितीत काहीही झाले तरी वेग नियंत्रण केल्यानंतर त्यानुसार गिअरही कमी करा. कारण प्रत्येक गिअरची एक वेग मर्यादा असते. आपण अशावेळी गिअर कमी न करता क्लच दाबून वेग कमी करण्याचा प्रयत्न करतो, हे चुकीचे आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य वेगमर्यादेत योग्य गिअर वापरणे गरजेचे आहे.

उताराला गाडी फक्त ब्रेकवर नियंत्रित करू नका..

डोंगर उतारावरून किंवा घाटातून उतरताना गाडीवर नियंत्रणासाठी चालकाचा कायम ब्रेकवर पाय असतो. किंवा अशावेळी इंधन वाचविण्यासाठी गाडी बंद करीत ब्रेकवर गाडी नियंत्रित करीत उताराने उतरत असतो, पण यामुळे ब्रेक पॅड घासून नादुरुस्त होऊ शकतात. अशावेळी अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळे उताराला उतरताना फक्त ब्रेकवर पाय ठेवू नये. यामुळे गाडीतील इतर सुरक्षा साधनांनाही नुकसान पोहचू शकते. त्यामुळे अशावेळी गाडी पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्येच गाडी उतारावरून उतरवावी.

थोडे थांबून इंजिन बंद करा..

आपण दूरवरचा प्रवास करून गाडी लगेच बंद करतो. पण गाडीत एक टबरे चार्जर असतो. हा टबरे चार्जर इंजिनपेक्षा जास्त आरपीएमवर फिरत असतो. त्यामुळे त्यांचे तापमान वाढलेले असते. आशा वेळी लगेच गाडी बंद केल्याने तो नादुरुस्त होऊ शकतो किंवा त्याला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे गाडी थांबवल्यानंतर १५ ते ३० सेकंद थांबून नंतरच गाडीचे इंजिन बंद करावे.

चढणीला गाडी थांबली तर..

मोठय़ा चढावर किंवा घाटातून वर चढताना बहुतांश नवशिक्या चालकांची मोठी पंचाईत होत असते. मध्येच काही कारणास्तव गाडी थांबवावी लागली तर गाडी मागे सरकण्याचा धोका असतो. बरेचदा चालक हाप क्लच व एक्सलेटरचा वापर करीत तेथून कसाबसा निघतो, पण यामुळे गाडीचे नुकसान होते. यामुळे क्लचचा वापर करा. नंतर हॅन्ड ब्रेक लावा, गाडी न्यूट्रल करून थांबा. गाडी सुरू करताना प्रथम पहिला गिअर टाका, क्लच थोडा रिलीज करा, एक्सलेटर दाबत राहा. त्याचवेळी हॅन्टब्रेक काढा. या तिन्ही गोष्टी एकाच वेळी करणे थोडे अवघड असते, पण याचा सराव करूनच अशा धोक्याच्या ठिकाणी गाडी घाला. अन्यथा गाडीचे नुकसान तर होइलच पण अन्य प्रसंगही उद्भवू शकेल.

खड्डेमय रस्त्यांवरून जाताना..

आपल्याकडचे रस्ते म्हणजे जागोजागी खड्डे. खड्डे वाचवताना अनेकदा गाडीला मोठे धक्के बसून टायर व सस्पेंशन खराब होतात. त्यामुळे अशावेळी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवत हळुवार गाडी चालवा. अन्यथा मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच जुनी गाडी असेल तर ती सुरू करतानाही काळजी घेतली पाहिजे. काही वेळ गाडी सुरू करून नंतरच पुढे जा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 2:05 am

Web Title: avoid mistakes extend the life of the car akp 94
Next Stories
1 जुन्या-नव्याचे चांगले मिश्रण
2 बाजारात नवीन काय?
3 अध्यात्म आणि कलेचा संगम
Just Now!
X