मान आणि पाठीच्या वरील बाजूस असलेले स्नायू मजबूत करण्यासाठी बेंट नी सीट-अप व्यायाम केला जातो. यास क्रंचेस असेही म्हटले जाते. या व्यायामाने पाठीचे स्नायू बळकट होत असल्याने पाठदुखीपासून मुक्ती मिळते. विशेष म्हणजे या व्यायामाने पोटाचेही स्नायू बळकट होतात. कसे कराल? जमिनीवर पाठीवर झोपा. पाय गुडघ्यातून वाकवा. पायाच्या टाचेपासून कंबरेचे अंतर १२ ते १८ इंच असावे. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन हाताची बोटे एकमेकांत गुंफवा. आता हाताच्या साहाय्याने डोके आणि पाठ वर उचला. (लक्षात ठेवा, केवळ पाठीचा वरील भागच वर उचला.) डोके वर उचलताना दीर्घ श्वास घ्या आणि डोके खाली घेताना श्वास सोडा. (श्वास घेताना तो पोटापासून घ्या.) डोके वर उचलल्यानंतर ते खाली सावकाश घ्या. जर वेगाने डोके वर उचलले आणि खाली आणल्यास मान दुखवू शकते. डोक अधिक वर उचलू नका. अनेक जण डोके छातीवर टेकवण्याचा प्रयत्न करतात. ते चुकीचे आणि धोकादायक आहे.