डॉ. विवेक पाखमोडे , अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय

मुखदुर्गंधीची समस्या अनेकांना भेडसावत असते, त्यामुळे अशा व्यक्ती इतरांशी संपर्क टाळतात. कमीत कमी बोलतात. हसताना तोंडावर हात ठेवतात. थोडक्यात एकलकोंडय़ा बनतात. मुखदुर्गंधीने व्यक्तीचा आत्मविश्वासही हरविलेला असतो. कशामुळे नेमकी ही समस्या उद्भवते समजून घेऊ..

मुखदुर्गंधीला इंग्रजीत बॅड ओरल ऑर्डर किंवा हॅलिटोसीस हा लॅटिन शब्द असून याचा अर्थ दुर्गंधीयुक्त  श्वास असा होतो मुखदुर्गंधीला किडलेल्या दातापासून ते पोटाच्या कर्करोगापर्यंत अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे ही व्याधी लपविण्यापेक्षा याकडे लक्ष दिल्यास एखाद्या दुर्धर आजाराचे वेळेत निदान होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे  ८५ ते ९० टक्के मुखदुर्गंधीचे कारण हे तोंडात दडलेले असते.

तोंडामध्ये काही प्रकारचे जिवाणू वास्तव्यास असतात. मात्र दातामध्ये अडकलेले अन्न किंवा तोंडाचे अनारोग्य यामुळे काही जिवाणू झपाटय़ाने वाढू लागतात. त्याच्या प्रभावामुळे कुजलेल्या घटकांपासून हायड्रोजन सल्फाइड आणि मरकॅप्टन या दुर्वासाची निर्मिती होते.   खरंतर प्रत्येकाच्या श्वासाचा एक विशिष्ट वास असतो. तरुण व वयस्क, स्त्री व पुरुष, सकाळ किंवा रात्र, दुपारची वेळ असा थोडाफार फरक पडतो. लहान बाळांच्या तोंडाचा गोडसर वास येतो. तेच वयस्करांचा तोंडाचा वास नकोसा होतो.

मुखदुर्गंधीची तोंडातील कारणे

* अडकलेले अन्नकण – दातांच्या फटीमध्ये, नकली दाताच्या आजूबाजूला, दातांना लावलेल्या ब्रेसेसमध्ये अन्नकण राहिल्यास तोंडातील जिवाणूंचे चांगलेच फावते. हे अन्नकण कुजू लागतात आणि त्यामुळे तोंडाला घाण वास येऊ लागतो.

* हिरडय़ांचे विकार- सुजलेल्या हिरडय़ांमुळे त्यात अन्नकण अडकण्याची शक्यता असते.  अशा हिरडय़ांमधून पू वा स्राव निघत असतो. स्वाभाविकच हे सर्व घटक तीव्र मुखदुर्गंधीला कारणीभूत ठरतात.

* खूप किडलेले दात- बऱ्याच लोकांचे अनेक दात खूप किडलेले असतात. असे दात प्रत्येक वेळेस दुखतीलच असे नाही. त्यांच्यात अन्नकण सहज साचून राहतात. पू आणि रक्तस्रावाचे प्रमाणही त्यामुळे वाढते आणि मुखदुर्गंधीला ते कारणच ठरते.

* जीभेवरचा थर- जीभेचा वरचा भाग नैसर्गिकरीत्या काहीसा खरखरीत असतो. त्यामुळे त्यावर अन्नाचा विशेषत: चहा, कॉफी, शीतपेयाचा थर साचू लागतो. हा गोडसर थर स्वच्छ न गेल्यास पुढे तो घट्ट होतो. जीभेचा पुढचा दोनतृतीयांश भाग सहजपणे दिसतो. त्यामुळे हा स्वच्छही करतात. परंतु मागचा एकतृतीयांश भाग सहज दृष्टीपथात नसल्याने स्वच्छ केला जात नाही. हेही एक कारण आहे

* तोंडाने श्वास घेणे- तोंडाच्या स्वच्छतेसाठी लाळेचा खूप मोठा वाटा असतो. जे लोक तोंडाने श्वास घेतात. त्यांचे दात, ओठ, जीभ लवकर कोरडे पडतात. ही परिस्थितीही अनुकूल असते.

* धूम्रपान आणि तंबाखूचे व्यसन- धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या तोंडाचा विशिष्ट उग्र दर्प येत असतो. तसेच मिशरी, गुटखा, तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या तोंडाचा सुद्धा नको वाटणारा वास येत असतो. वेलची सतत चघळणाऱ्या लोकांच्या तोंडाचा वाससुद्धा नकोसा वाटू शकतो.

* लाळेचे कमी प्रमाण- वाढत्या वयाबरोबर मधुमेह, अनेक औषधांच्या वापरामुळे किंवा लाळग्रंथीच्या विकारामुळे लाळेचा स्राव कमी होऊ शकतो. स्वाभाविकच तोंड स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुचारू पद्धतीने काम करत नाही. अर्थातच मुखदुर्गंधीची शक्यता वाढते.

* तोंडातील जखमा/कर्करोग-  जीभेवरचा खरखरीत भाग सोडल्यास तोंडातील सर्वच भाग मऊ, नितळ असतो. मात्र तंबाखूच्या सवयीमुळे आढळणाऱ्या पांढऱ्या किंवा लाल चट्टय़ांमुळे (ल्युकोप्लॉकिया किंवा इरिथ्रोप्लॉकिया), तोंडातील जखमा, वारंवार येणारे अ‍ॅप्थस अल्सरचे व्रण आणि मुखकर्करोग यामुळे तीव्र स्वरुपाची मुखदुर्गंधी उद्भवू शकतो.

*  इतर विकार- नाक, कान, घशाचे विकार, फुप्फुसांचे विविध आजार, पोटाचे किंवा यकृताचे आजार, मधुमेह, मूत्रपिंड, लाळग्रंथीचे विकार तसेच अनेक औषधांचे सेवन यामुळेही मुखदुर्गंधीची समस्या होते. काही आजारांमध्ये मुखदुर्गंधी वैशिष्टय़पूर्ण असते. मूत्रपिंडाच्या विकारात तोंडाचा अमोनियासारखा वास येतो. पोटाच्या विकारात आंबट वास तर मधुमेहात गोडसर वास येतो. त्यामुळे नेमके निदान करणे सुकर होते.

मुखदुर्गंधीने त्रस्त असल्यास दंततज्ज्ञाच्या मार्गदर्शनासाठी नक्की भेट घ्यावी. मुखदुर्गंधीचे कारण तोंडात दडलेले नसेल तर दंततज्ज्ञ इतर संबंधित डॉक्टरांकडे पाठवतील. मुखदुर्गंधीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते.

उपाययोजना

सकाळी आणि रात्री दोन ते तीन मिनिटे ब्रश करावा. पाण्याव्यतिरिक्त कोणतेही द्रवपदार्थ सेवन केल्यानंतर कमीत कमी एक घोट पाणी प्यावे. गोड रसाळ फळे, चिकट द्रव्याचे सेवन केल्यावर खळखळून चूळ भरावी. चॉकलेट, बिस्किटे, कांदे, लसूण खाल्ल्यानंतर शक्य असेल तेव्हा एक मिनिट तरी दात घासावेत.

सकाळी उठल्यानंतर तोंडाला दुर्गंधी का येते?

रात्रीच्या जेवणाचे अन्नकण तोंडात राहिले असल्यास किंवा चहा, कॉफी, सरबत, शीतपेयाचा थर जीभेवर राहिल्यास या दुर्गंधीची तीव्रता अधिक असते. रात्री झोपेत जीभ, ओठ, गाल यांच्या हालचाली जवळपास ठप्प असतात. त्यातच लाळेचा स्राव मंदावतो. म्हणून सकाळी तोंडाची दुर्गंधी अधिक जाणवते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती खूप वेळ उपाशी असल्यास त्या व्यक्तीच्या मुखदुर्गंधीत वाढ होते.