घरातल्या घरात

एखाद्या हॉटेलात किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला गोल वाटोळ्या  आकाराचे जाळीदार लॅम्पशेड पाहायला मिळतात. हे ‘लॅम्पशेड’ दिसायला आकर्षक असतातच पण त्यातून बाहेर पडणारा प्रकाशही छान पसरलेला दिसतो. असे लॅम्पशेड खरेदी करायला गेले तर अगदी तीनशे रुपयांपासून त्यांच्या किमती सुरू होतात. मात्र तुम्ही घरबसल्या अशा लॅम्पशेड अगदी काही मिनिटांत बनवू शकता.

साहित्य

जाड धागा (गोधडी विणण्यासाठी वापरतात तसा), फेव्हिकॉल किंवा तत्सम गम, बल्ब, बल्ब होल्डर, प्लगपिन आणि वायर, फुगा.

कृती

सर्वप्रथम एक फुगा फुगवा. तुम्हाला जितक्या मोठय़ा आकाराची लॅम्पशेड बनवायची आहे, त्या आकारात फुगा फुगवा आणि त्याची गाठ बांधा. एका वाडग्यात फेव्हिकॉल ओतून त्यात जाड धागा भिजवून ठेवा. धागा चांगला भिजल्यानंतर फुग्याच्या गाठीपाशी या धाग्याची गाठ बांधून तेथून धागा हव्या त्या पद्धतीने फुग्याभोवती गुंडाळा. आपण लोकरीच्या धाग्याची गुंडाळी करतो, त्याप्रमाणे गुंडाळी करणे सोपे. फुग्याभोवती गुंडाळी पूर्ण झाल्यानंतर धाग्याचे शेवटचे टोक पुन्हा फुग्याच्या गाठीपाशी बांधा. आता ही गुंडाळी सुकू द्या. ती संपूर्णपणे वाळल्यानंतर धाग्यांचा कडक जाळीदार चेंडू तयार होईल. आता टाचणीने आतील फुगा फोडून काढून घ्या. चेंडूच्या खालच्या बाजूचा वर्तुळाकार भाग कापून घ्या. तुमची बलून लॅम्पशेड तयार.

बल्बहोल्डर आणि वायर यांची जोडणी करून घ्या. चेंडूच्या कापलेल्या भागातून बल्ब लावलेला होल्डर आतमध्ये सोडा. बेडरूम किंवा हॉलमधील एखाद्या कोपऱ्यात अशा बलून लॅम्पशेडची जोडी किंवा तीन लॅम्पशेड शेजारी शेजारी लावून घराची शोभा आणखी वाढवता येते.