इडली म्हणजे स्वादिष्ट, करायला-पचायला सोपा आणि पौष्टिक नाश्ता. विविध प्रकारच्या चटण्या, सांबार, रस्समसह पानात येणाऱ्या इडलीची स्वतचीही अनेक रूपे आहेत. नेहमीच्याच पिठात वेगवेगळे जिन्नस मिसळून नवनवीन रंग-ढंग-चवींची इडली बनवता येते. त्यातून तिच्या पोषणमूल्यांतही भर घालता येते.  ही इडली नारळाच्या गोड दुधाबरोबर खाण्यास द्यावी.  उन्हाळ्यात केळ्यांऐवजी आमरसही वापरता येतो.

साहित्य

२ वाटय़ा बारीक रवा, २ चमचे तूप, एक वाटी पिकलेल्या केळ्याचा पल्प, एक वाटी गूळ, एक वाटी खवलेला नारळ, चवीपुरते मीठ, वेलची पूड.

कृती

दोन वाटय़ा बारीक रवा दोन चमचे तुपावर भाजून घ्यावा. त्यात एक वाटी केळ्याचा पल्प, एक वाटी गूळ पातळ करून, एक वाटी खवलेल्या नारळाची पेस्ट घालावी. थोडे मीठ घालावे. त्यात पाणी घालून चव पाहावी. चव गोड असली पाहिजे. वेलची पूड मिसळावी. इडलीच्या पिठापेक्षा थोडे पातळ पीठ ठेवावे. इडली पात्राला तूप लावावे आणि त्यात हे पीठ घालावे. साधारण अर्धा तास वाफेवर शिजवावे.