25 February 2021

News Flash

आला उन्हाळा कारची तब्येत तपासा..

आपल्याकडे प्रत्येक ऋतूनुसार खानपान, कपडय़ांच्या वापरामध्ये बदल होतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आपल्याकडे प्रत्येक ऋतूनुसार खानपान, कपडय़ांच्या वापरामध्ये बदल होतो. यामुळे चांगले आरोग्य राहण्यास मदत होते. याचप्रमाणे आपण वापरत असलेल्या गाडीची ऋतुमानानुसार वा एकूणच काळजी घेणे आवश्यक आहे. ऋतुमान आणि गाडीचा काय संबंध, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण, ऋतूचा संबंध गाडीशी नक्कीच आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात गाडीची देखभाल करण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. वस्तुत: हे दोन्ही ऋतू सुरू होण्यापूर्वी गाडीची तपासणी करून सर्व योग्य आहे ना, म्हणजे गाडीची विशेषत: कारचे हेल्थ ऑडिट तज्ज्ञ व्यक्तींकडून (मेकॅनिक) घेणे आवश्यक आहे. कारण सुरक्षित प्रवासासाठी ही गोष्ट करून घेणे आवश्यक आहे.

उन्हाळा सुरू होऊन काहीच दिवस झाले आहे. मात्र, सध्या तरी झळा जाणवत नसल्या तरी त्याची चुणूक मिळू लागली आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात उन्हाची तीव्रता कमी-जास्त जाणवत असली तरी गाडीचे आरोग्य बिघडू शकते. उन्हाळ्यात गाडीचे इंजिन व टायर या दोन घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण उन्हाचा सर्वाधिक परिणाम या दोन घटकांवर होत असतो. रनिंगमुळे इंजिन व टायर दोन्ही गरम होत असतात आणि त्यांचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टायर गरम होऊन फुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच, पुरेसे कूलंट नसल्याने इंजिनचे तापमान वाढून त्यावर विपरीत परिणाम होऊ  शकतो. बहुतांशी इंजिन बंद पडते, असे वाहनतज्ज्ञ विनायक भिडे यांनी सांगितले. त्यामुळेच इंजिनकडे दुर्लक्ष करू नये.

इंजिन

कोणत्याही वाहनाचा महत्त्वाचा घटक इंजिन आहे. इंजिनमध्ये अनेक घटक असतात. त्यामध्ये इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कूलंट येतात. यातील इंजिन ऑइलची लेव्हल, ब्रेक ऑइलची लेव्हल तपासली जाते. मात्र, कूलंटची लेव्हल काही वेळा तपासायची राहून जाऊ  शकते. तसेच, गाडीचा वापर सतत असल्यास कूलंट कमी होऊ  शकते. त्यामुळे विशेषत: उन्हाळ्यात कूलंट लेव्हल पाहणे आवश्यक आहे. कारण, एसीचा कमाल वापर याच ऋतूमध्ये होतो. अनेक वेळा कूलंट लेव्हल कमी झाल्याने रेडिएटरवर अती ताण येऊन इंजिन बंद पडू शकते. त्यामुळेच कूलंटची किमान व कमाल पातळी तपासत राहणे आवश्यक आहे. कूलंट लेव्हल पाहण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीकडे जाण्याची गरज नसते. कारण कूलंट भरण्याच्या बॉक्सवर मिनिमम व मॅक्सिमम लेव्हलची खूणही अक्षरांसह दाखविलेले असते. कूलंट हे कायम मॅक्सिमम लेव्हलवरच असावे. उन्हाळ्यात लांबचा प्रवास होणार असल्यास आपल्याकडे कूलंटची बॉटल कारमध्ये ठेवावी. तसेच, कोणत्या ब्रॅण्डचे व किती कूलंट घालावे, हे आपण मेकॅनिकला विचारू शकतात. कारण इंजिनच्या प्रकारानुसार कूलंट बदलते. तसेच, रेडिएटवर अनेक वेळा धूळ बसते. ही धूळही स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण, रेडिएटर स्वच्छ असल्यास इंजिनची कार्यक्षमता चांगली राहते.

टायर

टायर हा गाडीचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. टायर फुटून अपघात झाल्याचे अनेक प्रसंग आहे. टायरची योग्य खबरदारी घेणे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यामध्ये टायरची ग्रिप, वायूचा दबाव वारंवार पाहणे आवश्यक आहे. टायरची ग्रिप कमी झाली असल्यास वा ती कमी झाली आहे का, हे तज्ज्ञांकडून तपासणे आवश्यक आहे. तसेच, कारचा वापर अधिक नसल्यास वा ती उभी असल्यास टायरला क्रॅक जाऊ  शकतात. त्यामुळे टायरवर असे काही क्रॅक्स नाहीत ना, हे तपासणे आवश्यक आहे. कारण ही छोटीशी खबरदारी आपल्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाची असते. तसेच, टायरमध्ये हवेचा योग्य दाब असणे आवश्यक आहे. बहुतेक कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या दरवाजाच्या खालील बाजूस वा डोअर ट्रीमवर हवेचा दाब कोणत्या चाकात किती असावा, याचा उल्लेख असणारे स्टिकर असते. मर्यादेपेक्षा अधिक हवा टायरमध्ये असल्यास गाडीला कमी ग्रिप मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून टायरमध्ये हवेला पर्याय म्हणून नायट्रोजन उपलब्ध झाला आहे. पण, नायट्रोजन मोठय़ा व मध्यम आकाराच्या शहरांतूनच उपलब्ध आहे. त्यामुळे कारचा वापर बाहेरगावी जास्त होत नसल्यास या पर्यायांचा विचार करता येऊ  शकतो. नायट्रोजन हा हवेच्या तुलनेत थंड आहे आणि त्याचा दाब वाढत नाही. तसेच, हवेच्या तुलनेत टायरमध्ये नायट्रोजन वारंवार भरावा लागत नाही. साधारणत: महिन्याभराने त्याचे प्रेशर तपासून घ्यावे.

एअर कंडिशनर

फटिक फ्री ड्रायव्हिंग म्हणजे गाडी चालविण्याचा ताण जाणवू नये यासाठी गाडीमध्ये एअर कंडिशनर (एसी) असणे हे आवश्यक झाले आहे. उन्हाळ्यामध्ये प्रवास करताना एसीचे महत्त्व आणखी अधोरेखित होते. प्रवासात आपल्याला प्रत्येक वेळा गाडी वा कार सावलीत लावायला मिळेलच, असे नाही. उन्हामुळे कारच्या आत उष्णता वाढते. अशा वेळी कारमध्ये बसल्यावर एकदम एसी सुरू केला जातो. काही वेळा काचा खाली केल्या जात नाही. त्यामुळेच अशा वेळी कारच्या सर्व काचा खाली करून सर्वप्रथमच पूर्ण क्षमतेने ब्लोअर ऑन करणे आवश्यक असते. तसेच, एसीचे सर्व व्हेंट वरील दिशेला आहेत, हे पाहावे. यामुळे येणारी उष्ण हवा आपल्या अंगावर न येता छताकडे आणि बाहेर जाते. ब्लोअर सुरू केल्यानंतर काही वेळाने एसीचे बटण दाबावे. यामुळे इंजिनवर ताण येत नाही. एसीमधून गार हवा येत असल्याचे जाणवू लागल्यावर कारच्या काचा वर घ्याव्यात. यामुळे कूलिंग पटकन होते. त्यानंतर आपल्याला हवा तेवढय़ा तापमानावर एसी सेट करावा.

कारमधील सीट, ब्लाइंड्स

कारमध्ये अनेक वेळा सिंथेट प्रकारची सीट कव्हर असतात. अशा सीटवर अधिक काळ बसल्यास उष्णता निर्माण होते. तसेच, उन्हाळ्यात अशा सीटवर घामही येतो आणि बसण्याचा सुखद अनुभव राहत नाही. सिंथेटिक सीट कव्हर असल्यास ते काढून कॉटनचे सीट कव्हर लावावे आणि तसे शक्य नसल्यास सीटवर कॉटनची बेडशिट वा कपडा टाकावा. यामुळे उष्णता निर्माण होत नाही. कारला टिंटेड ग्लास बसविण्यास बंदी आहे. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्याची विशेष ब्लाइंड्स मिळतात. ती बसवून घेता येऊ शकतात.

याबरोबरच ब्रेक ऑइल, डिस्कब्रेक वा ड्रमब्रेक यांच्याही तपासण्या वेळोवेळी करून घेणे हे आपल्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाचे आहे. तसेच, गाडी चालविताना वेगाशी स्पर्धा न करता सुरक्षित प्रवासासाठी नियंत्रित वेग राखणेही आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 2:05 am

Web Title: basic car maintenance tips
Next Stories
1 पपई – चिकू सॅलड
2 विविधरंगी जर्मनी
3 सुंदर माझं घर : कप बास्केट
Just Now!
X