ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

भारतात क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल आणि हॉकी यांसारखे काही हातावर मोजण्याइतके खेळ सोडल्यास अन्य खेळांना अद्यापही मोठय़ा प्रमाणावर प्रकाशझोत लाभलेला नाही. मात्र आता संपूर्ण जगभरात लोकप्रिय असलेल्या एनबीए बास्केटबॉल लीगचे प्रथमच प्रदर्शनीय सामने भारतात आयोजित करण्यात आले आहेत. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनएससीआय येथे रंगणाऱ्या या सामन्यांच्या पाश्र्वभूमीवर एनबीए लीगचा आढावा..

एनबीए म्हणजे नक्की काय?

एनबीए म्हणजेच ‘नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन’ लीग या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते. १९४६-४७ पासून उत्तर अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण ३० संघ सहभागी होतात. त्यांपैकी २९ संघ हे अमेरिकेतीलच आहेत, तर एक संघ मात्र कॅनडाचा आहे. सुरुवातीची तीन वर्षे ही लीग ‘बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका’ या नावाने खेळवण्यात आली, परंतु १९४९मध्ये अमेरिकेने राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेशी (एनबीए) करार केल्यामुळे या स्पर्धेला नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन लीग असे नाव पडले. या लीगमधील प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असतो. त्यातील प्रत्यक्षात सामन्यात एका वेळी पाच खेळाडूंनाच खेळण्याची मुभा आहे. एरव्ही अन्य बास्केटबॉल स्पर्धाचे सामने प्रत्येकी १० मिनिटांच्या चार सत्रांप्रमाणे ४० मिनिटे रंगतात, मात्र एनबीएमध्ये प्रत्येकी १२ मिनिटांच्या चार सत्रांप्रमाणे ४८ मिनिटे एक सामना खेळला जातो.

मुंबईत नेमके काय घडणार?

एनएससीआय येथे एनबीए लीगमधील इंडियाना पेसर्स आणि सॅक्रामेंटो किंग्स या नामांकित संघांमध्ये दोन सामने (४ आणि ५ ऑक्टोबर रोजी) रंगणार आहेत. या सामन्यांचे सोनी टेन वाहिनीवर थेट प्रक्षेपणसुद्धा करण्यात येणार आहे. विश्ष म्हणजे सॅक्रामेंटो किंग्स संघाचे मालक विवेक रणदिवे यांचा जन्म मुंबईतच झाला आहे. २०१३मध्ये सॅक्रामेंटो संघाचे मालकी हक्क स्वीकारल्यानंतर त्यांनी एनबीए लीगचे सामने भारतात खेळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेरीस यश प्राप्त झाले आहे. त्याशिवाय मुंबईला सर्व सिनेतारकांचे व श्रीमंतांचे माहेरघर मानले जाते, त्यामुळेच येथील चाहत्यांसमोर या लीगचे सामने खेळवून बास्केटबॉलचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रथमच भारतात या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

नामांकित खेळाडू व ट्रम्प यांचे आकर्षण

सॅक्रामेंटो किंग्स संघातील मव्‍‌र्हिन बॅगले, डी’आरोन फॉक्स आणि ब्रॅड हेल्ड हे खेळाडू, तर इंडियाना पेसर्स संघातील व्हिक्टर ओल्दापिओ, मायलस टर्नर आणि डोमँटोस सॅबनोस हे बास्केटबॉलपटू फार लोकप्रिय असल्याने त्यांच्या खेळाकडे चाहत्यांचे खास लक्ष असेल. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवडय़ांपूर्वी एनबीएलीगचे सामने पाहण्यासाठी ते मुंबईत येणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु ही बाब कितपत खरी आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.