सुहास जोशी

गुजराती पदार्थामध्ये अनेकदा बटाटय़ाचे प्रमाण भरपूर असते. बटाटय़ापासून केल्या जाणाऱ्या अनेक चविष्ट पदार्थापैकीच एक म्हणजे बटाटा लुगरा.

एका मोठय़ा परातीत मसाला लावलेले उकडलेले बटाटे पाहिल्यावर हा काहीतरी बटाटा चाट वगैरे प्रकार असावा असे वाटते. पण आपण एक प्लेट दे दो म्हणून ऑर्डर केल्यावर या बटाटय़ाचे स्वरूप बदलू लागते. पाच-सात बटाटय़ाचे काप सोबतच्या मसाल्यासहित उचलून एका पातेल्यात टाकतात. मग थोडेसे उकडलेले मसाला चणे त्यात टाकतात. आणखी एक विशिष्ट असा मसाला त्यात टाकून सगळे मिश्रण भेळीप्रमाणे एकत्र केले जाते. शेवटी ही भेळ एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर कांदा आणि कोथिंबीर पेरली की झाला बटाटा लुंगरा तयार. सोबत पिवळे धम्मक असे गोल पोकळ सांडगे.

ज्याला बटाटा आवडत नाही त्याच्यादेखील तोंडाला पाणी सुटेल असे हे भन्नाट प्रकरण. राजकोटमध्ये हा पदार्थ काही ठिकाणी मिळतो. पण याचे मूळ आहे ते राजकोटपासून १०० किलोमीटरवर असलेल्या घोराजी गावात. शेवटच्या टप्प्यात मिसळला जाणारा मसाला त्या गावात तयार होतो. घोराजी गावात भली मोठी परात भरून बटाटे ठेवलेले असतात. त्याच्या पाच टक्केदेखील बटाटे राजकोटच्या गाडय़ांवर दिसत नाहीत, असे विक्रेता सांगतो. पण राजकोटच्या भटकंतीत लिंबडा चौकात याची चव घेता येईल.