बाजारात काय? : सुहास धुरी

मुखातील अन्नपदार्थाचे चर्वण करण्यासाठी दातांचा वापर होतो. अन्न चावण्याबरोबरच शब्द उच्चारणात देखील दात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच सुंदर निरोगी दात मानवी सौंदर्यातही भर घालतात.  मात्र, या दातांची निगा राखणेही तेवढेच जरुरीचे आहे. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळेही दात सडण्याची शक्यता जास्त असते. दिवसभर काही ना काही खात राहिल्यास हिरडय़ा दुखणे, कीड लागणे, दात वेडेवाकडे येणे, दुर्गंधी, दात पिवळे पडणे, हिरडय़ांत पू होणे असे विकार बळावतात.  दंतवैद्यकांचा सकाळी आणि रात्री तरी दात ब्रश करणे आवश्यक आहे असा सल्ला हा ठरलेलाच असतो. तसे दात घासण्यासाठी अनेक कंपन्यांचे ब्रश बाजारात आहेत. आता इलेक्ट्रिक ब्रशही बाजारात आले आहेत. हे इलेक्ट्रिक ब्रश चार्जेबल आणि पोर्टेबल आहेत. कोठेही सहजपणे घेऊन जाऊ शकता. हे ब्रश ब्ल्यू टय़ूथने तुमच्या स्मार्टफोनला जोडले तर तुम्ही दात घासतेवेळी जी योग्य-अयोग्य क्रिया करता त्याचे अंदाज बांधू शकता.

ब्रश आणि त्याला जोडलेली स्टीक असे दोन भाग देण्यात आले आहेत. ब्रश बदलता येत असल्यामुळे घरातील इतर सदस्यांनाही या टूथब्रशचा लाभ घेता येतो.  बटन चालू केल्यास हे ब्रश वायब्रेट होतात. त्यातून एका मिनिटात ३० ते ४५ हजार कंपने निर्माण होतात. जी आपल्या दातांची स्वच्छता आणि मजबुतीसाठी उपयुक्त ठरतात. दातांच्या फटींत अडकलेले अन्नाचे कणही सहजपणे काढता येतात. बटनाद्वारे ही कंपने कमी-जास्तही करता येतात. बॅटरी एकदा चार्ज केली तर चार ते सहा महिने कार्यरत राहते. २० ते ३० मिनिटात याची बॅटरी चार्ज होते. वॉटरप्रूफ असलेल्या ब्रशला विविध बटने दिली आहेत. त्यामध्ये स्वच्छता, पांढरेशुभ्र दात, मसाज आदी प्रकारांचा समावेश असतो. जशी  आवश्यकता तसा वापर करू शकतो.  या ब्रशमध्ये मॅग्नेटिक मोटारीचा वापर केल्यामुळे त्याचा आवाजही खूपच कमी येतो. ज्यांचे दात मागे-पुढे आहेत त्यांच्यासाठीही या ब्रशमध्ये यंत्रणा उपलब्ध आहे. यामध्ये एक एलईडी इंडिकेटरही दिले आहे. दात घासताना ते तुम्हाला सूचित करत असते. दात किती वेळ घासावेत, ते घासताना दातांच्या ठरावीक भागाला किती वेळ द्यावा याची वेळही तुम्हाला निश्चित करता येते. त्यासाठी टायमर दिला गेला आहे. त्याचा वापर करता येतो. प्लास्टिक फायबर, रबरयुक्त हे ब्रश असून दिसायला आकर्षक आहेत. ब्रशचे केसही मुलायम गोलाकार पद्धतीने तर काही लंब आकारात बसविलेले आहेत. जे दात घासताना दातांची काळजी घेत असतात, असं कंपनीकडून सांगितले जाते. एमआय, व्रुझ, शॉमी, कोलगेट, ओरल आदी अनेक कंपन्यांचे ब्रश बाजारात आहेत. ज्यांची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते.

 

वैशिष्टय़े

  •  दिसायला आकर्षक, वजनाला हलके.
  •  पोर्टेबल, चार्जेबल.
  •   बॅटरी चार्ज केल्यानंतर चार ते सहा महिने कार्यरत.
  •  मॅग्नेटिक मोटारीचा वापर.
  •  वॉटरप्रूफ त्यामुळे शॉक लागण्याची भीती नाही.
  •  बॅटरी बॅकअप, पॉवर बँॅक, चार्जर आदींपासून चार्ज करणे शक्य.
  •  व्हायब्रेट क्षमता एका मिनिटात ३० ते ४० हजार.
  •  ब्रश बदलण्याचीही सुविधा.

suhas.dhuri@expressindia.com