एप्रिल-मे महिना म्हणजे उन्हाळी लोकभ्रमंतीचा अर्थात हिमालयात भटकण्याचा काळ. हजारो पर्यटक, ट्रेकर हिमालयात जातात. अशी भ्रमंती आता सर्वसामान्य झाली आहे. तरीदेखील अनेकांना काय तयारी करावी असा प्रश्न पडतो.

  • नेमके काय घ्यावे हे न कळल्यामुळे भरपूर सामान घेतले जाते. साधारणपणे पाच-सहा दिवसांच्या सहलीसाठीही पर्यटक १५-२० किलोचे समान दोन-तीन बॅगांतून घेऊन जातात. अशा या वजनी बॅगा अनेकांना उचलताही येत नाहीत. अनावश्यक सामान घेण्याची समस्या ही मानसिकतेशी संबंधित आहे.
  • रोज बदलण्यासाठी नवीन कपडय़ांचा जोड, जास्तीच्या चादरी किंवा शाली, जादा टॉवेल, फॅशनेबल जॅकेट, हवेची उशी, पुस्तके, जास्तीचा खाऊ हेअर ड्रायर, चपलांचे जादा जोड, रिकाम्या पिशव्या, जास्तीचे मेकअपचे सामान अशा अनेक वस्तूंनी सामानाची बॅग भरलेली असते. मुक्काम हा लोकवस्तीच्या ठिकाणीच होत असल्याने गरज लागेल त्या वस्तू त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे सामान कमी ठेवावे.
  • हिमालयात प्रथमच ट्रेकला जात असाल आणि ट्रेकचा अनुभव नसेल तर सह्य़ाद्रीतील एखाद्या किल्ल्याचा सराव ट्रेकला जाण्यापूर्वी करावा.
  • प्रवासाचा मार्ग, ट्रेकचा मार्ग, परिसरातील गावे, प्राणी-पक्षी-जंगल, हवामान, लोकजीवन, वैशिष्टय़पूर्ण ठिकाणे इत्यादींची माहिती ट्रेकला निघण्यापूर्वी घ्यावी.
  • इथे कधीही पाऊस पडतो. त्यामुळे सर्व सामान सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य अशा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करावा. सॅकच्या वरून घेता येईल असा प्लास्टिकचा रेनकोट किंवा पोन्चो घ्यावा. छत्री उपयोगी नसते.

(भाग १)