डॉ. रेखा डावर, स्त्रीरोगतज्ज्ञ

वारंवार गर्भपात करणे हा कुटुंबनियोजनाचा योग्य पर्याय नाही. यामुळे स्त्रीच्या शरीराला भविष्यात धोके निर्माण होऊ शकतात. कुटुंबनियोजनासाठी अनेक योग्य दर्जाच्या पद्धती उपलब्ध आहेत. यांचा योग्य रीतीने वापर केल्यास नको असलेली गर्भधारणा सुरक्षितपणे टाळता येऊ शकते.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

निरोध

पुरुषांसाठी निरोध किंवा कंडोम हे अत्यंत विश्वासार्ह साधन असून त्याचा उपयोग करण्याचा सल्ला नवदाम्पत्यांना देतो. इतर साधनांच्या तुलनेत याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. निरोधचे दुहेरी फायदे आहेत. गर्भधारणा टाळता येते, शिवाय गुप्तरोगांपासूनही रक्षण करता येते. याची नकारात्मक बाजू अशी की हा प्रत्येक संभोगाच्या वेळी वापरणे आवश्यक आहे. खरं तर सोईच्या दृष्टीने निरोध प्रत्येक वेळी वापरला जात नाही. योग्य वेळी निरोध वापरला गेला नाही किंवा त्याचा वापर करण्यापूर्वी योनीमार्गामध्ये पुरुषाच्या जननेंद्रियातून वीर्य बाहेर पडल्यास गर्भ राहण्याची शक्यता असते. हल्ली बाजारामध्ये उत्तम दर्जाचे निरोध उपलब्ध आहेत. या निरोधचे आवरण पातळ असल्याने स्पर्श किंवा संवेदना योग्य रीतीने होत असल्याने संभोग करताना शारीरिक सुख मिळण्यामध्ये आडकाठी येत नाही.

स्त्रियांसाठीचे रिंग निरोधही बाजारात उपलब्ध आहेत. हे निरोध वापरण्यास जटिल असून तुलनेने महागही आहेत. स्त्रीचा योनीमार्ग वेगळा असतो. त्यामुळे यांची रचनाही वेगळी आहे. दोन प्लास्टिक रिंग असून बोजड असतो. साधारण १०० रुपयाला एक निरोध असल्याने याचा वापर फारसा केला जात नाही. तसेच याचा वापर करण्यासाठी महिलेला त्याची पद्धती नीट समजून घेणे आवश्यक आहे.

गर्भनिरोधक गोळ्या

कुटुंबनियोजनासाठी गर्भनिरोध गोळ्या घेणार असाल तर लग्नाच्या एक महिनापूर्वी सुरू कराव्या लागतात. गोळ्या कशा सुरू कराव्यात याची माहिती लग्नापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून समजून घ्यावी. महिला निरोगी असल्यास या गोळ्या फायदेशीर असतात. मात्र महिला स्थूल असेल किंवा हृदयविकार, रक्तदाब इत्यादींपैकी काही आजार असल्यास या गोळ्यांचा वापर धोकादायक ठरू शकतो. निरोगी महिला सलग चार ते पाच वर्षे या गोळ्या घेऊ शकतात. परंतु कावीळ, यकृतासंबंधी आजार असल्यास या गोळ्या घेऊ नयेत. हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे घटक असलेल्या औषधांच्या दुकानातून या गोळ्या घेता येऊ शकतात. २१ गोळ्यांचे पाकीट असून प्रत्येक दिवस ही गोळी घेतल्यानंतर आठ दिवस गोळी बंद करायची. या काळात पाळी येते. पाळी संपल्यानंतर पुढील आठवडय़ात पुन्हा नवीन पाकीट सुरू करावे. गोळ्यांमध्ये हार्मोन्स अधिक असल्याने याबाबतची भीती आहे. आयसीएमआरच्या ह्य़ूमन रिप्रोडक्शन रिसर्च सेंटरच्या संशोधनानंतर आता या गोळ्यांमधली हार्मोन्सचे प्रमाण कमी केलेले आहे. त्यामुळे यांचे शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत. या गोळ्यांमुळे ज्यांची पाळी अनियमित असते, पाळीमध्ये अधिक प्रमाणात रक्तस्राव होतो, रक्ताच्या गाठी पडतात अशा तक्रारीही दूर होतात.

स्तनदा मातेसाठी गर्भनिरोधक साधने

गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन असते. त्यामुळे स्तनदा मातांना या गोळ्या देत नाहीत, कारण इस्ट्रोजन दूध कमी करते. त्यासाठी फक्त प्रोजेस्ट्रॉन असलेल्या गोळ्या, गर्भनिरोधक इंजेक्शन इत्यादी उपाय उपलब्ध आहेत. स्तनदा माता ही बाळामध्ये दिवसभर व्यग्र असते. त्यामुळे तिला दररोज गोळी घेणे शक्य नसते. गोळ्यांमधील प्रोजेस्ट्रॉनची मात्रा कमी असल्याने एका दिवशी संध्याकाळी सात वाजता घेतली आणि दुसऱ्या दिवशी कामाच्या गडबडीत रात्री बारा वाजता घेतली तरी त्याचा परिणाम कमी होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता असते. गोळ्यांमध्ये नियमितता गरजेची आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी ‘अंतरा’ या कार्यक्रमाअंतर्गत गर्भनिरोधक इंजेक्शन सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. म्रेडोक्सीप्रोजेस्ट्रॉन एसीटेट(एमपी) या गर्भनिरोधक इंजेक्शनचा प्रभाव तीन महिन्यांपर्यंतच राहतो. त्यामुळे दर तीन महिन्यांनी ते घ्यावे लागते. साधारणपणे १८ ते ४५ वयोगटातील महिलांना हे इंजेक्शन दिले जाते. पाळी आल्यानंतर, गर्भपातानंतर सात दिवसांनी आणि प्रसूतीच्या सहा आठवडय़ांनंतर हे इंजेक्शन घेता येऊ शकते. इंजेक्शनचा वापर थांबविल्यानंतर सहा ते सात महिन्यांनी गर्भधारणा होऊ शकते. इंजेक्शन घेतल्यावर सुरुवातीला पाळी अनियमित होण्याची शक्यता असते.

गर्भनिरोधक इम्प्लांट – इम्प्लेनॉन

गर्भनिरोध इम्प्लांट- इम्प्लेनॉन बसविण्याची परवानगी सरकारने दिलेली असून जानेवारीपासून आपल्याकडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. काडीच्या आकाराचे दिसणारे हे इम्प्लांट दंडाच्या खालच्या बाजूने इंजेक्शनच्या साहाय्याने त्वचेच्या आतील बाजूस बसविले जाते. यामध्ये असणारे प्रोजेस्ट्रॉन दररोज हळूहळू शरीरात स्रवत असते. या इम्प्लांटचा कालावधी तीन वर्षांचा असून एकदा बसविल्यानंतर तीन वर्षांनीच दुसरे बसवावे लागते. दोन मुलांमधील अंतर हे किमान तीन वर्षे असावे. त्यानुसार हे इम्प्लांट पाळणा लांबविण्याच्या दृष्टीने सोईस्कर आहे. दुसरे मूल हवे असल्यास हे इम्प्लांट काढून टाकावे. हे इम्लांट इतर गर्भनिरोधक साधनांच्या तुलनेत महाग असल्याने याचा वापर सध्या उच्चभ्रू दांम्पत्यांमध्येच केला जात आहे. सर्वसाधारणपणे तीन हजार रुपये एकावेळेस इम्प्लांट बसवण्याचा खर्च आहे. तसे बघायला गेले तर वर्षांला हजार आणि महिन्याला ८० रुपये खर्च येतो. काही बॅ्रण्डच्या महिनाभराच्या गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकीट २०० ते २५० रुपयांना आहे. त्या तुलनेत हे स्वस्त आहे. परंतु एकावेळेस तीन हजार रुपये खर्च करणे काही कुटुंबाना शक्य नसते. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षांत दुसरे मूल नको आहे हे नक्की असायला हवे. कारण बऱ्याचदा असेही होऊ शकते. इम्प्लांट बसविल्यानंतर काही महिन्यांतच घरातले दुसऱ्या मुलासाठी सांगत आहेत, मग आता काढा, असेही महिला सांगतात. हे इम्प्लांट काढणेही शक्य आहे. परंतु पैसे वाया जातात. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. परदेशामध्ये अनेक वर्षांपासून वापरले जाते. हे योग्य रीतीने बसविणे आवश्यक असल्याने डॉक्टरांमार्फतच बसवून घ्यावे.

तांबी (कॉपर टी)

तांबी हा खूप जुना आणि स्वीकार्य पर्याय म्हणून वापरला जातो. मुख्यत: पाळणा लांबवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे नवदाम्पत्यांना तांबी वापराचा सल्ला दिला जात नाही. पूर्वी प्रसूतीनंतर दीड महिन्यांनी तांबी बसविली जात होती. परंतु आता प्रसूतीपश्चात लगेचच तांबी बसवली जाते. सिझेरियननंतरही लगेचच तांबी बसविता येऊ शकते. पाच, सात आणि अगदी दहा वर्षे मुदतीच्याही तांबी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. गोळीच्या आणि निरोधच्या तुलनेत तांबी हा सोईस्कर पर्याय आहे. मात्र ही तांबी शरीरात आहे ना यावर लक्ष ठेवावे लागते. काही वेळस ही तांबी पडल्याचेही महिलांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अधिक मुदतीची तांबी बसविली असली तरी वर्षांतून एकदा डॉक्टरांकडे जाऊन ती योग्य ठिकाणी आहे का याची तपासणी करून घ्यावी. मिरेन्ना नावाची तांबी ही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये तांबीसह हार्मोन्सचा वापर केलेला असतो. काही स्त्रियांना तांबी बसविल्यानंतर रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो. पाळी अनियमित असते. अशा स्त्रियांना ही तांबी बसविण्याचा सल्ला दिला जातो.

चाळिशीनंतर गर्भधारणा होऊ शकते

३५-४० नंतर गर्भधारणा होत नाही, असा समज महिलांमध्ये असल्याने गर्भनिरोधक साधनांचा वापर करत नाहीत. चाळिशीनंतर गर्भधारणा झालेल्या अनेक महिलांचे गर्भपात मी केलेले आहेत. रजोनिवृत्तीचे वय वाढत चालले आहे. पूर्वी ३५ ते ४० मध्ये महिलांना रजोनिवृत्ती येत असे. परंतु हल्ली ५२ वर्षांपर्यंतच्या महिलांची नियमित पाळी सुरू असल्याचे दिसून येते. हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे, मात्र यामुळे गर्भधारणा होण्याचे वयही वाढलेले आहे. तेव्हा पाळी येत आहे तोपर्यंत गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच ४५ नंतरही पाळी नियमितपणे येणाऱ्या महिलांनी पॅपस्मिअर नावाची चाचणी वर्षांतून एकदा करून घेणे अत्यावश्यक आहे.

शब्दांकन – शैलजा तिवले