News Flash

बेत ठरवा झटपट..

उन्हाळा म्हटल्यावर हिमशिखरांची आठवण होणं स्वाभाविक आहे.

उन्हाळा म्हणजे शाळा-महाविद्यालयांना सुटी आणि मनसोक्त भटकंती! साधारण फेब्रुवारी-मार्चमध्येच या सुटीचे बेत पक्के झालेले असतात. तुम्ही अजून काहीच बेत आखले नसतील तर कमी गर्दीची आणि आल्हाददायक वातावरण असलेली ही काही ठिकाणे..

‘मग या वर्षी कुठे?’.. ‘आम्ही गेल्या वर्षीच काश्मीर करून टाकलं बाबा’.. ‘यंदा आम्ही एकदम ऑफ बीट ठिकाण निवडलंय, तीच तीच ठिकाणं आणि त्याच त्याच गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी’.. ‘उन्हाळ्याच्या सुटीत खरा गारवा हिमालयातच मिळतो हं, आम्ही दर वर्षी हिमालयातलंच ठिकाण निवडतो’.. असे संवाद लोकलच्या डब्यात आणि ऑफिसातल्या लंचब्रेकमध्ये ऐकू यायला लागले आहेत. तुम्ही या वर्षीच्या उन्हाळी सहलीची तजवीजच केली नसल्यामुळे अशा संभाषणांमधून बाद झालात का? आता हे खरं आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबाला घेऊन सहलीला जायचं तर जरा आधीपासून नियोजन करायला हवं. पण मंडळी हा जमाना इन्स्टंटचा आहे. इडलीपासून ते चिकनपर्यंत सगळे पदार्थ जर इन्स्टंट बनू शकतात, तर तुमची कौटुंबिक सहल का नाही झटपट आखता येणार? आत्ता नियोजन करून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून ते जूनच्या अखेरीपर्यंत कुठे कुठे जाता येईल याची ही एक झलक.

उन्हाळा म्हटल्यावर हिमशिखरांची आठवण होणं स्वाभाविक आहे. ऐन उन्हाळ्यात हमखास बर्फ मिळायची जागा म्हणजे मनाली. दिल्लीहून दहा ते बारा तासांचा प्रवास करून हिमाचल प्रदेशातील या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचता येतं. व्यास ऋषींचा कमंडलू सांडून इथली बियास नदी वाहू लागली तर लक्ष्मणाने गुरुवर्य वसिष्ठांच्या सोयीसाठी जमिनीत बाण मारून गरम पाण्याचे कुंड निर्माण केले. अशा पुराण कथांबरोबरच मनालीला अनुपम निसर्गसौंदर्याचं वलयही लाभलेलं आहे. तुम्ही जर जूनच्या मध्यावर मनालीला गेलात तर तोपर्यंत रोहतांग पासचा रस्ता खुला झालेला असतो, त्यामुळे तेरा हजार फुटांवरच्या बर्फाच्या साम्राज्यात प्रवेश करता येतो. अर्थात रोहतांगचा रस्ता खुला नसतानाही गुलाबो किंवा मढीजवळच्या बर्फात खेळता येतंच. दिल्लीसाठी विमानाचे अनेक पर्याय आहेत आणि दिल्ली ते मनाली लक्झरी बस सेवा आहे, त्यामुळे आत्ताही मे अखेरीचा मनालीचा चार रात्रींचा बेत ठरवता येईल. तुम्हाला ट्रेकिंग, हायकिंगची सवय, आवड, हौस असेल तर हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्य़ातील तिर्थन व्हॅलीला अवश्य भेट द्या. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या बफर झोनमधील या खोऱ्यातील निसर्गसौंदर्य आणि शांतता तुमच्या सुट्टीला अविस्मरणीय करेल. तिर्थन नदीच्या कुशीत सुमारे सव्वापाच हजार फुटांवर वसलेली नगिनी, गुशैनी, बंजर, शोजा सारखी इथली छोटी छोटी गावं आणि तिथले शांत निवांत वातावरण अनुभवल्यावर आपल्या शहरी आयुष्याकडे परत फिरूच नये असं वाटतं. हिमालयाचाच आश्रय घ्यायचा असेल, तर उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्य़ातील मसुरी हा उत्तम पर्याय आहे. दिल्लीपासून सात तासांच्या अंतरावर असलेलं मसुरी गढवाल हिमालयात ६,१७० फुटांवर आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही इथले हवामान आल्हाददायक असते. केम्प्टी फॉल्सच्या कोसळत्या जलधारा, गन हिलकडे नेणारा रोप वे अशा आकर्षणांबरोबरच मसुरीमधून दिसणारा भोवतालचा हिमालय तुमच्या डोळ्यांबरोबर मनालाही गारवा देतो.

मात्र उन्हाळ्याचा ताप कमी करायला हिमालयातच जायला हवं असं नाही. भारताच्या दक्षिणेला वळलात तर गर्द जंगलाने वेढलेल्या आणि घाटमाथ्यावर स्थानापन्न झालेल्या ठिकाणांची कमतरता नाही. कर्नाटकातील चिकमंगळूर हे शहर या राज्यातील सर्वोच्च पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं आहे. कॉफी लॅण्ड म्हणून हा सगळा भाग प्रसिद्ध आहे. इथून मंगळूरुचा विमानतळ १७० कि.मी.वर तर बंगळुरूचा विमानतळ २५० कि.मी.वर आहे. रुक्मांगद राजाने आपल्या सर्वात लहान मुलीला हुंडा म्हणून हे शहर दिलं होतं, त्यामुळेच ‘लहान मुलीचं नगर’ या अर्थाने ‘चिकमंगळूर’ हे नाव रूढ झालं. या शहरात राहून तुम्ही भोवतालच्या कुद्रेमुख नॅशनल पार्कपासून ते बाबा बुढानगिरी पहाडातील केमनगुडी हिल स्टेशन्सपर्यंत अनेक निसर्गसुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. कृष्णराज वडियार महाराजांचे आवडते हिल स्टेशन असलेलं केमनगुडीला के आर हिल स्टेशन म्हणजे कृष्णराजेंद्र हिल स्टेशन म्हणूनही ओळखतात. केमनगुडीचा हब्बे फॉल, रोझ गार्डन, झेड पॉइंट, कलहट्टी फॉल आणि विरभद्रेश्वर मंदिर या स्थलदर्शनाचा आनंद घेताना सुट्टी कशी मजेत संपते कळतही नाही. तर हे आहेत काही पर्याय तुमची उन्हाळी सुट्टी थंडगार करू  शकणारे. अजूनही वेळ गेलेली नाही आणि सुट्टी संपलेली नाही, मग निवडा तुमचे ठिकाण आणि चला भटकायला.

समुद्राच्या सान्निध्यातील पुदुच्चेरी

ऐन उन्हाळ्यातही ज्यांना सागराच्या लाटा साद घालतात त्यांच्यासाठी एक झकास ठिकाण म्हणजे पॉण्डिचेरी. चेन्नईहून रस्त्याने फक्त तीन तासांत पॉण्डी गाठता येते. स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच अमलाखाली असलेल्या पॉण्डीवरचा फ्रेंच प्रभाव आजही इथल्या वास्तूंपासून ते खाद्याा संस्कृतीपर्यंत सर्वत्र अनुभवायला मिळतो. ऑरोविलो आणि श्री अरविंदाश्रम यामुळे पॉण्डीला आध्यात्मिक वलयही आहेच. पॅरॅडाइज बीच, ऑरो बीच,  पॉण्डिचेरी बीच, सेरेनिटी बीच यातून हवा तो किनारा निवडा आणि उसळत्या सागर लाटांचा आनंद मनमुराद लुटा. शिवाय पॉण्डी केंद्रशासित प्रदेश असल्याने इथे स्वस्त दरात मद्य मिळत असल्याने शौकिनांची चंगळ होते ती वेगळीच.

makarandvj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:35 am

Web Title: best places for summer vacation summer holiday
Next Stories
1 खाद्यवारसा : आंबा मोदक
2 सुंदर माझं घर : सीडीचा लखलखाट
3 शहरशेती : गॅलरीतील कंदभाज्या : कणघर
Just Now!
X