आत्माराम परब atmparab2004@yahoo.com

प्रत्येक पर्यटनस्थळाचा एक ठरावीक असा मोसम असतो. लडाखच्या बाबतीत अशीच परिस्थिती आपल्याकडे आहे. लडाखला जायचे म्हटले की केवळ जून ते सप्टेंबर एवढय़ाच काळात जाता येईल, असा अनेकांचा समज असतो. त्या काळात लडाखमध्ये भटकण्याच्या संधी असतात आणि त्या काळात या प्रदेशाचं सौंदर्य पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतोच. पण सरत्या हिवाळ्यातलं लडाख पाहण्याची मजा काही औरच असते. हे गोठलेलं लडाखही पर्यटकांना भुरळ घालेल, असंच असतं. या काळात विलोची झाडं पिवळ्याधमक शेंडय़ांनी बहरलेली असतात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे लडाखी घरांच्या अंगणात आणि रस्त्याच्या कडेने अगदी व्यवस्थित लावलेली जर्दाळूची झाडं दिसतात. यांना बहर येतो तो मार्च-एप्रिलमध्ये. चेरी ब्लॉसम, टय़ुलिपचा बहर पाहण्यासाठी अनेक पर्यटक परदेशात जातात. लडाखमध्ये जर्दाळूचा बहर तसा दुर्लक्षित राहतो. या काळात सुंदर फुले लगडलेली जर्दाळूची शेकडो झाडे पाहणं हा वेगळाच अनुभव असतो. हा बहर पाहायचा असेल तर १५ मार्च ते २५ एप्रिल हा सर्वात उत्तम काळ ठरतो. द्रास-कारगिल, दाह आणि हानू, बीमा या भागातच जर्दाळूची ७० टक्के लागवड करण्यात आली आहे. विमानाने थेट लेह गाठायचे. वातावरणाशी जुळवून घ्यायचे आणि तिथून रस्तामार्गे या ठिकाणांना भेटी द्यायच्या. जर्दाळूचा बहर अनुभवण्यासाठी किमान पाच दिवसांचे नियोजन करावे लागेल. या काळात काही ठरावीक हॉटेल्सच उघडी असतात. त्यामुळे त्याचे नियोजन येथून जातानाच करावे. तसेच वाहनव्यवस्थेबद्दलदेखील बोलून घ्यावे.