मानवी उत्क्रांतीनंतर बैलगाडीच्या, घोडागाडीच्या सोबतीला सायकलीचा शोध लागला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एखादी व्यक्ती त्या काळात सायकलीचा वापर करत असेल तर त्या व्यक्तीला सधन मानले जायचे. सायकल घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. त्यानंतर जसजशी प्रगती होत गेली, शिक्षणासह समाजाचा, बाजारपेठांचा विकास जसा झाला तसतसे प्रत्येकाच्या घरासमोरची सायकलीची जागा ही दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी घेतली. बदलत्या जागतिकीकरणासोबत सायकल वापरणे हे कालबाह्य़ झाले होते. मात्र ‘इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते’ या उक्तीप्रमाणे दुचाकी, चारचाकी वाहनांसोबत घरासमोर एक सायकलही पुन्हा दिसू लागली. वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी, वाहतूक कोंडीत अडकू नये, तसेच व्यायाम यासाठी सायकलीचा वापर अधिक होऊ लागला. अगदी १० हजार ते लाखो रुपये किमतीच्या विविध उत्पादनांच्या सायकली बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. काहींनी तर ‘सायकल टू वर्क’ ही मोहीमही सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक जण जवळच्या अंतरावरील कार्यालयात जाण्यासाठी वाहनाऐवजी सायकलीचाच वापर करतात. दरम्यान सायकल वापरणाऱ्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन त्याला बदलत्या तंत्रज्ञानाचीदेखील साथ मिळाली आणि सायकलीसोबत त्यावर आधारित पूरक अ‍ॅप्लिकेशनही बाजारात आले. सध्या स्मार्ट मोबाइलच्या जीपीएस आणि ब्लूटूथशी कनेक्ट करावी लागणारी ही निरनिराळी अ‍ॅप्लिकेशन्स सायकल चालवणाऱ्यांमध्ये  लोकप्रिय ठरू लागली आहेत. अशाच काही सायकल वापरण्यासंबंधित लोकप्रिय अ‍ॅपविषयी..

‘स्त्राव’

सायकल चालवणाऱ्यांमध्ये ‘स्त्राव’ हे अ‍ॅप्लिकेशन सर्वाधिक लोकप्रिय आहे. सायकलस्वार जेव्हापासून सायकल चालवण्यास सुरुवात करतो ते अगदी सायकलीवरून उतरून सायकल चालवणे बंद करेपर्यंतचा सर्व प्रवास या अ‍ॅप्लिकेशनमध्ये टिपला जातो. सायकल कोणत्या ठिकाणी नेली, सायकल चालवण्याचा प्रदेश कसा आहे, किती वेळ सायकल चालवली याची सर्व माहिती या अ‍ॅप्लिकेशद्वारे सायकल चालवताना सायकलस्वाराला मिळते. सायकल चालवल्यामुळे किती प्रमाणात कॅलरीज बर्न झाल्या याचीही माहिती सायकलस्वाराला मिळते. भविष्यातील अधिकाधिक सायकल चालवण्याचे एक ठरावीक टार्गेटदेखील अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात येते. सायकलस्वाराचा सायकल चालवण्यासंबंधीचा हा सर्व आलेख फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपसारख्या इतर समाजमाध्यमांवरदेखील शेअर करता येते. तसेच वेगवेगळ्या सायकलस्वारांना या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून फॉलो करता येते, जेणेकरून फॉलो करणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या सायकलस्वाराच्या सायकल चालवण्याविषयीच इत्थंभूत माहिती मिळण्यास मदत होते. हे अ‍ॅप्लिकेशन  आयओएस आणि अ‍ॅन्ड्राईड या दोन्ही ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.

कोमूत

या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून सायकलस्वाराला त्याने किती, कुठे सायकल चालवली याची इत्थंभूत माहिती मिळते. तसेच या अ‍ॅप्लिकेशनमधील विशेष बाब म्हणजे सायकलस्वाराने कोणत्या रस्त्यावरून किती अंतर सायकल चालवली याचीदेखील माहिती सायकलस्वाराला या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळते. जसे सायकलस्वाराने डांबरी रस्त्यावरून, कच्च्या रस्त्यावरून तसेच डोंगरदऱ्यातील रस्त्यांवरून सायकल चालवली असल्यास त्याची माहिती अ‍ॅप्लिकेशनद्वारे सायकलस्वाराला मिळते. गिर्यारोहण करताना आवश्यक माहिती पुरवणारे कोमूत अ‍ॅप्लिकेशन आहे. योग्य रस्ता या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कळत असल्याने अनेक गिर्यारोहक कोमूतचा वापर करतात.

सिटीमॅपर या अ‍ॅप्लिकेशनचीदेखील सायकलस्वारांमध्ये बरीच चर्चा आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सायकल चालवताना अतिशय उपयोगी पडणारे असे हे अ‍ॅप्लिकेशन असल्याचे वापरकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. कारण गुगल मॅपशी संलग्नित असे हे अ‍ॅप्लिकेशन सायकल चालवताना कोंडीचा अडथळा होणार नाही यासाठी कोणत्या भागातून सायकल चालवा याचे मार्गदर्शन करत असते. जगातील अनेक देशांमध्ये सायकलस्वार शहरी भागात सायकल चालवण्यासाठी सिटीमॅपर या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करतात. तसेच वाटेतील महत्त्वाच्या ठिकाणांची माहितीदेखील हे अ‍ॅप्लिकेशन वापरकर्त्यांला वेळोवेळी देत असते.

राइड विथ जीपीएस

दूरवर जाणाऱ्या सायकलस्वारांसाठी राइड विथ जीपीएस हे अ‍ॅप्लिकेशन अतिशय उत्तम अ‍ॅप्लिकेशन आहे. डोंगरदऱ्यातून प्रवास करणाऱ्या सायकलस्वारांना सायकल चालवताना हे अ‍ॅप्लिकेशन चांगले मार्गदर्शन करते. माऊंटन सायकलिंग करणारे सायकलस्वार राइड विथ जीपीएस या अ‍ॅप्लिकेशनचा सर्वाधिक वापर करतात. अ‍ॅप्लिकेशन वापरताना मोबाइलवर डोंगरदऱ्यांची थेट प्रतिकृती पाहता येत असल्याने सायकलस्वाराला एक विलक्षण अनुभव मिळतो. या अ‍ॅप्लिकेशनद्वारेही किती अंतर सायकलीने कापले गेले याचीही माहिती सायकलस्वाराला मिळते. या अ‍ॅप्लिकेशनवर हौशी सायकलस्वारांचे समूह तयार करता येत असून या समूहांमध्ये आपल्यालादेखील सहभागी होता येते. हे अ‍ॅप्लिकेशन आयओएस आणि अ‍ॅन्ड्राईड या दोन्ही ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.

संकलन – ऋषिकेश मुळे