वैभव भाकरे

बीएमडब्ल्यूचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर दिमाखदार आणि रुबाबदार गाडय़ा उभ्या राहतात. बीएमडब्ल्यूची ३ सीरिज, ५ सीरिज, ७ सीरिजच्या गाडय़ा सेडान श्रेणीत लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स एसयूव्हीची एक्स सीरिज, अधिक इंजिन शक्ती असणारी एम सीरिज या सर्व गाडय़ांचे जगभरात चाहते आहेत. पण बीएमडब्ल्यूचा इतिहास केवळ महागडय़ा गाडय़ांच्या निर्मितीपुरता मर्यादित नाही. बीएमडब्ल्यूने ५० आणि ६० च्या दशकात उत्पादित केलेली ‘आयसेटा’ ही त्यांची सर्वात छोटी गाडी होती.

आज छोटय़ा गाडय़ा म्हटले की लगेच मिनी कूपर किंवा फियाट ५०० या गाडय़ांचा उल्लेख होतो. काही वेळा त्यात फोक्सवॅगनची बीटल आणि आपली भारतीय नॅनो देखील समाविष्ट केली जाते. पण छोटय़ा गाडय़ांचा इतिहास हा फारच रोचक आहे. कार कंपन्यांचा इतिहास तुम्ही पाहिलात, तर तुम्हाला जाणवेल की ‘छोटी गाडी’ ही संज्ञा त्यांनी शब्दश: घेऊन जगावेगळ्या गाडय़ांची निर्मिती केली. आयसेटाची निर्मिती आयएसओ या इटलीतील कंपनीकडून करण्यात आली होती. १९५०च्या दशकात ही कंपनी मुख्यत: स्कूटर आणि रेफ्रिजिरेटर निर्माण करायची. ‘आयएसओ’चे मालक रेंझो रिवोल्टा यांनी मोठय़ा प्रमाणात उत्पादन करता येण्यासारखी लहान गाडी तयार करायचे ठरवले. १९५२ मध्ये ‘आयएसओ’ मोटो २०० मोटारसायकलचे इंजिन लावून एक गाडी तयार करण्यात आली आणि तिचे आयसेटा म्हणून नामकरण करण्यात आले. आयसेटाचा अर्थ म्हणजे लहान आयएसओ.

आयसेटानंतर स्पोर्ट्सकार निर्मितीचा ‘आयएसओ’ या कंपनीचा मानस होता. १९५४ मध्ये बीएमडब्ल्यूने आयसेटाच्या परवान्यासह बॉडी टुलिंगचे हक्क देखील घेतले. आणि एप्रिल १९५४ मध्ये बीएमडब्ल्यूची आयसेटा बाजारात दाखल झाली. बीएमडब्ल्यूला या पिटुकल्या गाडीत रस असण्याचे एक वेगळे कारण होते. जर्मनीमध्ये त्याकाळी बाईकचा परवाना असल्यावरही छोटी गाडी चालवण्याची मुभा होती. मायक्रोकार या श्रेणीत मोडली जाणारी आयसेटा अर्जेटिना, फ्रान्स, स्पेन, ब्राझील, जर्मनी, ब्रिटन या देशांत विकली जात होती.

अंडय़ासारखा आकार आणि बुडबुडय़ासदृश काचेची रचना यामुळे या गाडीला ‘बबल कार’ म्हणून देखील संबोधले जात होते. गाडीची इंधन कार्यक्षमता ही अत्यंत चांगली होती. ही जगातील सर्वाधिक विक्री झालेली एक सिलिंडरची कार ठरली. या गाडीच्या उत्पादनदरम्यान एकूण १६ लाखांहून अधिक गाडय़ांची विक्री झाली होती. आकाराने जगातील सर्वात छोटय़ा गाडय़ांपैकी एक असलेल्या आयसेटाची रचना चक्रावून टाकणारी होती. या गाडीला पाहिल्यावर खरंच या गाडीतून लोक प्रवास करत होते का, हा प्रश्न मनात डोकावल्यावाचून राहात नाही.

चारचाकी आयसेटला केवळ एक दरवाजा होता आणि तो देखील गाडीच्या समोरच्या बाजूला. गाडीचा आकार कमी करण्यासाठी कमालीच्या तडजोडी करण्यात आल्या होत्या. गाडीचे स्टिअरिंग हे दरवाजालाच जोडले होते. दार उघडल्यावर हे स्टिअरिंग डाव्या बाजूला सरकेल अशी यंत्रणा करण्यात आली होती. जेणेकरून चालकाला गाडीत सहज प्रवेश करता यायचा. गाडीच्या मागच्या दोन चाकांमधील अंतर कमी असल्याने ही गाडी तीनचाकी वाटत असे. तीनचाकी आयसेटाचे देखील उत्पादन करण्यात आले होते. मात्र बीएमडब्ल्यूने निर्माण केलेल्या सर्व आयसेटा या चारचाकीच होत्या. आधीच्या आयसेटाची इंधन क्षमता ही २५० सीसी इतकी होती, नंतर ही क्षमता वाढवून ३०० सीसी एवढी करण्यात आली होती. गाडीच्या हॉर्सपॉवरमध्ये देखील वाढ झाली आणि गाडीची ताकद १२ हॉर्सपॉवर वरून १३ हॉर्सपॉवर झाली. बीएमडब्ल्यूने कालांतराने या गाडीच्या सुधारित आवृत्या देखील बाजारात दाखल केल्या. १९६२ पर्यंत या गाडय़ांची निर्मिती करण्यात आली. पुढे कंपनीच्या गाडी निर्मितीच्या धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे आयसेटाचा प्रवास थांबला.

आज बीएमडब्ल्यू बदलली आहे. जास्त ताकदीच्या दिमाखदार गाडय़ा ही या कंपनीची ओळख आहे. पण आजही या कंपनीच्या प्रवासातील आयसेटा हा ‘छोटासा’ मैलाचा दगड या कंपनीची नव्यानेच ओळख करून देतो.