डॉ. शुभांगी महाजन

वाढत्या वयाबरोबर त्वचा आणि स्नायू यांच्यात बदल होतात आणि त्वचेवर सुरकुत्या वाढण्यास सुरुवात होते. बोटय़ुलिनम टॉक्सिन या इंजेक्शनचा वापर करून या सुरकुत्या घालवता येतात.

बोटय़ुलिनम टॉक्सिन (बोटॉक्स) म्हणजे काय?

बोटय़ुलिनम टॉक्सिन हे क्लॉस्ट्रिडीअम बोक्युलिनम नावाच्या जिवाणूपासून मिळवले जाते. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून शुद्ध आणि सौम्य स्वरूपात त्याचे इंजेक्शन तयार केले जाते. हे इंजेक्शन चेहऱ्यावरील स्नायूंमध्ये योग्य प्रमाणात दिल्यानंतर स्नायूंना शिथिल करून सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

बोटय़ुलिनम टॉक्सिन इंजेक्शनचे फायदे

*  आपण हसताना, बोलताना किंवा इतर हावभाव देताना चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या स्पष्टपणे उमटून दिसतात, त्या कमी करून चेहरा तरुण दिसण्यास मदत होते.

*   कमी वेळात होणारी प्रभावी उपचारपद्धती आहे.

*   अगदी छोटय़ा इंजेक्शनचा (insuline sprige) वापर करून इंजेक्शन देण्यात येतात. त्यामुळे फार वेदना होत नाहीत.

*   इंजेक्शनचा प्रभाव पाच-सात दिवसांत दिसायला सुरुवात होते आणि हा प्रभाव चार-सहा महिने टिकतो.

वापर कुठे?

*   कपाळावरील सुरकुत्या

*   रागीट हावभाव देताना भुवयांच्यामध्ये उमटणाऱ्या सुरकुत्या

*   हसताना डोळ्यांच्या बाजूला पडणाऱ्या सुरकुत्या

*   हसताना नाकावर येणाऱ्या सुरकुत्या

*   हसताना दिसणाऱ्या हिरडय़ा लपवण्यासाठी

*   ओठांभोवती सुरकुत्या

*   मानेवरील सुरकुत्या

*   चेहऱ्यावरील सुरकुत्यांशिवाय बोटय़ुलिनम टॉक्सिनचा उपयोग काखेत किंवा तळहातावर येणारा प्रचंड घाम कमी करण्यासाठी. मायग्रेन डोकेदुखीसाठी आणि स्नायूंची ताठरता कमी करण्यासाठीही होतो.

काळजी काय घ्यावी?

*    गर्भवती, स्तन्यपान देणाऱ्या महिलांनी बोटय़ुलिनम टॉक्सिन इंजेक्शन घेऊ नये.

*    बोटय़ुलिनम टॉक्सिन इंजेक्शनची अ‍ॅलर्जी असल्यास ते घेणे टाळावे.

*   इंजेक्शन द्यायच्या जागी जर काही इन्फेक्शन असेल तर इंजेक्शन घेणे टाळावे.

*   जर तुम्ही रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे सेवन करत असाल, तर ती औषधे इंजेक्शन घ्यायच्या कमीत कमी सात दिवस आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद करावी.

*   बोटय़ुलिनम टॉक्सिन इंजेक्शन प्रशिक्षित त्वचारोगतज्ज्ञ किंवा सौंदर्यतज्ज्ञांकडूनच घ्यावे.

*    इंजेक्शन घेतल्यानंतर सहा-सात तास झोपू नये. वाकून कोणतेही काम करू नये. इंजेक्शनच्या जागी मसाज करू नये.

*   २४ तासांपर्यंत चेहरा धुऊ नये.