सुहास जोशी

मुंबईतल्या मशीद बंदर, काळबादेवी, जव्हेरी बाजार या परिसरात अनेक विशेष पदार्थ मिळतात. तिथे वेगवेगळ्या समाजांच्या खाद्यसंस्कृतीचा ठसा या उमटलेला दिसतो. खिचा पापड, दाबेली, फराळी पॅटीस, फाफडा जिलेबी असे कैक प्रकार येथे मिळतात. त्यापैकीच एक थोडा वेगळा प्रकार म्हणजे पुडला आणि ब्रेड पुडला.

येथील पदार्थामध्ये बेसनचा खच्चून वापर असतो. पुडलादेखील बेसनपासूनच केला जातो, मात्र हा पदार्थ न तळता केलेला असल्याने खाण्यास बराच म्हणावे लागेल. पातळसर केलेले बेसन डोश्याच्या तव्यावर डोश्याच्या आकारात पसरवले जाते. त्यावर बटर, थोडी मसाला पावडर टाकली जाते. त्यानंतर आल्याचे अगदी बारीक तुकडे (मटण खिम्याप्रमाणे) आणि वर कोथिंबीर भुरभुरवतात. फार खरपूस, कडक न करता पालटून पुन्हा भाजतात. ब्रेड स्लाइसबरोबर किंवा नुसतेच खाण्यास दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे ब्रेड पुडला. यामध्ये ब्रेडचे दोन स्लाइस पिठात बुडवून तव्यावर भाजले जातात. हा काहीसा अंडय़ाच्या फ्रेंच टोस्टसारखा प्रकार. सोबत दोन-तीन प्रकारच्या चटण्या, हवा असल्यास कांदादेखील. तसेही इथे कांदा-लसूण न खाणाऱ्यांची गर्दी अधिक असते.

हा प्रकार मशीद बंदर येथील एका छोटय़ा बोळकंडीत मिळतो. तिथेच खिचा पापड वगैरे रेलचेलदेखील आहे. विशेष म्हणजे इथे जिलेबी आणि बडी गाठी अशी जोड असते. नेहमीपेक्षा चांगलीच जाडसर अशी ही बडी गाठी जोडीला मिरची किंवा मोसमानुसर कैरी. एकदा का या गल्लीत गेलं की पोटभर खाण्याची चैनच असते. आणि महत्त्वाचे म्हणजे ती खिशाला परवडतेही.