लडाख इतर पर्यटनस्थळांपेक्षा खूपच वेगळं आहे. प्राणवायू आणि हिरवाई कमी असलेल्या या अतिउंचावरील थंड प्रदेशात वातावरणाशी जुळवून घेणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे एकदम अतिउंचावर जाण्यापेक्षा हळूहळू उंची गाठणं कधीही श्रेयस्कर. विमानाने लेहला जायचं आणि लगेच भटकायला सुरुवात करायची हे टाळायला हवं. श्रीनगरहून कारगिल आणि मग लेह असा प्रवास करणं उत्तम. या प्रवासाचा वेळ सत्कारणी लागतो तो वाटेवरील अनेक नयनरम्य ठिकाणांमुळे. थेट लेहला गेलात तरी किमान दोन दिवस तरी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी द्यावेत.

श्रीनगर सोडल्यावर सोनमर्गपर्यंत टिपिकल काश्मिरी निसर्गसौंदर्य दिसतं. झोजिला पास पार केला की लडाखची ओळख असलेल्या ओसाड डोंगरांची रांग सुरू होते. धर्म, संस्कृतीतील बदल जाणवू लागतात. भाषा, घरांची रचना, जीवनपद्धतीत फरक जाणवू लागतो. तुमच्याकडे वेळ असेल तर कारगिलहून थोडं आतल्या बाजूला जावं. तिथे बटालिक सेक्टरमध्ये दाह आणि हानू ही आर्याची खेडी पाहता येतील. येथील संस्कृती लडाखपेक्षा वेगळी आहे. येथूनच पुढे सिंधू नदी पाकिस्तानात जाते. तिथे ‘होम स्टे’चे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

इकडे जायचं नसेल तर मग झंस्कार व्हॅलीत जाऊ  शकता. आधी सुरु व्हॅलीत नून आणि कून ही लोकप्रिय हिमशिखरं दिसतात. झंस्कार व्हॅलीत ड्रँगड्रँग ही बारमाही हिमनदी अनुभवू शकता. यासाठी कारगिलहून थोडं आत जावं लागेल. पुन्हा कारगिलहून लेहला येणं चांगलं. या वाटेवर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.

सुरुवात होते ती मुलबिक या लहानशा पण महत्त्वाच्या बौद्ध मठापासून (मॉनेस्ट्री). येथून पुढे एकूणच वातावरण बुद्धमय झाल्याचं जाणवतं. वाटेत आल्ची येथे चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जलविद्युत प्रकल्पाचा नयनरम्य नजारा पाहता येतो. येथील अकराशे वर्षे जुना बौद्ध मठ आणि लामा युरु हा सर्वात मोठा मठ पाहण्यासारखा आहे. तसेच लामा युरुजवळ चांद्रभूमीप्रमाणे खाचखळगे असलेला प्रदेश (मूनलॅण्ड) आहे.

वातावरणाशी जुळवून घेत लेहला पोहोचल्यावरदेखील लगेच धावतपळत भटकायची गरज नाही. किमान एक दिवस लेहमध्येच मुक्काम करून स्थानिक भटकंती करावी. थिकसे आणि हेमिस मॉनेस्ट्री या चाळीसएक किलोमीटरच्या परिसरात आहेत. त्यांना भेट द्यावी. दोन रात्री लेहमध्ये काढून मग नुब्रा व्हॅलीला जाताना जगातील सर्वात उंचावरील वाहतुकीचा रस्ता असलेल्या खारदुंगला पासवरून प्रवास करावा. नुब्रा व्हॅलीत जुन-जुलैमध्ये बर्फ वितळू लागतं. त्यामुळे बरीच हिरवळ असते. त्यांची शेतीदेखील याच काळात होते. येथील डिस्किटमध्ये तुम्ही लेहपेक्षा दीडएक हजार फूट कमी उंचीवर असता. येथे होम स्टे, छोटी हॉटेलं किंवा कॅम्पिंगचा आनंद घेऊ  शकता. लडाखी गावात राहण्याचा आनंद मिळतो. येथील हूंडरचं वाळवंट आवर्जून पाहावं. ‘डबल हंप’ असणाऱ्या मंगोलियन उंटावरून या वाळवंटात भटकता येतं. एका बाजूला श्योक नदी, पुढे वाळवंटातील उंट आणि मागे बोडक्या डोंगरांच्या माथ्यावर साचलेलं बर्फ असे अनोखे छायाचित्र टिपण्याची मजा इथे मिळते. तुर्तूक या भारतीय सीमेवरील शेवटच्या गावाला भेट देता येते. हे गाव लडाखमध्ये असलं तरी इथली संस्कृती भिन्न आहे.  चार अधिक दिवस हाताशी ठेवावेत आणि आडवाटा धुंडाळाव्यात. त्यासाठी आत्तापासून सुट्टीचे आणि प्रवासाचे नियोजन करायला घ्यावे.

लडाखमधील महोत्सव

लडाख फेस्टिव्हल – सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या महोत्सवात संपूर्ण लडाखच्या संस्कृतीचे दर्शन घडते. येथील १७  प्रमुख जमातींच्या पूर्ण पारंपरिक पोशाखातील नृत्यादी कलांचा आनंद घेता येतो.

सिंधू फेस्टिव्हल – जूनमध्ये होणारा हा महोत्सव मुख्यत: सिंधू नदीच्या पूजनाशी संबंधित आहे.

हेमिस फेस्टिव्हल – जूनमध्ये होणारा हा फेस्टिव्हल मुख्यत: धार्मिक महोत्सव आहे. लडाखमधील अनेक मॉनेस्ट्रीजमध्ये वर्षभर छोटेमोठे धार्मिक उत्सव होतात. पण हेमिस उत्सव पर्यटनाच्या मोसमात होत असल्याने पर्यटकांना त्याचा आनंद घेता येतो.

येथे तैनात सेना दलाशी संवाद साधायचा असेल तर कारगिल विजय दिन (२६ जुलै), स्वातंत्र्यदिनी जाण्याचे नियोजन करू शकता.

भटकंतीचे पर्याय

  • श्रीनगर-कारगिल-लेह-नुब्रा व्हॅली-पेंगाँग लेक-लेह-मनालीमार्गे चंदिगडहून मुंबई किंवा लेहहून विमानाने थेट मुंबई यासाठी किमान आठ दिवस लागतात.
  • लेहला पोहोचताना कारगिलबरोबर चुषुल, हॅन्ले, सोमोरीरीवरून सोकर पाहायचे असेल तर ११ दिवस हवेत.
  • लेहला पोहोचाताना कारगिलबरोबर दाह आणि हानू व झंस्कार व्हॅलीला जायचे असेल तर १३ दिवस हवेत.

आरोग्याची काळजी

  • भरपूर पाणी प्यावे आणि शारीरिक कष्ट टाळावेत.
  • भीमसेनी कापूर जवळ बाळगावा. ज्यांना सल्फरची अ‍ॅलर्जी नसेल त्यांनी ‘डायमॉक्स’ गोळ्या घ्याव्यात, अ‍ॅलर्जी असेल त्यांनी होमिओपॅथीच्या ‘कोका ३०’ या गोळ्या घ्याव्यात.
  • पेंगाँग लेकला हल्ली कॅम्पिंग किंवा होम स्टेचे पर्याय आहेत. पण त्यासाठी तेथे रात्री उणे चार अंशापर्यंत उतरणाऱ्या तापमानात राहण्याची तयारी ठेवावी.
  • अतिउंचावरील पर्यटनस्थळांशी लडाखच्या वातावरणाची तुलना होऊ शकत नाही. उगाचच फाजील आत्मविश्वास बाळगू नये.