कार किंवा एसयूव्ही प्रकारातील वाहन आकर्षक दिसण्यासाठी, कोणी ठोकरल्यास बंपरचे संरक्षण होण्यासाठी काही वर्षांपूर्वीपासून वाहनांना मागे-पुढे बंपर गार्ड (बुल गार्ड) सर्रास लावण्यात येत होते. काही महिन्यांपूर्वीच सरकारने या बंपर गार्डवर बंदी लादली असली तरी आजही बऱ्याच वाहनांना ते लावलेले दिसत आहेत. सुरक्षा सप्ताहानिमित्त त्याच्या फायद्यातोटय़ांचा आढावा..

भारतीय बाजारात कोणतीही कार एखाद्या कंपनीने उतरवायची म्हटल्यास भारतीय नियमावलीनुसार ती बनवावी लागते आणि सर्व परवानग्यांनंतरच ती विकली जाते. मात्र, विक्रीपश्चात त्यात बदल करणारे हौशे-नवशे बरेच असतात. रंग बदलणे, आकर्षक दिसण्यासाठी पट्टे मारणे, साधी चाके असल्यास ती बदलून अलॉय व्हील बसविणे आणि काही वेळा तर चक्क दोन कार कापून ती लांबलचक लॅम्बॉर्गिनीसारखी बनविणे असले प्रकार केले जातात. कारच्या प्रारूपात असे बदल खरेच सुरक्षित आहेत का, याचा विचारही केला जात नाही. त्यातलाच एक प्रकार म्हणजे बंपर गार्ड.

एसयूव्ही आकर्षक दिसण्यासाठी बंपर गार्ड लावणे किंवा दुसऱ्या वाहनाने धडक दिल्यास स्वत:च्या वाहनाचे फारसे नुकसान होऊ नये म्हणून काही कारण असो. बंपर गार्ड हा समोरील आणि वाहनातील दोन्हींसाठी जीवघेणा ठरू शकतो. याच कारणातून परिवहन मंत्रालयाने मागील वर्षांच्या शेवटाला बंपर गार्डवर बंदी आणली आहे. तसेच कायद्यात बदल करत एक ते पाच हजारांपर्यंत दंडाची तरतूदही केली आहे. याचसोबत बंपर गार्डची विक्री करणाऱ्यासही दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

बंपर गार्ड वाहनाला सुरक्षा पुरवतो, अशा समजातून वाहनांच्या मागे-पुढे लावला जातो. मात्र, हाच गार्ड पादचाऱ्यांबरोबर वाहनात बसलेल्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. एखाद्या अपघातात पादचाऱ्याला किंवा दुचाकीस्वाराला ठोकरल्यास त्या व्यक्तीस जबर दुखापत होते. बऱ्याचदा डोक्याला किंवा पायाला फ्रॅक्चर होते. खरे तर बंपर हा फायबरचा का बनवला जातो ही बाब जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बंपर फायबरचा असल्याने लोखंडाच्या तुलनेत खूपच मऊ असतो. यामुळे वाहनाला कोणी आदळल्यास त्याच्या मऊपणामुळे दुखापत होण्याची तीव्रता कमी होते. तसेच आतमध्ये बसलेल्या वाहनधारकालाही आदळल्यानंतर कमी तीव्रतेचा धक्का बसतो. तेच वाहन एखाद्या झाडावर किंवा सुरक्षा भिंतीवर आदळल्यास आणि गार्ड असल्यास वाहनातील व्यक्तींना जोरदार धक्का बसतो. तोच नुसता बंपर असला असता तर तो धक्का बंपरने काही प्रमाणात सोसला असता. यामुळे वाहनातील व्यक्तींसाठीही जीवघेणे ठरू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून परिवहन मंत्रालयाने बंदी आणली आहे.

बंपर गार्डचे तोटे

बंपर गार्ड बसविलेल्या वाहनाच्या अपघातावेळी एअरबॅगच्या सेन्सरना धक्क्याची तीव्रता जाणवत नाही. परिणामी त्या उघडण्याची शक्यता कमी होते.

बंपर गार्डमुळे वाहनाचे वजन वाढत असल्याने मायलेजवरही त्याचा परिणाम जाणवतो. काही बंपर गार्डचे वजन हे जवळपास ५० किलो असते.

वाहन आदळल्यास आधी बंपर गार्डला मार बसतो. बंपर गार्ड वाकल्याने त्याचे काही भाग कारचा बंपर, बॉनेट, लाइट, इंडिकेटरसाख्या महत्त्वाच्या गोष्टींना निकामी करतो.

बदल कुठे तपासतात?

कारमध्ये बदल करणे आणि त्यास परवानगी मिळविणे ही खर्चीक बाब आहे. केलेले बदल बदल करणाऱ्या कंपनीकडून, उत्पादक कंपनीकडून आणि परिवहन विभागाच्या चाचणी केंद्रांवर तपासले जातात. अशी महाराष्ट्रात पुणे आणि अहमदनगरमध्ये दोन, तर डेहराडूनला एक केंद्र आहे.

नियम (सर्रास मोडले जाणारे)

हेडलॅम्प

हेडलॅम्पची लांबी, रुंदी आणि तिची जमिनीपासूनची उंची ठरवून दिलेली असते. निळ्या आणि पांढरा प्रकाश फेकणाऱ्या लाइटना परवानगी नाही.

वाहनाचा रंग

वाहनांच्या रंगावरही प्रतिबंध आहेत. ऑलिव्ह ग्रीन हा  रंग केवळ लष्कराच्या वाहनांना वापरला जातो. तो सामान्य वाहनांना लावण्यास बंदी आहे.

हॉर्न

११५ डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेच्या हॉर्नवर बंदी आहे. तसेच वेगवेगळ्या आवाजांतील हॉर्नवरही बंदी आहे.

सायलेन्सर

सायलेन्सर वाहनाच्या मागील बाजूला तोंड असलेला असावा. इतर कोणत्याही बाजूस सायलेन्सरमधून उत्सर्जन सोडू नये.

फॉग लाइट

जमिनीपासूची उंची मर्यादित. बीमचा वापरही नाही.

नंबर प्लेट

नंबर प्लेटचा मागील रंग, फॉन्ट स्टाइल, आकार आणि अंकांमधील अंतर नेमून दिलेले असावे. तसेच नंबर प्लेट केवळ इंग्रजी अंक आणि अक्षरांमध्ये असावी.

सन फिल्म

गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी सन फिल्मवर बंदी.