23 April 2019

News Flash

महिलांचा कर्करोगाशी लढा

गर्भशयाचा कर्करोग

(संग्रहित छायाचित्र)

गर्भशयाचा कर्करोग

प्रामुख्याने गर्भशयाच्या अस्तराचा कर्करोग यात आढळून येतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सात टक्के असून चार टक्के स्त्रियांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो.

प्रमुख कारणे

* कोणत्याही कारणास्तव शरीरातील इस्ट्रोजेन या संप्रेरकाचे प्रमाण अधिक असणे.

*  गर्भनिरोधक गोळ्यांचे अधिक काळपर्यंत सेवन/ मनानेच डोस ठरवून सतत गोळ्या घेत राहणे.

*  आयुष्याच्या संपूर्ण कालावधीत ठरावीक वेळेपेक्षा अधिक वेळा पाळी येत राहणे.

*  स्तनाच्या कर्करोगासाठी घेतली जाणारी टॅमोक्झिफेनसारखी काही औषधे

*  कधीही गर्भधारणा न होणे.

*  अधिक उष्मांकयुक्त व अधिक मेदयुक्त आहाराचे सतत सेवन

*  वयोपरत्वे वाढणारा धोका, तसेच जाड होणारे गर्भशयाचे अस्तर

* मधुमेह व लठ्ठपणा तसेच पीसीओएस विकार

लक्षणे

योनीमार्गातून रक्तस्राव/इतर प्रकारचा स्राव होणे, जेवताना पटकन पोट भरण्याची जाणीव होणे, ओटीपोटात दुखणे, पाळी गेल्यानंतर अनैसर्गिक रक्तस्राव होणे, डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान गर्भाशयाचा आकार बदललेला जाणवणे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग

योग्य वेळी निदान झाल्यास बरा होतो. कर्करोगाची पूर्वस्थिती या प्रकारात तपासता येते आणि योग्य वेळी औषधयोजना करता येते.

प्रमुख कारणे

*  ‘ह्युमन पॅपिलोमा वायरस’च्या संसर्गाचा धोका- काही स्त्रिया या विषाणूंना लढा देतात; परंतु काहींना मात्र यामुळे कर्करोग होतो.

*  धूम्रपान करणे

*  अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध असणे

*  कुटुंब नियोजनासाठी घेण्यात येणाऱ्या गोळ्यांचा अतिरेकी वापर

*  एचआयव्हीची बाधा झालेली असणे.

लक्षणे

सुरुवातीला काही लक्षणे दिसून येत नाहीत. शेवटच्या टप्प्यात वेदना होतात. शारीरिक संबंधानंतर योनीद्वारे रक्तस्राव होतो, नेहमीपेक्षा पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होतो, एरवी इतर स्रावही बाहेर येतात, ओटीपोटात दुखते.

विशेष तपासण्या

*  पॅप स्मिअर- गर्भाशय मुखावरील पेशी खरवडून काढून तपासणी केली जाते. यात कर्करोगाची आधीची अवस्थासुद्धा लक्षात येऊ  शकते. (Pre Cancerous )

*  काही वेळा कोलोनोस्कोपीपण केली जाते.

*  सीटी स्कॅन व एमआरआय केले जाते. पेट स्कॅनही (ढएळ रूंल्ल) करतात.

अंडाशयाचा कर्करोग

सहसा पन्नाशीनंतर आढळून येणारा हा कर्करोग असला तरी हा तरुण वयातही आढळून येतो. स्त्रियांना कर्करोगांपैकी या कर्करोगाने सर्वाधिक स्त्रिया मृत्युमुखी पडतात. प्रजनन संस्थेच्या कर्करोगांमध्ये अग्रेसर असणारा हा रोग असून याचे निदान शेवटच्या अवस्थेत होताना आढळून येते. निदानास कठीण असणारा हा कर्करोग आहे.

प्रमुख कारणे

वय, कौटुंबिक इतिहास, लहान वयातील गर्भधारणा, गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेकी वापर, वंध्यत्व व वंध्यत्वावरील उपचार, संप्रेरकांचा वापर, स्तनांचा कर्करोग असणे, एन्डोमेट्रिओसिस इत्यादी.

लक्षणे

योनीवाटे अनैसर्गिक रक्तस्राव होणे किंवा इतर प्रकारचे स्राव बाहेर येणे, ओटीपोटात वेदना होणे आणि दाब जाणवणे, पोट व पाठीत सतत दुखणे, सतत पोटफुगीचा त्रास होणे, थोडय़ाशा खाण्यानेही पोट भरल्याची लगेच जाणीव होणे.

विशेष तपासण्या

*  रक्त तपासण्या.

*  योनीमार्गातून सोनोग्राफी

*  एमआरआय, सीटी स्कॅन

*  बायोप्सी व फ्लुइडची तपासणी

स्तनांचा कर्करोग

३० टक्के स्त्रियांना हा कर्करोग आढळून येतो. त्यातील १४ टक्के स्त्रियांना मृत्यूला सामोरे जावे लागते, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. तीनपैकी दोन स्त्रिया ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आढळून येतात. योग्य वेळी निदान झाल्यास पूर्णपणे बरे होता येते.

प्रमुख कारणे

*  कौटुंबिक इतिहास- आई, बहीण किंवा मुलीला कर्करोग असणे. यामुळे शक्यता दुप्पट होते. सख्या नातेवाईकांमध्ये दोन जणांना असा आजार असेल तर शक्यता वाढते.

*  काही विशिष्ट जनुकांमधील उत्परिवर्तन

*  कधीही गर्भधारणा न होणे, खूप उशिरा गर्भधारणा होणे.

*  स्तनांच्या पेशी अतितंतुमय व अति ग्रंथीयुक्त असणे, स्तन खूप मोठे असणे.

*  कुटुंब नियोजनासाठी गोळ्यांचा अतिवापर करणे, वंध्यत्वाची चिकित्सा घेणे.

*  पाळी गेल्यानंतर संप्रेरकांच्या गोळ्या/इंजेक्शने/पॅचेसचा वापर अतिप्रमाणात करणे.

*  रेड मीट व अल्कोहोल पेयाचे अतिरेकी सेवन करणे

*  वजन वाढणे- वजन जास्त असल्यास इस्ट्रोजेन संप्रेरक जास्त असते.

प्रमुख लक्षणे

स्तनात वा काखेत गाठ / गाठी जाणवणे, स्तनाग्रांचा आकार बदलणे, स्तनाग्रे आत खेचली जाणे, स्तनाग्रातून रक्तसदृश्य किंवा इतर स्राव येणे, स्तनाग्रांच्या भोवताली असलेल्या त्वचेच्या रंगात बदल होणे, त्वचेच्या खपल्या पडणे, स्तनांमध्ये विचित्र संवेदना जाणवणे, वजन कमी होणे, स्तनांवर रक्तवाहिन्यांचे जाळे जाणवणे.

विशिष्ट तपासण्या

*  शारीरिक तपासणी- स्तन व काखेची

*  मॅमोग्राफी (स्तनांचा एक्स-रे)

*  सोनोग्राफी / एमआरआय

*  बायोप्सी- स्तनातील गाठीचा भाग / गाठीतील द्रवाची तपासणी

प्रतिबंधात्मक सूचना

*  पॅप स्मिअर-  ही चाचणी २१ वर्षे ते ६५ वर्षे वयाच्या दरम्याने नियमित करून घ्यावी.

*  एचपीव्हीचे लसीकरण करून घ्यावे.

*  विडी/ सिगारेट/ तंबाखू सोडण्याचे प्रयत्न करावे. यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा संभव वाढतो. मद्यपानास आळा घालावा.

*  उंची व वजन यांचा आलेख साधावा (बीएमआय )

*  कौटुंबिक इतिहास असेल तर बीआरसीए १ आणि बीआरसीए २ या जनुकांची तपासणी करून घ्यावी.

*  चाळिशीनंतर नियमित स्तनांची तपासणी करावी. नियमित मॅमोग्राफी, सोनोग्राफी करावी.

*  ताजी फळे, आणि पालेभाज्यांचा वापर आहारात भरपूर समावेश करावा.

*  कडधान्ये सालासकट वापरावीत तसेच मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात नियमित समावेश करावा. पानकोबी, फुलकोबी,

ब्रोकोली, आवळा, लिंबू, लसूण, आले, द्राक्षे, हळद, दालचिनीचा प्रामुख्याने आहारात समावेश करावा. यातील विशिष्ट तत्त्वे कर्करोगास लढा देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

*  उत्तम प्रथिने वजनाला ०.८ ते १ ग्रॅम या प्रमाणात रोज घ्यावीत.

*  मेदयुक्त पदार्थाचे सततचे सेवन टाळावे. जंक फूड टाळावे.

*  रोज पुरेसा व्यायाम गरजेचा आहे.

*  विनाकारण वजन कमी होणे, सतत ताप येणे, अनैसर्गिक रक्तस्राव, लघवी व संडासच्या चक्रातील अनैसर्गिक बदल जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा लवकर सल्ला घेणे.

First Published on February 5, 2019 12:18 am

Web Title: cancers in women women fight against cancer