देवेश गोंडाणे

हैद्राबाद, उन्नाव येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच नागपूरनजीकच्या कळमेश्व्र येथे अवघे ५ वर्षे वय असलेल्या चिमूरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न केले. वारंवार घडणारे बलात्कार, अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक वातावरण हादरून गेले आहे. अत्याचाराच्या घटनांमुळे समाजमन पेटलेले असले तरी, त्यावर उपाययोजना करण्यासाठी उचलली जाणारी पावले पुरेशी नाही हे दिसून येते. ते थांबवायचे असेल तर संस्कारक्षम शिक्षण, लैंगिक शिक्षणाचे धडे द्यावे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा असा सूर काही तरुणाईचा होता तर काहींनी संताप व्यक्त करीत स्फोटक प्रतिक्रिया दिल्या. अशा घटनांवर सारखी मेणबत्तीच का जाळायची. कायदा महिलांचे रक्षण करू शकत नसेल तर प्रत्येक वेळी मेणबत्ती जाळण्यापेक्षा एकदाच..! मग सर्वाचे डोळे उघडतील. दरवर्षी रावणाच्या पुतळयाचे दहन करण्यापेक्षा अशा बलात्कारी रावणांना जाळले तर देश सुधारेल असा संताप तरुणाईने व्यक्त केला.

वारंवार घडणारे बलात्कार, अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक वातावरण हादरून गेले आहे. त्यामुळे हैद्राबाद येथील बलात्काराच्या आरोपींचा करण्यात आलेल्या एन्काउंटरचे समाजमाध्यमावर काही तरुणाईकडून स्वागत करण्यात आले. तर काहींनी याला विरोध करीत कायद्याच्या चौकटीत राहून मात्र जलदगतीने आरोपींना शिक्षा द्यायला हवी असेही मत व्यक्त केले. मात्र, कळमेश्व्र  येथे पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्तेनंतर आरोपीने मी पोर्न व्हीडिओ बघून असे कृत्य केल्याची कबुली दिल्यानंतर समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून आरोपीला हैद्राबादच्या धर्तीवर शिक्षा द्यावी असे समाजमत पुढे येऊ  लागले. बीडमध्ये घटनेनंतरही अशीच मागणी होवू लागली. बलात्कार, अत्याचाराच्या वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी सामाजिक वातावरण हादरून गेले असताना महाविद्यालयीन तरुणाईशी संवाद साधला असता काहींच्या स्फोटक तर काहींनी संयमी प्रतिक्रिया दिल्या.

शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे देणे, अश्लिल प्रौढ मनोरंजनावर बंदी, वेश्या व्यवसाय अधिकृत करणे, बलात्काऱ्यास फाशीची किंवा हात-पाय तोडणे वगैरे शिक्षा, स्त्रियांना स्वसंरक्षण शिकविणे आणि संस्कारक्षम पिढी घडवणे असे विविध उपाय प्रामुख्याने सुचविले गेले.

स्त्रियांना संकटाचा सामना करण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहेच. परंतु ते पुरेसे नाही. शिवाय भारतात मुलींचा शिक्षण आणि मैदानी खेळांतील सहभाग या बाबतीतच अनंत अडचणी आहेत, तिथे सर्वाना स्वसंरक्षणाचे धडे देणे मोठे दिव्यच ठरेल, अशी प्रतिक्रिया नीलिमा मेंढे या विद्यार्थिनीने दिली. पॉर्न बंदी हा अनेकांना महत्त्वाचा उपाय वाटतो. अशी सेन्सॉरशिप योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. परंतु आपण केवळ बलात्कारासंदर्भात पॉर्न बंदी हा उपाय म्हणून जेव्हा बघू पाहातो तेव्हा हे कसे रोखता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे. आज इंटरनेटवर असंख्य साधने उपलब्ध असल्याने काय काय रोखणार हाही चर्चेचा विषय आहे. त्यामुळे नैतिक मूल्य रुजवली तरच यावर आळा घालता येईल, असे मत प्रणय देशमुख या विद्यार्थ्यांने व्यक्त केले.

लैंगिकतेला मोकळा श्वास द्या!

शरीरामध्ये लैंगिक बदल होणे हे नैसर्गिक आहे. मात्र, त्याचे शिक्षण शाळांमधून दिले जात नाही. परिवारात अशा चर्चा करण्याची मुभा नाही. लैंगिक चर्चा म्हणजे ही खूपच घाणेरडी किंवा चुकीची गोष्ट आहे असा समज आजही आपल्याकडे आहे. मात्र, ही नैसर्गिक गोष्ट आहे हे मान्य करावे लागेल. आणि हे करण्यासाठी शाळांपासून लैंगिक शिक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे.

– प्रणय चौधरी, विद्यार्थी.

महिला सुरक्षित आहेत का?

सध्या अशा घटना ऐकता आणि पाहता देशात स्त्रिया सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. एकीकडे बेटी बचाओचा केला जाणारा नारा आणि दुसरीकडे अशा घटना. यावरून असे वाटते की, देश बदला अथवा ना बदला, पण कायदा जरूर बदलला पाहिजे.

– माधुरी बोंद्रे, विद्यार्थिनी

दीर्घकालीन मोहीमच नाही

निर्भया नंतर बलात्कार आणि महिला सुरक्षेसंदर्भातील अनेक समस्यांबद्दल देखील मोठे आंदोलने झाले. चर्चा घडल्या. परंतु मोठे परिणाम घडवून आणू शकेल अशा कुठल्या दीर्घ कालीन मोहिमेची सुरुवात झाली नाही.

– स्वप्निल भोगेकर

तोकडय़ा माहितीचा परिणाम

लैंगिकतेविषयी असलेल्या तोकडय़ा माहितीतून निर्माण झालेली उत्सुकता, उत्तेजकता, सोशल मीडियाचा अतिवापर यांमुळे असे प्रकार घडत असल्याचे समोर येत असून, याचे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय वयातच लैंगिक शिक्षण देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. शरीरामध्ये होत असलेले हार्मोनल बदल, टीव्ही, सोशल मीडियाच्या अतिवापरातून समोर येत असलेले आभासी जग, पोर्न फिल्म्सची सहज उपलब्धता, त्याविषयी वाटणारी उत्सुकता अशा घटनांतून तयार होणारी विकृत मानसिकता यातून बलात्कारासारख्या घटना वाढत आहेत. शालेय वयातच विद्यार्थ्यांना हार्मोनल बदल, शरीरात होणारे बदल, मासिक पाळीमुळे होणारे शारीरिक बदल, त्याचे परिणाम अशी सर्वसमावेशक माहिती मुला-मुलींना देणे अत्यावश्यक आहे. कारण अशी पावले उचलल्यास त्याचा काय परिणाम भविष्यात होऊ  शकतो, याची जाणीवच नसल्याने अशा स्वरूपाचे गुन्हे करण्यास अल्पवयीन मुले धजावत आहेत. त्यांच्यात योग्य प्रबोधन झाल्यास बलात्कारासारख्या घटनांना आळा बसू शकतो.

– प्रा. वसुबंधु माणके,  मानसशास्त्र विभाग, रातुम, नागपूर विद्यापीठ

कठोर शिक्षा द्या

आपल्या देशामध्ये बलात्कार प्रकरण संपणार नाही. अशा गुन्हेगारांना सर्वानी एकवटून भर चौकात गुन्हा सिद्ध झाल्यावर जाळायला हवे. तरच अशा समाज विघातक विकृतींना आळा बसेल. शिक्षण, संस्कार आणि कठोर कायदा हेच या घटनांना रोखण्याचे प्रभारी उपाय ठरू शकेल.

– रिया भालाधरे, विद्यार्थिनी.

वेळीच धडा शिकवा

मुलींनी घरातून बाहेर निघताना बॅगमध्ये मिरची, तिखट किंवा टाचणीतरी सोबत ठेवावी. कुणीही आपल्याशी चुकीचे वागण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचे ठिकाणी धडा शिकवावा. असा धीटपणा मुलींनी स्वत:मध्ये आणल्याशिवाय अशा अमानवी घटना रोखता येणे अशक्य आहे.

– नेहा कोसारे

किती दिवस सहन करायचे

शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रीवर हात टाकणाऱ्यांचे हात तोडले जात होते. मला वाटते की त्यावेळच्या शिक्षेची तरतूद आता सुरू करायला हवी. त्याशिवाय अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना अद्दल घडणार नाही.

– पद्मश्री मोटघरे.