बापू बैलकर

पावसाने राज्यात हाहाकार उडवला आहे. नेहमी तुंबई होणारे मुंबई, ठाणे या शहरांशिवाय आता शहराचे शिल्पकार असलेल्या सिडकोने वसविलेली नियोजित नवी मुंबईचीही तुंबई होत आहे. गेल्या आठवडाभर राज्यात सुरू असलेल्या पावसाने तर शहरांना पाण्याचा वेढा पडलेला दिसला. यात आणखी एक बाब प्रकर्षांने दिसून आली ती वाहनं रस्त्याऐवजी पाण्यात दिसून आली. वाहनं पाण्यात अडकणे, वाहून जाणे, बंद पडणे, वाहनांवर झाडे पडणे. आशा अनेक घटना नेहमीच पावसाळयात घडतात. यात या ‘लाखमोला’च्या वाहनांचे प्रचंड नुकसान होत असते. अशा वेळी विमा संरक्षणासह काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसात नादुरुस्त झालेल्या गाडीला ‘विमा’ संरक्षण मिळते का? तर होय, पण यासाठी काही गोष्टी अवगत हव्याच, नाहीतर यावरही पाणी फेरले जाऊ शकते, आणि मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

प्रत्येकाने वाहनाचा विमा काढायलाच हवा. लाख मोलाचे वाहन घेताना त्याच्या संरक्षणासाठी विमा कवच घेतले जाते. पण, हप्ता जास्त पडतो म्हणून काही वेळा त्याचे नूतनीकरण करण्याबाबत चालढकल केली जाते. पण, मग अशा वेळी पंचायत होते.

वाहनाचा विमा उतरविणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन विमा दोन प्रकारचा आहे. एक थर्ड पार्टी (तृतीय पक्ष) व दुसरा कॉम्प्रेहेन्सिव्ह (र्सवकष). तृतीय पक्ष विमा उतरविणे हे भारतात कायद्याने आवश्यक आहे. तृतीय पक्ष विमाधारकाला अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीने वाहनाचे नुकसान झाल्यास त्याचा दावा संमत होत नाही. पण, वाहनाच्या अपघातात तिऱ्हाइत व्यक्ती जायबंद झाली, तर त्याला नुकसानभरपाई मिळू शकते. ‘र्सवकष’ पॉलिसीमध्ये सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.

मात्र र्सवकष विमासाठी जास्त हप्ता भरावा लागतो. दरवर्षी घसारा विचारात घेत वाहनाची किंमत कमी कमी होते व दरवर्षी कमी झालेल्या रकमेवर विमा संरक्षण मिळते. पावसाळ्यात पाण्याने इंजिन खराब होते. यासाठी ‘इंजिन संरक्षण’ असा खास विमाही आहे.

या संरक्षणासाठी वाहनांच्या किमतीच्या अर्धा ते एक टक्का अतिरिक्त प्रीमियम आकारला जातो. ‘शून्य घसारा’ तसेच ‘इंजिन संरक्षण’ हे ‘क्लॉज’ असलेला विमा जास्त पैसे भरून घ्यावा. पावसाळ्यात वाहनाच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहन नादुरुस्त होऊ  शकते. वाहनावर झाड पडून वाहनाचे नुकसान होऊ  शकते. झाडे पडण्याच्या प्रमाणात सध्या फार मोठय़ा प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन विम्याचे संरक्षण हवेच.

गाडी नवीन असेल तर र्सवकष  विमा कंपनीने घेतलेला असेल. जर कर्ज घेऊन गाडी घेतलेली असेल तर गाडीचा विमा र्सवकष असेल कारण कर्ज देणाऱ्या अर्थ संस्थांची ही अनिवार्य अट असते. पण..पहिल्या काही वर्षांनंतर केवळ विम्याचा हप्ता (प्रीमियम) कमी भरायच्या हेतूने फक्त ‘तृतीय पक्ष’विमा घेतलेला असेल तर पाण्यात नुकसान झालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनी भरून देणार नाही. त्यामुळे अशा वेळी गाडीचा विमा हा र्सवकषच असला पाहिजे.

यातही फक्त विमा आहे, मग काय घाबरायचे? अशा तोऱ्यात वाहनचालक गाडी पाण्यात घालतात आणि काही चुका करतात. त्यामुळे हा विमा असून भरपाईला काही वेळा मुकावे लागते. त्यामुळे अशा वेळी नेमके काय करावे याची माहिती वाहनचालकांना असणे गरजेचे आहे.

गाडी पाण्यात जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवा. जर वाहून ती दुसऱ्या जागेवर गेली असेल तर धक्का मारून बाजूला उभी करा. तुमच्या विमा कंपनीच्या हेल्प लाइनवर संपर्क करून तुमची व विम्याची माहिती देत गाडीचे लोकेशन कळवा. कंपनीकडून ‘सव्‍‌र्हेअर’ येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेईल. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टोकन करून गॅरेजला

पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून विमा खर्चात दुरुस्त होईल. पण अशा वेळी आपण काही चुका करतो. सव्‍‌र्हेअरला बोलावण्याच्या आधीच पाण्यातच गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो.

मग इंजिनमध्ये पाणी घुसते आणि इंजिन बाद होते. मग, हा मोठा खर्च वाढतो आणि तो चालकाच्या चुकीमुळे (मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान) या प्रकारात गणला जातो. त्यामुळे इंजिनासाठी येणारा खर्च विमा कंपन्या देत नाहीत. त्यामुळे भरपाई मिळते पण, त्यात गाडीचे काम होत नाही, आणि खिशातून पैसे टाकावे लागतात.

त्यामुळे पाण्यात बुडलेली गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू नये. हवी तर गाडी ढकलत बाजूला करावी. पण यातही जर आपण इंजिनाचा स्वतंत्र विमा काढला असेल तर मग कंपनीला विमा रक्कम द्यावी लागते.

जुन्या वाहनांचा विमा काढताना..

नवीन गाडी घेताना त्याबरोबर विमा हा घेतलाच जातो. मात्र जुने वाहन घेताना याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. नियम म्हणून कधी कधी तृतीय पक्ष विमा घेतला जातो. आणि अशाच वेळा वाहनमालकांना अशा आपत्तीत मोठा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे गाडीचा व्यवहार झाल्यानंतर नव्या वाहनमालकाने जागरूकपणे विमा स्वत:च्या नावावर करून घेणे गरजेचे आहे.

* पावसाळा काळात गाडीचा सर्वसमावेशक विमा हवा.

* या काळात गाडीत वाहन विमा कागदपत्रे कायम ठेवणे गरजेचे.

* विमा कंपनीचे संपर्क क्रमांकही आपल्याकडे हवेत.

* पाण्यात गडी बंद पडल्यास चालू करण्याचा प्रयत्न करू नये.

काय काळजी घ्याल

* आपल्याकडे वाहनाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होणे आणि पावसाळा पूर्व काळात चालक म्हणून घ्यायची काळजी याकडे आपण दुर्लक्ष करतो. पाऊस आणि पुरात होणारे नुकसान याबाबत आपल्याकडे फार कमी लक्ष दिले जाते. थोडीशी काळजी घेतली तरी आपली वाहनांतून पावसाळी सर मजेशीर ठरू शकते. पावसाचा तडाखा बसण्यापूर्वी आपल्या कारचे सर्व सुटे भाग देखभाल केलेले आहेत याची खात्री करून घ्या. टायर, स्पेअर हे चांगल्या स्थितीत आहे की नाही, वायपरच्या ब्लेड्स सुस्थितीत आहेत की नाही, कारचे सर्व इलेक्ट्रिक सुटे भाग योग्य स्थितीत आहेत की नाही हे तपासून पाहा. कारमधील सर्व गळती बंद आहे का? अथवा सर्व लोखंडी भाग गंजू नये म्हणून काही काळजी घेतली किंवा नाही हेही तपासून पाहा. तुमची कार मधेच बंद पडू नये आणि तुम्ही वाहत्या पाण्यात अडकू नाही यासाठी ही काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात गाडीत वाहन विमा कायम ठेवणे गरजेचे असून विमा कंपनीचे संपर्क क्रमांकही आपल्याकडे हवेत.

* पावसाळ्यात वाहनाची काळजी घेतानाच आपल्या कारचा विमा काढून घेणेही गरजेचे आहे. कार विम्याद्वारे आग, चोरी, स्फोट, दरोडा, दंगल, आंदोलन, भूकंप, पूर, वादळ, अपघात, दहशतवादी हल्ला अशा परिस्थितीत तुमच्या कारचे होणारे नुकसान भरून काढता येते. आणखी महत्त्वाचे म्हणजे ग्लास, फायबर, प्लास्टिक, रबरी वस्तू आणि वाहनाची चावी हरविणे अशा नुकसानींसाठीही एॅड-ऑन कवच घेता येते. अशा प्रकारचा विमा सर्वसाधारण विमा योजनेत सहसा नसतो. सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरही तुमच्या वाहनाला काही झाल्यास विमा तुमच्या मदतीला धावून येईल. मात्र, तुमच्या विमा योजनेचे नूतनीकरण करून घेतले आहे की नाही याची खात्री करून घ्या.

* पावसाच्या काळात होणाऱ्या नुकसानीसाठी तुमचा वाहन विमा पुरेसा आहे की नाही, हे तपासून पाहा. तसेच आपल्या विमा योजनेत काय येत नाही हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. विमा योजनेत नसलेल्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला खर्च येणार आहे, याचीही माहिती असणे आवश्यक आहे.