२०१९ हे वर्ष कार उत्पादक कंपन्यांसमोर मोठे आव्हानात्मक होते. आर्थिक मंदीचे मळभ गेले वर्षभर दिसून आले. साधारण या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.१८ टक्के कारची विक्री कमी झाली. अशा परिस्थितीतही कार उत्पादक कंपन्यांनी याला तोंड देत गेले वर्षभरात नवनवीन गाडय़ा बाजारात आणत या परिस्थितीला तोंड दिले. वर्षभरात बाजारात आलेल्या व खरेदीदारांच्या पसंतीस उतरलेल्या कारबाबत..

आर्थिक मंदीमुळे खरेदीदारांनी वाहन खरेदीला प्राधान्य न दिल्याने विक्रीत मोठी घट दिसून आली. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांत तर विक्रीत ३० टक्केपर्यंत घट झाल्याने कंपन्यांना उत्पादन कमी करण्याची वेळ आली होती. मारुतीसारख्या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीनेही आपले उत्पादन कमी केले होते.

वाहन खरेदीत मोठी घट होत राहिली तरी नवनवीन मोटारी बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मात्र सुरूच होते. मागणी आक्रसण्याची कारणे अनेक आहेत. पण केव्हा ना केव्हा तिला पुन्हा उभारी येईल आणि मालाला उठाव मिळेल. अशा वेळी आपण मागे राहता कामा नये, या भावनेतून मर्यादित उत्पादनबंदी आणि अस्थायी कामगार कपातीचे मार्ग अनुसरूनही वाहन उद्योग हे दिवस पालटण्याची वाट पाहत राहिला.. यामुळेच नवीन मोटारींची घोषणा होणे किंवा नवीन मॉडेल बाजारात येणे अजिबात थांबले नाही. किंबहुना, दहा वर्षांपूर्वी वर्षांकाठी दोन ते पाच नवीन मोटारी जिथे येत होत्या, त्या बाजारपेठेत आज जवळपास आठ ते दहा नवीन मोटारी आणल्या जात आहेत.

स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल अर्थात एसयूव्ही या सध्याच्या सर्वाधिक ग्राहकप्रिय श्रेणीमध्ये ‘ह्य़ुंदाई (व्हेन्यू), महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र (एक्सयूव्ही ३००), मॉरिस गॅरेज (हेक्टर), निसान (किक्स) आणि किआ सेल्टोस या मोटारींनी बाजारात बऱ्यापैकी मुसंडी मारली. आता कॉम्पॅक्ट सेडान असतात, तशा कॉम्पॅक्ट एसयूव्ही रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. म्हणजे १२०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता आणि चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही. ही श्रेणी सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय आणि अटीतटीची स्पर्धा असलेली आहे. एसयूव्हीप्रमाणेच एमपीव्ही अर्थात बहुद्देशीय वाहनांना मागणी वाढल्याचे दिसले.

हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडानची मागणी घटली, पण त्यांचे उत्पादन तितक्या प्रमाणात कमी झाले नाही. एमपीव्ही या श्रेणीत मारुतीची ‘अर्टिगा’ स्थिरावली आहे. गेल्या वर्षभरात कार उत्पादक कंपन्यांनी खरेदीदारांचा पसंतीक्रम, तंत्रस्नेही ग्राहकांच्या आकांक्षा व सुरक्षासाधनांवर भर देत नवनवीन कार बाजारात आणल्या तसेच ऑफर्सचा गिअर टाकत २०१९ या वर्षांतील हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला.

तंत्रज्ञानावर भर.. सुरक्षेची हमी आकर्षक लुक आणि शक्तिशाली इंजिन क्षमता या वाहनांमध्ये असून गाडीसह प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात मंदीच्या काळातही या कारला मागणी राहिली.

  •   दिसायला आकर्षक
  •  विविध आकारांत उपलब्ध
  • पेट्रोलसह डिझेल इंजिन-  तेही दमदारजमिनीपासूनचे   अंतर जास्त

आरामदायी..

दिवसभर प्रवास करता येईल..

  •  इंटिरिअरवर भर                       टचस्क्रीन डिस्प्ले
  •  चारही बाजूने कॅमेरे                    म्युझिक सिस्टीम अत्याधुनिक
  •  स्पोर्टी लुकवर भर                      पार्किंग सेन्सॉर
  • ऑटोमॅटिक टायर प्रेशर चेक         ब्लू लिंक प्रणाली

एस प्रेसो..

मारुती सुझुकीने एसयूव्ही प्रकारातील वाहनांना मिळत असलेली पसंती पाहता एसयूव्ही प्रकारातील नव्हे पण एसयूव्हीसारखी असणारी मिनी एसयूव्ही ‘एस प्रेसो’ सप्टेंबरमध्ये बाजारात आणली. गेल्या तीन महिन्यांत सुमारे २६ हजार ८६० कारची विक्री झाली आहे. या कारमध्ये ऑल्टो के १० चे १.०- लिटर बीएस ६ इंजिन आहे. या कारची तुलना रेनो क्विड फेसलिफ्टबरोबर असून परवडणारी एसयूव्ही म्हणून खरेदीदार तिच्याकडे पाहत आहेत.

मारुती सुझुकी वॅगन-आर

मारुतीच्या वॅगन-आर कारला ग्राहकांनी डोक्यावर घेतले आहे. या गाडीला पसंती असल्याने मारुतीने तिची सुधारित आवृत्ती जानेवारीमध्ये बाजारात आणली. ही कार हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बनविली असून मारुतीने पहिल्यांदा ही कार १.२ लिटर चार-सिलेंडर पर्यायांसह बाजारात आणली.

मारुती सुझुकी एल ६

मारुती सुझुकीने खरेदीदारांच्या बदलत्या पसंतीक्रमाचा विचार करीत एमपीव्ही प्रकारात एल ६ ही कार ऑगस्टमध्ये बाजारात उतरवली. आतापर्यंत १२ हजार ८९९ कारची विक्री झाली आहे. ही कार ग्राहकांना आकर्षित करीत असून सहा सीटची व्यवस्था आहे. अर्टिगा कारमधील बहुतांश सुविधा देण्यात आल्या आहेत.

ह्य़ुंदाई व्हेन्यू

मेमध्ये बाजारात आलेली ह्य़ुंदाईची व्हेन्यू ही कारही खरेदीदारांच्या पसंतीस उतरली आहे. कोरिया कार उत्पादक कंपनीची ही भारतातील पहिली मध्यम आकारातील एसयूव्ही प्रकारातील कार. आतापर्यंत ६० हजार ९२२ कारची विक्री झाली आहे. भारतातील मारुतीच्या विटेरा ब्रेजा, टाटाची नेक्सॉन, महिंद्राच्या एक्सयूव्ही ३०० बरोबर तिची स्पर्धा आहे. तीन इंजिन पर्याय असून यात १.० लिटर टबरेचाज्र्ड पेट्रोल इंजिन, १.२ लिटर पेट्रोल इंजिन व १.४ लिटर टर्बेचाज्र्ड डिजल इंजिन आहे.

एमजी हेक्टर

बोलती कार म्हणून भारतीय बाजारात जुलैमध्ये आगमन झालेल्या मॉरिस गॅरेजेसच्या हेक्टरनेही आपला पसंतीक्रम राखून ठेवला आहे. आतापर्यंत १२ हजार ९०९ कारची विक्री झाली आहे. एमजी हेक्टर ही भारतातील पहिली  इंटरनेट कार असून तिची बोलती कार असा लौकिक आहे. दहा इंचांचा डिस्प्ले असून इनबिल्ट सिम दिलेले आहे. ४ जी, ५ जीशी लिंक करता येऊ शकते. मोबाइल कॉलही जोडतो येतो. ‘ई-मेल’ही पाहू शकतो व काही फाइल जतनही करू शकतो. व्हॉइस कमांडवर १०० पर्यंत चालक गाडीला सूचना करू शकतो. चारी बाजून कॅमेरे आहेत. तिची किंमत १२ ते १६ लाखांपर्यंत असून तरुण वर्गाला ती आकर्षित करीत आहे.

टाटा हॅरियर

ओमेगा प्लॅटफॉर्मवर बनविलेल्या टाटाच्या हॅरिअरचे जानेवारीमध्ये पदार्पण झाले. या कारमध्ये २.० लिटरचे चार सिलेंडर टबरेचाज्र्ड डिजल इंजिन असून ६-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. इको, सिटी आणि स्पोर्ट हे तीन ड्राइव्हिंग मोड्स आहेत. वर्षभरात १३ हजार ७६९ कारची विक्री झाली आहे. हॅरिअरची स्पर्धा एमजीच्या हेक्टर व ह्य़ुंदाईच्या केट्राबरोबर आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही ३००

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने जानेवारीत एक्सयूव्ही ३०० ही मिनी एसयूव्ही बाजारात आणली. आतापर्यंत ३३ हजार ५८१ कारची विक्री झाली आहे. ७.९० ते १२ लाखापर्यंत ही कार उपलब्ध आहे. पेट्रोल-डिझेल पॉवरफुल इंजिन पर्यायांसह सहा गिअर आहेत. सन रुफटॉप, दोन ते सात एअर बॅग यांच्यासह महत्त्वाचे म्हणजे टायरची स्थिती काय आहे हे गाडी चालू करण्यापूर्वी आपल्याला समजू शकते. त्यामुळे अपघाताचा धोका टळतो. आरामदायी अशी मोटार आहे.

ग्रँड १० निऑस

मारुतीच्या स्विप्टला टक्कर देणारी ग्रँड १० निऑस ही कार ऑगस्टमध्ये बाजारात आली. आतापर्यंत ३८ हजार ८२० कारची विक्री झाली आहे. वायरलेस फोन चार्जिग, रियर एयर-कॉन वेंट्स अशा काही नवीन सुविधाही या गाडीत दिल्या आहेत. १.५ लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन हे दोन्ही पर्याय असून ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स दिले आहेत.

किआ सेल्टोस

सध्या भारतीय वाहन बाजारात ‘किआ’च्या सेल्टोसने खरेदीदारांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केलेले दिसत आहे. भारतात जूनमध्ये या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले. बुकिंग सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सेल्टोसची ६ हजार युनिट नोंदणी झाली होती. आतापर्यंत ४० हजार ८४९ कार विक्री झाल्या आहेत. ह्य़ुंदाईच्या क्रेटा व एमजीच्या हेक्टरशी या कारची तुलना केली जात आहे. दिसायला आकर्षक तर आहेच, शिवाय एअर प्युरिफायर आणि वेंटिलेटेड सीट्स या काही नवीन सुविधाही देण्यात आल्या आहेत. तीन इंजिन पर्याय मिळतात. इंजिनांस स्वयंचलित ६ गिअरबॉक्स आहेत. किंमत १० लाख ते १५ लाखांपर्यंत आहे. जानेवारीपासून या कारची किंमत वाढणार आहे.