||बापू बैलकर

तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करताय.. तर ही एक संधी आहे. कार उत्पादक कंपन्यांनी आपला ‘बीएस ४’चा साठा संपविण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच वाहन खरेदीदारांचा निरुत्साह अजून दिसून येत असल्याने वर्षअखेर म्हणूनही अनेक कारवर सूट देण्यात आली आहे. कारच्या मॉडेलनुसार पाच लाखांपर्यंत बचत होऊ शकते. १ जानेवारीपासून सर्वच कार कंपन्या कारच्या किमती वाढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीत कार खरेदीसाठी ही एक संधी आहे.

२०१९ हे वर्षे वाहन उत्पादक कंपन्यांसाठी एक वाईट अनुभव होता. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत आर्थिक मंदीचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागला. कारची विक्री ३० टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादनही कमी केले होते. यातूनही कार कंपन्या नवनवीन योजना तसेच खरेदीदारांच्या पसंतीस उतरतील अशा कार बाजारात आणत विक्री वाढविण्याचा प्रयत्न करीत होते. दसरा-दिवाळी सणांच्या काळात काही कारच्या किमती कमी करीत ‘ऑफर्सचा गिअर’ टाकला होता. या संधीचा फायदा घेत खरेदीदारांनी कार खरेदी केल्या होत्या. त्यामुळे या काळात विक्री वाढली होती. मात्र, अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही.

त्यात आता कार उत्पादक कंपन्यांसमोर ‘बीएस ६’चे उत्पादन करणे व ‘बीएस ४’चा साठा संपविणे हे नवी आव्हान उभे आहे. सध्या प्रदूषण हा आपल्या देशासमोरील मोठा प्रश्न आहे. शहरांतील प्रदूषणवाढीसाठी इतर घटकांसह वाहनांमुळे होणारे प्रदूषण हेही मोठे आहे. यामुळे केंद्र सरकारने आपल्या वाहन धोरणात काही बदल केले आहेत. यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी पोषक वातावरण व ‘बीएस ४’ऐवजी ‘बीएस ६’ इंजिन मानांकन असलेली वाहनेच यापुढे निर्मिती व विक्रीवर बंधने आणली आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने २०१७ रोजी अधिसूचना काढत १ एप्रिल २०२० नंतर ‘बीएस ६’ वाहनांचीच निर्मिती करता येऊ शकते असे आदेश पारित केले आहेत. यानुसार सर्वच कार कंपन्यांनी आपली ‘बीएस ६’ मानांकन असलेली वाहने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र कार कंपन्यांकडे ‘बीएस ४’ वाहनांचाही मोठा साठा पडून आहे. पुढील तीन महिन्यांत हा साठा संपविण्याचे या कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कार कंपन्यांनी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात या वाहनांसाठी मोठय़ा सवलती जाहीर केल्या आहेत.

तसेच वर्षांचा शेवटचा महिना असल्याने कारवर मोठय़ा सवलती जाहीर करीत विक्री वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे. मारुती-सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्य़ुंदाई, टाटा मोटर्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या विविध कारवर सवलतींचा धडाका लावला आहे.ोहुतेक कार कंपन्यांनी वाहन विम्याचाही आधार घेतला आहे. विमा आणि एक्स्चेंजच्या माध्यमातून ग्राहकांना हजारो रुपयांची सवलत देऊन कार विक्रीचा वेग वाढवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ही उत्तम वेळ आहे.

‘बीएस ६’मुळे सुट्टय़ा भागांच्या किमती वाढल्याने सर्वच कार कंपन्या १ जानेवारीपासून किमती वाढविण्याच्या तयारीत आहेत. रेनॉल्ट, मारुती सुझुकीने किआने तर किमती वाढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे परवडणारी कार खरेदी करण्याची ही संधी आहे.

१ जानेवारीपासून कार महागणार

सुट्टय़ा भागांच्या किमती वाढल्यामुळे १ जानेवारीपासून कार कंपन्यांनी कारच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने तसे जाहीर केले आहे. मात्र कोणत्या कारच्या किमती किती वाढविणार हे सांगितले नाही. तसेच युरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रँड, रेनोने गुरुवारी कारच्या किमतीत वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे, तर साऊथ कोरियन कंपनी किआने आपली सेल्टोस ही एसयूव्ही नुकतीच बाजारात आणली आहे. तिला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र लोकार्पणप्रसंगी जाहीर केलेली किंमत ही तात्पुरती असल्याचे कंपनीने सांगितले होते. आता १ जानेवारीपासून या कारची किंमत वाढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पाच लाखांच्या आतील कार                (कंसात मूळ किंमत)

मारुती अल्टो एलएक्सआय ८००  :      २.९ (३.४५) लाख

डॅटसन रेडी गो १००० सीसी              : ३.२५ (४.४) लाख

रेनो क्वीड आरएक्सटी                     : ३.७८ (४.८४) लाख

मारुती अल्टो के टेन अ‍ॅटोमॅटिक       : ३.९४ (४.३८) लाख

मारुती इग्निस सिगमा                    : ४.१४ (४.७४) लाख

टाटा टिगोर एक्स एम पेट्रोल          : ४.३३ (६.१४) लाख

मारुती स्वीप्ट एलएक्स आय         : ४.५४ (५.१४) लाख

मारुती सेलेरिओ व्ही एक्स आय एएमटी : ४.६३ (५.०८) लाख

ह्य़ुंदाई सॅन्ट्रो स्पोर्टझ एमटी                : ४.५७ (५.१२) लाख

ह्य़ुंदाई ग्रॅन्ड आय टेन मॅग्ना                : ४.९६ (४.४६) लाख

दोन लाखांपेक्षा जास्त सवलत

  •  होडा सीआरव्ही : ५ लाख
  •  महिंद्रा अ‍ॅल्युरस : ४ लाख
  •  रेनो कॅप्चर प्लॅटिना : ३ लाख
  •  फोक्सवॅगन टिगून : २.६ लाख
  •  होंडा सिव्हिक : २.५ लाख
  •  टाटा हेक्सा : २.२५

हॅचबॅक कारवर ऑफर

  •  वॉक्सवॉगन पोलो : १ ते १.८८ लाख
  •  ह्य़ुंदाई ग्रॅन्ड आय टेन : ८५,०००
  •  महिंद्रा केयूव्ही १०० : ८०,०००
  •  मारुती इग्निस  : ७५,०००
  •  ह्य़ुंदाई इलाईट  : ७५,०००
  •  मारुती स्वीफ्ट डिझेल :  ७५,०००
  •  रेनो  क्वीड प्री फेसलफ्ट : ७०,०००
  •  डॅटसन  रेडी गो : ७०,०००
  •  मारुती अलटो ८०० : ६५,०००
  •  ह्य़ुंदाई सॅन्ट्रो :  ६५,०००
  •  टाटा टिगोर एक्सएम :  ६५,०००
  • एक ते दोन लाख सवलतीतील कार
  •  फॉक्सवॅगन वेन्टो : २ लाख
  •  फॉक्सवॅगन अ‍ॅमिओ : २ लाख
  •  स्कॉडा रॅपीड : १.५ लाख
  •  टॉयटो यारिस : १.३ लाख
  •  मारुती सीयाझ डिझेल : १.२ लाख
  •  होंडा सीटी बीएस ४ : १ लाख
  •  ह्य़ुंदाई एक्सेंट : १ लाख
  •  निसान सनी : १ लाख
  •  टाटा टिगोर : १ लाख

टिप : सवलतींचा तपशील  संकेतस्थळावरील माहितीवरून

bapu.bailkar@gmail.com