ओंकार भिडे

जागतिक पातळीवर वाहनांमध्ये अनेक सुरक्षिततेच्या प्रणाली देण्यात आल्या आहेत. भारतातही यातील काही प्रणाली आहेत; पण त्या निवडक कारमध्येच आहेत. भविष्यात सामान्यांना याचा लाभ कंपन्यांमधील स्पर्धेमुळे मिळावा, ही अपेक्षा. वाहनामध्ये असणाऱ्या त्या वैशिष्टय़ांचा घेतलेला आढावा.

वाहन हे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरतो; पण या वाहनामागे अनेक इच्छा, अपेक्षा असतात. तसेच, आता कार असो वा दुचाकी, ती कम्युटिंगपेक्षा अधिक वेगळी गोष्ट झाली आहे, कारण सुरक्षित, आरामदायी प्रवास, स्टाइल स्टेटमेंट या बाबी जोडल्या गेल्या आहेत. वास्तविक पाहता भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कार वा दुचाकी ही स्टाइल स्टेटमेंट म्हणून अधिक पाहिली गेली आहे. त्यामुळेच यामध्ये सुरक्षिततेची कोणती फीचर्स आहेत, यावर ग्राहकांकडून फारसा विचार झालेला नाही. मात्र, जागतिकीकरणामुळे तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी कंपन्यांनी अनेक बदल विशेषत: सुरक्षिततेबाबत करण्यास सुरुवात केली; पण हा बदल प्रामुख्याने हायएंड कारपुरताच मर्यादित होता. गेल्या दोन वर्षांत प्रीमियम हॅचबॅक कारमध्ये एअर बॅग्स, एबीएस आदी फीचर्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला; पण ही फीचर्स स्टँडर्ड फीचर्स नव्हती. वाहनांना होणाऱ्या अपघातात जीव जाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता तसेच जागतिक पातळीवर असणारे सुरक्षिततेचे काही फीचर्स आपल्याकडे असावेत या हेतूने केंद्र सरकारनेच काही फीचर्स सर्व प्रकारच्या कारमध्ये सक्तीची केली आहेत. त्यामध्ये डय़ुएल एअर बॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) सक्तीची केली आहे. प्रत्यक्षात नुसते एबीएस असून पुरेसे नाही. त्याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन-ईबीएफडी, कॉर्नरिंग ब्रेकिंग कंट्रोल (सीबीसी) सिस्टमही असणे आवश्यक आहे. या ब्रेकिंगच्या फीचरमुळे खूप मोठा फरक पडतो.

टायर प्रेशर

वाहनाच्या टायरमध्ये हवेचा योग्य दाब महत्त्वाचा असतो. हवेचा दाब टायरमध्ये जास्त असल्यास ग्रिप कमी मिळते. परिणामी, अपघात होऊ  शकतो. तसेच, टायर फुटण्याची शक्यताही असते. हवा कमी असल्यास मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे सुरक्षितेचा उपाय म्हणून टायर प्रेशर किती आहे, हे सांगणारी यंत्रणा निवडक गाडय़ांत आहे. जागतिक पातळीवर ही प्रणाली २००७ पासून कारमध्ये देण्यात आली आहे.

तब्बल नऊ एअर बॅग्स

भारतात निवडक कारमध्येच सहा एअरबॅग्स येतात. एप्रिल २०१८ पासून उत्पादित होणाऱ्या कारमध्ये ड्रायव्हर व को-ड्रायव्हर एअर बॅग सक्तीची झाली आहे. ड्रायव्हर एअर बॅग ही स्टीअररिंगमध्ये मधे बसविलेली असते, तर को-पॅसेंजर एअर बॅग डॅशबोर्डवर असते. उरलेल्या म्हणजे साइड एअर बॅग्स या दाराच्या वर आतील बाजूने कडेला बसविण्यात आलेल्या असतात. विशिष्ट वेगाने गाडी पुढून वा बाजूने धडकल्यास वा त्यावर अपेक्षित दबाव पडल्यास सेन्सर कार्यान्वित होतात व एअर बॅग्स या फुगून बाहेर येतात. तसेच काही कारमध्ये पॅसेंजरच्या सीटला सेन्सर लावलेले असतात, जेणेकरून अपघातावेळी त्या सीटवर कोणी बसलेले नसल्यास विनाकारण एअर बॅग उघडत नाही. भारतात नुकत्याच सादर झालेल्या सेदान कारमध्ये सहा एअर बॅग्स आहेत; पण त्याच कारचे जागतिक पातळीवरील हॅचबॅक मॉडेलमध्ये नऊ एअर बॅग्स आहेत. भारतात एवढय़ा एअर बॅग्स हॅचबॅकमध्ये येण्यास किती वेळ लागतो याची उत्सुकता आहे.

सीबीसी

कॉर्नरिंग ब्रेकिंग कंट्रोल (सीबीसी) सिस्टम ब्रेकप्रणालीचा वापर सर्वप्रथम बीएमडब्ल्यू आणि मर्सीडीझ बेंझ या लक्झरी कार उत्पादक कंपन्यांनी सुरू केला. अँटी ब्रेकिंग सिस्टमच्या पुढील श्रेणीची सिस्टम आहे. अनेक वेळा वळणावर टायरची ग्रिप मिळत नसल्याचे जाणवते. कार वेगात असल्यास अपघातही होऊ  शकतो. त्यामुळेच कार अधिक सुरक्षित होण्यासाठी ही प्रणाली शोधली गेली. या प्रणालीमुळे कार वळत असताना चाकावरील दाब बदलत असताना ही सिस्टम कार्यरत होते. परिणामी टायरला रस्त्यावर चांगली पकड मिळते. आपल्याकडे निवडक हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेदान व सेदान कारमध्ये ही सिस्टम आहे.

स्टँडर्ड लेन डिपार्चर्स अलर्ट

रस्त्यावर पांढऱ्या रेघा असतात. विशेषत: हायवेवर रस्त्याच्या मध्यभागी व बाजूने या रेषा असतात. चालकास रात्रीच्या वेळी रस्ता समजण्यासाठी त्या असतात. तंत्रज्ञान बदल असल्याने आता कारमध्ये लेन असिस्ट सिस्टम आली आहे. अर्थात, यासाठी रस्त्यावर व्यवस्थित रेघा असणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे विशिष्ट वेगाने कार जात असल्यास व लेन सोडली जात असल्यास दृक्-श्राव्य अलर्ट चालकास मिळतो. त्यानंतर चालकाने रस्त्यावरील परिस्थिती कशी आहे, हे पटकन लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असतो. सध्या अशी सिस्टम प्रीमियम कारमध्ये आहे.

हिल असिस्ट

बऱ्याच वेळा घाटात वा चढावर अचानक कार बंद पडल्यास वा काही कारणामुळे थांबावे लागल्यास ड्रायव्हरला याची सवय नसल्यास तारांबळ होऊ  शकते. अशा गोष्टीचा सराव नसल्यास कार पुढे नेण्याच्या प्रयत्नात मागे जाते. हँडब्रेक लावून पहिल्या गिअरमध्ये कार पुढे नेणे, ही सामायिक सवय असावी; पण यावर उपाय म्हणून कंपन्यांनी हिल असिस्ट फीचर कारमध्ये दिले आहे. कार चढावर अचानक थांबल्यास सेन्सर कार्यान्वित होतात व ब्रेक न दाबता कार थांबते. तसेच, पहिल्या गिअरमधून पुढे नेण्यासाठीही हँडब्रेक दाबावा लागत नाही. आता निवडक हॅचबॅक कारमध्ये हे फीचर देण्यात आले आहे.

प्री कोलिजन सिस्टम

समोरील वाहनाला धडक बसण्याची शक्यता वाढल्यास आपोआप कार नियंत्रण करणारी ही सिस्टम आहे. कारमध्ये कॅमेरा व सेन्सर्स अथवा रडार असते. यामुळे चालकास संभाव्य पुढील बाजूच्या धडकेचा दृक्-श्राव्य अलर्ट मिळतो. समजा, संभाव्य धडकेच्या शक्यतेने चालकाने ब्रेक लावल्यावर अतिरिक्त ब्रेक दबाव या सिस्टममुळे दिला जातो. समजा, ब्रेक न दाबल्यास ब्रेक असिस्टमुळे कारचे ब्रेक आपोआप लागतात. यामुळे पुढील बाजूस होणारी संभाव्य धडक टळू शकते वा तीव्रता कमी होऊ  शकते. सध्या अशी सिस्टम सेदान व प्रीमियम कारमध्ये आहे.

ईबीडी

गाडीचे वजन, वेग, रस्त्याची स्थिती यांच्या आधारावर इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (ईबीडी वा इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन-ईबीएफडी) हे ऑटोमाबाइल ब्रेक तंत्रज्ञान गाडीच्या प्रत्येक चाकावर ब्रेकचा दाब निश्चित करण्याचे काम करते. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमबरोबर ईबीडीचे काम उत्तम होते तसेच वाहनावर नियंत्रण राखत वेग उत्तमपणे नियंत्रणात आणणे यामुळे शक्य होते. वाहनाच्या पुढील चाकावर सर्वाधिक दाब असतो आणि त्यामुळे ईबीडी मागील चाकावर ब्रेकचा दाब कमी टाकते. परिणामी, चाक वा ब्रेक लॉक होत नाही आणि गाडी घसरत नाही. काही वेळा मागील चाकावरही ईबीडी ब्रेकचा दाब पोहोचविते. एबीएसबरोबर कारला ईबीडी असल्यास सुरक्षितता आणखी वाढते. आता बहुतेक प्रीमियम हॅचबॅक कारमध्येही फीचर स्टँडर्ड झाले आहे.

ऑटोमॅटिक हाय बीम

रात्रीच्या वेळी विशेषत: हायवेवर दृश्यमानता वाढण्यासाठी हाय बीमचा वापर केला जातो. समोरून वाहन येत असल्यास लो बीम केल्याने समोरील वाहनचालकास दिव्यांच्या प्रखरतेचा त्रास होत नाही; पण आपल्याकडे हाय बीम क्वचितच कमी (डिपर) केली जाते. जागतिक पातळीवर कारमध्ये ऑटोमॅटिक हाय बीम यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे. कारमध्ये कॅमेरा बसविण्यात आलेला असतो. त्यानुसार समोर येणाऱ्या वाहनाच्या लाइटनुसार तसेच पुढे दुसरे वाहन असल्यास टेल लाइटच्या आधारवर कारची हाय बीम व लोबीम कार्यान्वित होते. तसेच, हाय बीम यंत्रणा कार्यान्वित असल्यास संभाव्य अडथळा वा पादचारीमध्ये नाही ना, हेही यामुळे समजू शकते.