छायाचित्र ही स्मृती जपून ठेवणारी अजरामर कला आहे. सध्या अनेकांना छायाचित्रणाचा छंद असतो. त्यासाठी डीएसएलआर कॅमेरे घेतले जातात. मात्र कॅमेरा ही अत्यंत नाजूक वस्तू असून तिची हाताळणी आणि देखभाल योग्य रीतीने करणे गरजेचे आहे.

  • कॅमेऱ्याची बॉडी, लेन्स, सेन्सर, एलसीडी स्क्रीन यांची सफाई करणे खूप आवश्यक आहे. एखाद्या मऊ आणि सुक्या कापडाने कॅमेरा साफ करा. मायक्रोफायबर कपडा असेल तर उत्तमच. कॅमेऱ्यावरील धूळ, बोटांचे उमटलेले ठसे कपडय़ाने स्वच्छ करा.
  • कॅमेऱ्यावर लागलेला डाग कपडय़ाने जात नसेल तर पाण्याचा वापर करू शकता. मात्र हा डाग काढण्यासाठीच पाण्याचा वापर करा.
  • कॅमेऱ्याच्या लेन्स नियमित साफ न केल्यास छायाचित्र अस्पष्ट आणि खराब येते. लेन्सच्या सुरक्षेसाठी लेन्स कॅपचा वापर करा. लेन्सच्या नियमित सफाईसाठी एक मऊशार ब्रश वापरा. बाजारात लेन्स साफ करण्यासाठीचे सोल्युशन मिळतात. त्याचा वापर करू शकता.
  • कॅमेऱ्यामध्ये असलेल्या सेन्सरची नियमित सफाई करणे गरजेचे आहे. इमेज सेन्सरवर धूळ बसल्यास छायाचित्रावर ब्लर स्पॉट स्पष्टपणे दिसून येतात. सेन्सरची सफाई करण्यासाठी सेन्सर स्व्ॉब किंवा सेन्सर ब्रशचा वापर करा.
  • कॅमेऱ्याचा एलसीडीही मायक्रोफायबर कपडय़ाने साफ करू शकता. मात्र एलसीडीची सफाई करताना जास्त दाब देऊ नका. नाही तर तो नादुरुस्त होण्याची शक्यता असते.