News Flash

किल्ले, महालांचं शहर

मेहरानगडावर असणारे पुरातत्त्व खात्याचे संग्रहालय हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ  शकेल इतके ते वैविध्यपूर्ण आहे.

|| ओंकार वर्तले

‘पधारो म्हारे देश’ असे म्हणत, दोन्ही बाहू फैलावत राजस्थान नेहमी भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे आपुलकीने स्वागत करण्यास उत्सुक असतो. राजस्थान म्हणजे भव्य-दिव्य राजमहाल, तलाव, किल्ले, कला आणि संगीताचा अजोड मिलाफच. या भागात फिरताना शाही रुबाब प्रत्येक ठिकाणी जाणवतो. भारताचे निळे शहर असल्याचा  रुबाब आणि अभिमान बाळगावा अशी जागा म्हणजे जोधपूर. इथे पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे  आहेत.

जयपूरला जशी गुलाबी रंगाची झालर आहे तशीच जोधपूरवर निळाई पसरलेली दिसते. सर्वच पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असलेले हे शहर म्हणजे पर्यटनाचे नंदनवन! अशा या जोधपूरच्या आजूबाजूच्या म्हणजेच शहराला खेटून असणाऱ्या ठिकाणांची ही सफर..

मेहरानगड

प्रख्यात लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी मेहरानगडाचे नेमके आणि समर्पक वर्णन केले आहे. ते म्हणतात की, ‘मेहरानगडावरील महाल हे महाकाय लोकांनी बांधल्यासारखे आणि सूर्याने रंगविल्यासारखे दिसतात. मेहरानगड पाहिल्याशिवाय जोधपूर पर्यटन पूर्ण होऊच शकत नाही. केवळ जोधपूरच नव्हे तर संपूर्ण राजस्थानची शान असलेला हा किल्ला राठोड राजघराण्याचा राजा राव जोधा याने १४६० साली बांधल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वंशजांनी कालांतराने त्यात भर घातली. त्यामुळे राव जोधानंतरसुद्धा या किल्ल्याचा विस्तार होत राहिला. राठोड साम्राज्याचा केंद्रबिंदू असलेल्या या किल्ल्यावर एकूण सात महाद्वारे आहेत. यातली जयपोल आणि फतेहपोल ही दोन प्रवेशद्वारे वैशिष्टय़पूर्ण आहेत. जयपूरवर आणि मुघली सेनेवर विजय मिळविल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ती बांधली गेलेली आहेत. दूधकांग्डा पोल, अमृत पोल, गोपाल पोल, भेरू पोल आणि लोह पोल असे दरवाजे या गडाला आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या किरत सिंह नावाच्या सैनिकाची छत्री आहे. प्रवेश करून आत गेल्यावर जयपूरच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात बंदुकीच्या गोळ्या लागून भिंतींवर पडलेली छिद्रे आजही तशीच आहेत.

किल्ल्यावर असणारे झाकी, मोती, फुल आणि शीश या नावाचे चार महाल म्हणजे वास्तुस्थापत्याचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या वास्तूच आहेत. प्रत्येक महाल हा वैशिष्टय़पूर्ण असून त्यातील वैभव पाहून आपले डोळे दिपून जातात. किल्ल्यावरील भव्य इमारती आणि तटबंदी पाहण्यासारखी आहे. किल्ल्याच्या माथ्यावर करणी मातेचे सुंदर मंदिरदेखील आहे. किल्ल्याच्या माथ्यावरील तटबंदीवर विविध प्रकारची कलाकुसर केलेल्या सुमारे २०-२५ तोफा ठेवण्यात आल्या आहेत. या भव्य आणि दरारा निर्माण करणाऱ्या तोफा गतवैभवाची साक्ष देतात. गडावरून जोधपूरच्या निळ्या रंगाचं जे काही दर्शन घडतं त्याला तोड नाही. इथला सूर्यास्तही पाहण्यासारखा असतो. मेहरानगड पाहण्यासाठी पुरातत्त्व खात्याने शुल्क भरून गाइडचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. जोधपूरपासून १३ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी खाजगी वाहनेही सहज उपलब्ध होतात.

मेहरानगड संग्रहालय

मेहरानगडावर असणारे पुरातत्त्व खात्याचे संग्रहालय हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ  शकेल इतके ते वैविध्यपूर्ण आहे. राजस्थानमध्ये असणाऱ्या उत्कृष्ट आणि मोठय़ा संग्रहालयापैकी एक असणारे हे संग्रहालय जिज्ञासू, अभ्यासू आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्यांनी आवर्जून पाहिलेच पाहिजे. राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या संग्रहालयात वेगवेगळी हत्यारे, युद्धाचे पोषाख, शाही वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू, पालख्या, पाळणे, चित्रे आदी गोष्टी पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या राजस्थानी पगडय़ा, कोणत्या प्रसंगी त्या वापरल्या जातात यांची अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.

जसवंत थडा

मेहरानगडापासून अवघ्या १ किलोमीटरवर लाल दगडाच्या चौथऱ्यावर संपूर्ण संगमरवरात उभारलेली ही वास्तू पाहताना आपण अक्षरश: विस्मयचकित होतो. ‘ताजमहाल ऑफ मारवाड’ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. नाजूक कलाकुसरीत सजलेली आणि सुंदर गवाक्षांनी वेढलेली ही जागा म्हणजे राजा जसवंत सिंग दुसरे यांची समाधी आहे. त्यांचे पुत्र राजा सरदार सिंह यांनी ही वास्तू आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधली आहे. याच्या अवतीभोवती इतरही समाध्या दिसतात. हा सारा परिसरच राजघराणाच्या समाध्यांसाठी बांधला गेला होता. याच्या समोरच कारंजी आणि सुंदर बाग फुलवली गेल्यामुळे हा परिसर खूपच मनमोहक वाटतो. ही जागासुद्धा मेहरानगडावरून दिसते.

उम्मेद भवन पॅलेस

मेहरानगडावरून बरेचसे गाईड उम्मेदभवनाची वास्तू दाखवतात. तिथेच आपली उत्सुकता चाळवली जाते. शहराच्या बाहेरच एका चित्तर नावाच्या टेकडीवर ही भव्य-दिव्य वास्तू उभारली गेली आहे. एखादा राजप्रासादाच जणू. ही वास्तू म्हणजे राजघराण्यातील लोकांचे निवासस्थान आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला ऐश्वर्याचं दर्शन घडतं. याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुन्या भारतीय तसेच पाश्चिमात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाडय़ात पाहायला मिळतो. सिंहासन हॉल, दरबार हॉल, मेजवानीचा मंडप, भोजगृह, नृत्यगृह आणि विशाल व्हरांडे पाहून आपण अक्षरश हरखून जातो. जोधपूरचे तत्कालीन राजे उमेद सिंह यांचे नाव या वास्तूला दिले आहे. उम्मेदभवन मधील वस्तुसंग्रहालयसुद्धा पाहण्यासारखे आहे. यामध्ये काचेची भांडी, चिनी मातीची भांडी, दिशादर्शक, छोटी पेंटिंग्ज, चिलखत व इतर स्मरणात राहतील अशा वस्तू आहेत. पॅलेसबाबतचा इतिहास दर्शनी भागातच आहे. उम्मेदभवनाचा अर्धाच भाग पर्यटकांसाठी खुला आहे. अध्र्या भागात आलिशान हॉटेल आहे. जवळपास २६ एकरांत असलेल्या या जागेत सुंदर बाग फुलवली गेली आहे. ही वास्तू म्हणजे राजस्थानी शाही आणि श्रीमंत संस्कृतीचे प्रतीकच! जोधपूर भेटीत अजिबात चुकवू नये असे हे ठिकाण आहे.

मारवाडचे प्रवेशद्वार असलेल्या या शहरात खाण्या-पिण्याची रेलचेल आहे. अनेक पदार्थ आवर्जून चाखावेत, असे आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा इथे फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ असतो. पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात त्यामुळे येथे राहण्यासाठीची हॉटेल आणि वाहनेही सहज उपलब्ध होतात. जोधपूरबाहेरील ही ठिकाणे पाहण्यासाठी स्वतंत्र रिक्षा, कार करता येते किंवा शेअर रिक्षांचाही पर्याय उपलब्ध आहे. जोधपूरमध्ये विमानतळ आणि रेल्वेस्थानकही आहे. सहकुटुंब सहलींसाठी जोधपूर हे अतिशय योग्य ठिकाण आहे.

ovartale@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:24 am

Web Title: castles city of palaces akp 94
Next Stories
1 एग अजुबा, एग उंधियो
2 काकडी
3 होममेड हॉट चॉकलेट
Just Now!
X