News Flash

गुहांच्या साम्राज्यात

या गुहांमध्ये निसर्गाचे सारे चमत्कार आपल्यासाठी जणू हात जोडून उभे असतात

गुहांच्या साम्राज्यात
मेघालयातील निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक म्हणजे तिथल्या गुहा

मेघालयातील निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक म्हणजे तिथल्या गुहा! या गुहांमध्ये इतकं काही वैविध्य दडलेलं आहे की ते पाहून स्तिमितच व्हायला होते. या गुहांची सर्वसामान्यांना ओळख करून दिली ती मेघालयातीलच ब्रायन डेल यांनी. ते म्हणतात, ‘वेलकम टू द वर्ल्ड ऑफ डार्कनेस’. तुम्ही म्हणाल भुयारात, गुहेत कसले सौंदर्य असणार?, पण जे भेट देतात त्यांना मात्र त्याची अनोखी अनुभूती येते.

मेघालयातील गुहांमध्ये चुनखडीचे स्तंभ, छतावर तयार झालेले विलक्षण नैसर्गिक रंगातील पडदे, तळी, प्रस्तरांच्या चित्रविचित्र रचना, एक ना दोन शेकडो गोष्टी येथे अनुभवता येतात. ब्रायन डेल यांनी २० वर्षांत अथक परिश्रम घेऊन मेघालयातील १३०४ भुयारांचे संशोधन केले आहे. मेघालयात गुहा, भुयारं तयार होण्यामागे शास्त्रीय कारण आहे. चुनखडीचा दगड, प्रचंड पर्जन्यवृष्टी, डोंगराळ भाग, उष्ण आणि दमट हवा हे सारे एकत्रितपणे आढळते ते मेघालयात. तेथील गारो, खासी आणि जयंतिया या डोंगर रांगांत ही सारी नैसर्गिक आणि भौगोलिक आश्चर्य दडली आहेत. प्रचंड पावसामुळे चुनखडीच्या डोंगराळ भागात हे पाणी वर्षांनुवर्षे झिरपत जाते आणि कमजोर ठिकाणी मातीचा थर वाहून जातो. पाण्याचे प्रवाह डोंगराच्या पोटात शिरतात आणि नैसर्गिक गुहा व भुयारे तयार होतात. ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ सुरू असते.

या गुहांमध्ये निसर्गाचे सारे चमत्कार आपल्यासाठी जणू हात जोडून उभे असतात. छतातून वर्षांनुवर्षे पाणी पडून तयार झालेले स्तंभ आढळतात. त्याला स्टॅलाग्माइट असे म्हणतात. चुनखडीचे हे स्तंभ छोटय़ा काठीच्या आकारापासून ते अगदी एखाद्या भल्या भक्कम वृक्षाच्या बुंद्धय़ाइतके प्रचंड असतात. वटवृक्षाच्या पारंब्या जशा जमिनीत परत घुसतात तसेच काहीसे दृश्य चुनखडीच्या या स्तंभांमध्येदेखील दिसून येते. काही गुहांमध्ये तर चुनखडीचे विविधरंगी पडदेच पाहायला मिळतात. याला स्टॅलासाइट म्हणतात. काही ठिकाणी डिस्क फॉर्मेशन दिसून येते. पाण्याचे प्रवाह तर भरपूरच, तळी आणि नैसर्गिक धरणदेखील देखील असतात. २१ किमी लांबीच्या एका गुहेत तर चक्क २.५ किमी लांबीचे तळेच दिसते.

गुहेचे मुख शोधणे अनेकदा कठीण असते. काही वेळा त्यात वरून उतरून जावे लागते, तर कधी थेट चालत जाता येते. मेघालयातील या गुहा, भुयारे प्रचंड म्हणावी अशीच आहेत. येथील सर्वात मोठे भुयार तब्बल ३१ किलोमीटरचे आहे. काही गुहांना आत अनेक फाटेदेखील फुटतात. काही ठिकाणी विस्तीर्ण मोकळ्या जागा असतात. चुनखडीचे अनेक आकार जसे दिसतात तसेच कीटकांच्या अनेक प्रजातीदेखील इथे सापडल्या आहेत. सततच्या मिट्ट काळोखानुसार त्यांच्या जैविक रचनेत काही बदल देखील झाले आहेत. डोळ्याचा उपयोग नसल्याने एका कीटकाच्या ‘अ‍ॅन्टेना’ची लांबी वाढत गेलेली आढळली. पांढरा फटफटीत बेडूकदेखील आहे.

सर्वसामान्य पर्यटकांसाठी मेघालय पर्यटन खात्यातर्फे मोसमयी ही गुहा खुली करण्यात आली आहे. या गुहेत शिडय़ा, प्रकाशयोजना, मार्गदर्शक यांची सुविधा देण्यात आली आहे. नुकतीच आणखीन एक गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मेघालय पर्यटन खात्याच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे.

या गुहा हा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. पण चुनखडीचे सिमेंटमधील महत्त्व पाहता येथील डोंगरात चुनखडीच्या खाणींची संख्या बेसुमार वाढली आहे. अनेक गुहांची नासधूस झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून गुहा बंद पडल्या आहेत. मेघालय पर्यटन खात्याने गुहांचा ठेवा टिकवण्यासाठी फेब्रुवारी २०१० मध्ये गुहेतच एका परिषदेचे आयोजन केले होते. पण त्यानंतरदेखील परिस्थिती बदललेली नाही. साहसाची आवड असेल तर वाट वाकडी करून हे अनुभवायला हवे.

पर्यटन आणि साहसाचा मिलाफ

अर्थात या गुहा पाहणे हा साहसी खेळाचाच एक प्रकार आहे. गिर्यारोहण, स्कुबा डायव्हिंगच्या सामग्रीचा आणि कौशल्याचा वापर करत या गुहांमध्ये संचार करावा लागतो. ब्रायन डेल यांच्या संशोधनात अनेक परदेशी गुहा संशोधक सामील होत असतात. तुलनेने भारतीयांचा या खेळाकडे ओढा कमीच आहे. महाराष्ट्रातील काही साहसवीरांनी युथ होस्टेलच्या माध्यमातून या गुहा संशोधनात भाग घेतला होता. साहसी खेळांचे व्यापारी तत्त्वावर आयोजन करणाऱ्या काही कंपन्यादेखील सध्या या भागात कार्यरत आहेत. पण तुलनेने भारतीय याकडे कमीच वळतात.

suhas.joshi@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 2:12 am

Web Title: cave in meghalaya natural caves of meghalaya krem puri cave in meghalaya
Next Stories
1 शहरशेती : सदासुखी मनीप्लांट
2 सुंदर माझं घर : चंदेरी फुले
3 खाद्यवारसा : खिमा मटार
Just Now!
X