05 August 2020

News Flash

आजारांचे कुतूहल : सिलिअ‍ॅक डिसीज

जगभरात दरहजारी ७ जणांमध्ये, तर भारतात दर १०० व्यक्तींमागे एक व्यक्ती या रोगाने पछाडलेली आढळते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अविनाश भोंडवे

सिलिअ‍ॅक डिसीज हा पचनसंस्थेचा एक आजार आहे. याला सिलिअ‍ॅक स्प्रू किंवा ग्लुटेन सेन्सिटिव्ह एन्टरोपाथी असेही म्हणतात. हा आजार होण्यास कारणीभूत ग्लुटेन नावाचे एक प्रथिन असते. गहू, राय आणि बार्ली अशा तृणधान्यात ते असते. सिलिअ‍ॅक डिसीजने पीडित व्यक्ती हे ग्लुटेन पचवण्यात सक्षम नसतात. ग्लुटेन आहारातून पोटात गेल्यावर आपल्या प्रतिरक्षा प्रणालीवर (इम्युन सिस्टीम) आणि लहान आतडय़ाच्या आतील बाजूस असलेल्या अस्तरावर परिणाम करते. परिणामत: अन्नाचे अभिशोषण योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे आहारातून शरीराला मिळणारे जीवनसत्त्वे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ,कॅल्शियम, स्निग्ध पदार्थ असे आवश्यक घटक शोषले जात नाहीत. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन व्यक्ती खंगून जाते.

जगभरात दरहजारी ७ जणांमध्ये, तर भारतात दर १०० व्यक्तींमागे एक व्यक्ती या रोगाने पछाडलेली आढळते. या आजारात आनुवंशिकता दिसून येते. कुटुंबातील एका व्यक्तीला हा आजार असेल तर, पुढच्या पिढीतील दहा सदस्यांमध्ये आणखी एकाला तो होण्याची शक्यता असते. या रुग्णात प्रतिरक्षा प्रणालीचा एखादा आजार असतोच. उदा. मधुमेह टाईप१, संधिवात, ऑटो-इम्युन थायरॉइड किंवा यकृताचे आजार, अ‍ॅडिसन्स डिसीज इत्यादी. अनेकदा डाउन्स सिंड्रोम किंवा टर्नर सिंड्रोमसारखे जनुकीय आजार या व्यक्तींमध्ये जन्मजात आढळतात.

सिलिअ‍ॅक डिसीज एखाद्यामध्ये जन्मजात असला, तरी त्याची लक्षणे जन्मापासून दिसतीलच असे नसते. आयुष्यात कधीतरी एखाद्या अपघातानंतर, किंवा जंतुसंसर्ग, कमालीचा ताणतणाव, शस्त्रक्रिया आणि स्त्रियांमध्ये प्रसूती अशा घटनांमध्ये तो उत्प्रेरित होऊन कार्यरत होतो.

लक्षणे

लहान आणि तरुण मुलांमधील लक्षणे

* अपचन, पोटात दुखणे, पोटात गुबारा धरणे, उलटी, मळमळ, जुलाब किंवा मलावरोध

* सतत किरकिर किंवा चिडचिड करणे, आईवर जास्त अवलंबून असणे, मानसिकदृष्टय़ा भावनाशील

* वजन कमी आणि उंची खुरटलेली राहते.

* दात किडतात

* पौगंडावस्थेतील शारीरिक आणि लैंगिक लक्षणे उशिरा दिसतात.

* केस खूप पातळ होतात.

प्रौढांमधील लक्षणे

* एकतर सतत जुलाब होत राहणे किंवा मलावरोध होणे

* थकवा वाटणे, हातापायांची हाडे व सांधे सतत दुखणे

* चिडचिड, चिंता, नैराश्य

* स्त्रियांमध्ये मासिक पाळीची अनियमितता

* हिमोग्लोबिन कमी होऊन अ‍ॅनिमिया होणे.

* हाडे ठिसूळ बनणे

काही विशेष लक्षणे-

* लॅक्टोज इन्टॉलरन्स- दुधातील शर्करा न पचल्याने दूध घेतल्यावर जुलाब होणे.

* डर्माटायटिस हर्पेटीफॉर्मिस- अंगावर बारीक फोड येऊन खाज सुटत राहते.

* सतत तोंड येणे

निदान

रुग्णाच्या तक्रारी, त्याच्या आजाराचा इतिहास यामधून प्राथमिक निदान केले जाते. रक्ताच्या तपासण्यात सिलिअ‍ॅक डिसीजसाठी असलेल्या टीटीजी-आयजीए अ‍ॅण्टिबॉडीज रक्तात अधिक प्रमाणात सापडल्यास निदान पक्के होते. जनुकीय तपासणीत एचएलए-डीक्यू२ आणि एचएलए-डीक्यू८ हे ल्युकोसाईट अ‍ॅण्टिजेन्स सापडल्यावर खात्री होते. लहान आतडय़ाची एन्डोस्कोपी करून त्याच्या अस्तराचे सूक्ष्म तुकडे काढून (बायोप्सी) सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून आजाराची व्याप्ती समजते.

सिलिअ‍ॅक डिसीज असल्यास अनेक प्रकारचे जटिल त्रास निर्माण होतात. यात शारीरिक कुपोषण, खुंटणारी शारीरिक वाढ, शिवाय रिकेटस, ऑस्टिओमॅलेसिया, ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओपोरोसिस असे अनेक प्रकारचे हाडांचे आजार ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियमच्या अभावाने होतात. गर्भवती स्त्रियांमध्ये अपुऱ्या दिवसांची प्रसूती, नैसर्गिक गर्भपात घडून येतात. सिलिअ‍ॅक डिसीजचे उपचार वेळेवर न केल्यास लहान आतडय़ाचे कर्करोग होण्याची शक्यता असते.

उपचार- यामध्ये रुग्णाला बरे करायला कोणत्याही औषधांची गरज नसते, तर कायमस्वरूपी ग्लुटेनविरहित आहार द्यावा लागतो. म्हणजे गहू, गव्हाचे पीठ, मैदा, बार्ली, राय, ओट्स यांचा वापर असलेले पदार्थ टाळावे लागतात. घरात ही पथ्ये सांभाळणे सोपे असते, पण अनेकदा हॉटेल्समध्ये, समारंभात, कौटुंबिक कार्यक्रमात त्याकडे दुर्लक्ष होऊन त्रास होऊ  शकतो. मात्र ज्या रुग्णात या आजारामुळे लोह, जीवनसत्त्वे, कॅल्शियम यांची कमतरता आढळते, त्यांना पूरक गोळ्या, औषधे, इंजेक्शन्स घ्यावी लागतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 2:55 am

Web Title: celiac disease symptoms and causes treatment zws 70
Next Stories
1 योगस्नेह : भस्रिका प्राणायाम
2 आरोग्यदायी आहार : तिळगूळ पोळी
3 ‘ई कॉल’चे सुरक्षाकवच
Just Now!
X