|| आशुतोष बापट

चक्रवर्ती हे बिरुद खरे तर एखाद्या सम्राटाला वापरले जाते. ऐश्वर्य, सामर्थ्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून हे बिरुद वापरतात. पण हेच बिरुद एका मंदिराला वापरलेले आहे. हे मंदिर म्हणजे ‘देवालयांमधील चक्रवर्ति’ म्हणजे समृद्ध, संपन्न असे देवालय आहे असे हे मंदिर बांधणाऱ्याचे सांगणे आहे आणि ते तंतोतंत खरे आहे. मंदिर वैभवात भारत खरोखर श्रीमंत म्हणावा लागेल. प्रत्येक प्रांतात ही मंदिर श्रीमंती जागोजागी आढळून येते. निसर्गरम्य कर्नाटक त्याला अपवाद कसा ठरेल. येथील मोठमोठय़ा राजसत्तांनी हा सगळा प्रदेश संपन्न केलेला आहे. मंदिरस्थापत्य उत्कर्षांला पोचलेले इथे कर्नाटकात आल्यावर प्रकर्षांने जाणवते. त्याच्या खुणा इथे आपल्याला अक्षरश: गावोगावी दिसतात.

कर्नाटक आणि मंदिरे म्हटल्यावर हंपी-बदामी आणि बेलूर-हळेबिडु ही समीकरणे डोक्यात पक्की झालेली असतात आणि अर्थात त्याला कारणही तसे आहेच. देखणी आणि शिल्पसमृद्ध अशी ही ठिकाणे. त्यातही काही जागतिक वारसास्थळे म्हणून नोंद झालेली, त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथे असणे स्वाभाविक आहे. परंतु आज जे ठिकाण पाहायचे आहे तेही इतकेच सुंदर आणि देखणे ठिकाण. गर्दी आणि कोलाहलापासून दूर, पण मंदिरस्थापत्याच्या दृष्टीने अत्यंत श्रीमंत असे आहे. ते आहे कोप्पळ जिल्ह्यातल्या इटगी इथले महादेव मंदिर. हंपी-धारवाड मार्गावर कोप्पळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २६ किमी अंतरावर वसले आहे हे इटगी. इथून गदगजवळील लकुंडी हे गाव फक्त २० किमी आहे.

चालुक्याचा राजा विक्रमादित्यच्या काळानंतर आलेल्या होयसळ राजवटीमध्येसुद्धा विक्रमादित्यच्या काळातील क्लोरायटिक शिस्ट हाच दगड वापरलेला दिसतो. इथल्या या मंदिराला तीन बाजूंनी मुखमंडप असून त्याच्या द्वारशाखा कोरीव कामाने मढलेल्या आहेत. मुख्य दरवाजाला ९ द्वारशाखा असून बाजूच्या दोन मुखमंडपांना ७ द्वारशाखा आहेत. मंदिरस्थापत्यात सुशोभित द्वारशाखा हा एक ठसठशीतपणे उठून दिसणारा घटक आहे. दरवाजाच्या चौकटींची रचना, त्यातला अचूकपणा, त्यावर केलेली सुंदर शिल्पकला यामुळे या द्वारशाखा लक्षवेधी होतात. यावर व्याल, पानाफुलांची वेलबुट्टी, विविध वादकांची शिल्पांकने, मिथुन शिल्पे, गण, विद्याधर, गंधर्व अशी विविध कलाकुसर इथे केलेली आहे. ७ द्वारशाखा असलेल्या दाराला ‘हस्तिनी’ तर नऊ  द्वारशाखा असलेल्या दाराला ‘पद्मिनी’ असे म्हणतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या सभामंडपाला ९ द्वारशाखा आहेत. या खूप कमी आढळतात आणि त्या इटगी इथल्या या शिवमंदिराला आहेत.

मुखमंडपातून आत गेल्यावर समोरच एक रंगशिळा असून त्यावर नंदीची मूर्ती आहे. इथेच असलेल्या छतावर नृत्य करणाऱ्या शिवाची सुंदर मूर्ती दिसते. कर्नाटकात अनेक मंदिरामधून छतावर खूप कोरीव शिल्पकला केल्याचे बघायला मिळते. येथेही नृत्य करणारा शिव आणि त्याच्या भोवती त्याचे गण असे सुंदर शिल्प आहे. येथील खूप बारकाव्यांसकट कोरलेले खांब आणि दुसरे म्हणजे गुळगुळीत पॉलिश केलेले खांब ही चालुक्यांच्या मंदिरांची ही एक खासियत म्हणायला हवी.  जणू काही लेथ मशीनवर घडवलेले असावेत इतके अचूक आणि इतके सुंदर खांब कसे घडवले असतील हे  मोठं आश्चर्य आहे. खांबांच्या पायथ्याशी देवतांच्या मूर्ती आणि खांबांवर विविध नक्षीकाम. शिवाय त्यांची गोलाई आणि घाट निव्वळ अप्रतिम. गाभाऱ्याच्या ललाटावर गजलक्ष्मीचे सुंदर शिल्प असून गाभाऱ्यात शिवपिंड आहे. गाभाऱ्याच्या द्वारशाखेच्या वरच्या भागात म्हणजेच उत्तरांगावर अजून एक नृत्यशिवाचे मोठे शिल्प कोरलेले आहे. त्याच्याभोवती मकरतोरण म्हणजे दोन बाजूंना मगरीचे मुख आणि त्यांच्या तोंडातून आलेले पानाफुलांचे नक्षीकाम. कलाकुसर आणि नक्षीकाम या दोन्ही गोष्टी  सढळ हाताने केलेल्या दिसतात.

मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणा घालताना खास चालुक्यांची स्थापत्यशैली दिसून येते. मंदिराच्या बाह्य़भिंतीवर केलेले कोनाडे आणि छज्जे, तसेच निमुळते होत जाणारे आणि विविध टप्पे असलेले शिखर, त्यावर केलेली कीर्तिमुखांची रचना हे खास चालुक्यांचे वैशिष्टय़ आहे. शिखराच्या छोटय़ा प्रतिकृती जागोजागी केलेल्या दिसतात.  परिसरात अजून दोन मंदिरे असून ती या मंदिराचा निर्माता आणि चालुक्यांचा सेनापती ‘महादेव’ याच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ बांधली आहेत.  या मंदिरावरील काही मूर्ती या गायब झालेल्या दिसतात. मंदिराच्या शिखराच्या काही भागाचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे एक सुंदर पुष्करिणी असून त्यात उतरायला पायऱ्या आहेत. महाराष्ट्रात जशा मंदिरांच्या बाजूला बारव, पुष्करिणी दिसतात तशाच कर्नाटकातसुद्धा अनेक बावी/पुष्करिणी पाहायला मिळतात. इटगी जवळच असलेल्या डंबल या गावी असलेले ‘दोड्डबसप्पा मंदिर’ आणि त्यापासून जवळच असलेली बावी फारच देखणी आहे.

इटगी इथले महादेव मंदिर, त्याचे स्थापत्य आणि त्यावरील शिल्पकाम थक्क करणारे आहे. देखणे, आणि स्थापत्याने समृद्ध असे हे मंदिर काहीसे आडबाजूला आहे. कर्नाटकच्या भटकंतीमध्ये हंपीचा समावेश असतोच. त्याच हंपीवरून गदग किंवा धारवाडला येताना वाटेत हे ठिकाण आहे. इटगी आणि डंबल इथली चालुक्यांची ही मंदिरे वेळ काढून बघण्यासारखी आहेत. पुरातत्त्व खात्याने हा सगळा परिसर अतिशय सुंदर राखलेला आहे. या ठिकाणी असलेले पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी आवर्जून या ठिकाणांची आणि इथून जवळ असलेल्या इतर ठिकाणांची माहिती देतात. संध्याकाळच्या कलत्या उन्हात मंदिराच्या खांबांमधून तिरपे पडणारे सूर्याचे किरण या मंदिराचे सौंदर्य अजून वाढवतात. मंदिरस्थापत्य, त्यावरचे शिल्पकाम, आजूबाजूला असलेली नीरव शांतता आणि देखणा परिसर, पाठीमागे असलेली पुष्करिणी या मंदिराचे ‘देवालय चक्रवर्ती’ हे नाव सार्थ करतात.

समृद्ध मंदिर

इटगी इथे आहे महादेव मंदिर. इ.स. च्या १२ व्या शतकात या ठिकाणी कल्याणी चालुक्यांचा राजा विक्रमादित्य सहावा याचे राज्य होते. त्यांचा सरसेनापती (दंडनायक) होता महादेव. त्याने हे मंदिर बांधले आहे. मंदिरात एक शिलालेख असून त्यात या मंदिराचा उल्लेख ‘देवालय चक्रवर्ति’ असा केलेला आहे. मंदिरांमधील समृद्ध, संपन्न मंदिर असेच जणू या महादेवाला सुचवायचे आहे. या मंदिराची रचना ही अण्णिगेरी इथल्या अमृतेश्वर मंदिरासारखीच आहे. हे अमृतेश्वर मंदिर इ.स. १०५० मध्ये बांधले गेले. आणि इटगी इथले महादेव मंदिर बांधले इ.स. १११२ साली. देखणे, सुंदर, आकर्षक अशी कितीतरी विशेषणे लावता येतील असे हे महादेव मंदिर आहे. क्लोरायटिक शिस्ट या दगडात केलेली मंदिरनिर्मिती हे अजून एक चालुक्यांचे वैशिष्टय़ आहे.

ashutosh.treks@gmail.com