डॉ. अविनाश भोंडवे

बिहारच्या मुझफ्फरपूर आणि अन्य जिल्ह्य़ांमध्ये रौद्रतांडव घातलेल्या अ‍ॅक्युट एन्केफेलायटिस सिंड्रोम (एईएस) या आजाराला तिथल्या प्रादेशिक बोलीभाषेत ‘चमकी बुखार’ तर आपल्याकडे ‘मेंदूज्वर’ म्हटले जाते. याचाच एक उपप्रकार जॅपनीज एन्केफेलायटिस नावाने प्रचलित आहे.

वैशिष्टय़े- हा ताप साधारणपणे उन्हाळ्यात उद्भवतो. कोणत्याही वयामध्ये हा आजार होऊ  शकतो, पण नुकत्याच जन्मलेल्या अर्भकापासून १५ वर्षांपर्यंतच्या आणि आर्थिकदृष्टय़ा गरीब आणि कुपोषित मुलांमध्ये हा होण्याची शक्यता जास्त असते. खाण्यापिण्याची मारामार असलेल्या आणि पौष्टिक अन्न न मिळाल्याने या बालकांच्या रक्तातील साखर आणि सोडियम कमी होते, त्यामुळे हा बळावतो, असे संशोधनात निष्पन्न झाले आहे. भारतातील उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडू या राज्यांत या आजाराचा प्रादुर्भाव आढळतो.

कारणमीमांसा- निरनिराळे विषाणू (व्हायरस), जीवाणू (बॅक्टेरिया), परजीवी (पॅरासाइट्स), शैवाल (स्पायरोचीट), रसायने, विषारी पदार्थ यांच्या संसर्गातून हा आजार होतो. अशा अनेक कारणांनी होणाऱ्या या आजाराला सिंड्रोम (रोगसमूह) म्हणतात.

मेंदूज्वराचे मुख्य विषाणू म्हणजे हर्पीस व्हायरस, मम्प्स, डेंग्यू, कांजिण्या, एन्ट्रोव्हायरस, वेस्ट नाइल, जपानी एन्केफेलाइटिस, इस्टर्न इक्वाइन व्हायरस, टिक-बोर्न व्हायरस हे असतात. याव्यतिरिक्त निपाह आणि झिका व्हायरस यांच्यामुळेही एन्केफेलाइटिसचे होऊ  शकतो. मेंदूज्वर ज्या सूक्ष्म जीवाणूमुळे पसरतो, त्यात एन्केफलायटिस बॅक्टेरिया, फन्गाय, मलेरियाचे परजीवी येतात.

लक्षणे- यात खूप कडक ताप येतो आणि मज्जासंस्थेला सूज येऊन त्यासंबंधातली लक्षणे दिसतात. यामध्ये अतिप्रमाणात डोके दुखणे, मळमळ होऊन उलटय़ा होणे, मानसिकदृष्टय़ा गोंधळलेल्या अवस्थेत असणे, दैनंदिन वागण्यात बदल होणे, असंबद्ध बोलणे, स्मृतिभ्रंश ही लक्षणे दिसतात. आजार वाढत गेल्यास हाता-पायातली ताकद कमी होऊन लकवा मारणे, झटके येणे, शुद्ध हरपून कोमात जाणे अशी गंभीर लक्षणे होण्याची शक्यता असते. याशिवाय जुलाब होणे, अचानक चिडचिडेपणा येणे, हातपाय, मान, पाठ खूप दुखणे, बोलताना आणि ऐकताना त्रास होणे, वाईट स्वप्ने पडणे, कमालीचा आळस येणे, हातापायांना कंप सुटणे असे त्रासही होतात.

रोगनिदान -रुग्णाच्या लक्षणांवरून आणि शारीरिक तपासणीतून या आजाराचा अंदाज डॉक्टरांना येऊ  शकतो. मात्र या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी एमआरआय, ईईजी, पाठीतील पाण्याचे विश्लेषण, रक्तामधील मेंदूज्वराची आयजीएम अ‍ॅण्टिबॉडी तपासणे अशा तपासण्या केल्या जातात.

उपचार- चमकी तापाने पीडित मुलांना त्वरित जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्वरित दाखल करावे लागते. मेंदूत सूज पसरण्यापासून रोखण्यासाठी बारकाईने निरीक्षण करीत उपचार करावे लागतात. यामध्ये तापातील चढउतार, रक्तदाब, हृदयाचे ठोके, श्वसन, रक्तातील साखर, क्षार सतत तपासावी लागतात.

लिचीचा संबंध

मुझफ्फरपूरमधील मुलांनी तिथे भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले लिची हे फळ खाल्ले आणि त्यांना हा आजार झाला, असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते, लिची या फळात ‘हायपोग्लायसिन ए’ नावाचे एक असे रसायन असते की ते खाल्लय़ाने रक्तातील साखरेची आणि सोडियमची पातळी एकदम कमी होते आणि हा आजार उद्भवतो. बिहारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानुसार ८० टक्के मृत्यू हे रक्तातील साखर कमी झाल्यामुळे  झाले आहेत.बिहारच्या मुजफ्फरपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब कुटुंबातील मुले मुळातच कुपोषित आहेत. उपासमारीमुळे रात्री उपाशी राहून सकाळी अनशेपोटी लिची खातात. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होऊन हा आजार झाला असे ‘द लॅन्सेट’ या नामांकित वैद्यकीय नियतकालिकात बालरोगतज्ज्ञांनी मांडले आहे.