विष्णू मनोहर, शेफ

एकावेळी अनेक कार्यक्रमात सहभागी होताना ताण येणे साहजिकच आहे. पण मला शक्यतो ताण येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मी माझी कामे करताना आठवडाभर आधी तयारी करतो. नियोजन करतो. कोणत्या दिवशी काय करायचे आहे याचे नियोजन असेल तर मनावर कोणताही ताण येत नाही. पदार्थ करताना कोणतेही जिन्नस प्रमाणातच टाकावे लागतात. कुठलाही पदार्थ कमी घातला किंवा जास्त घातला गेला तरी त्या पदार्थाची चव बदलते. त्याचप्रमाणे ताणाचे आहे. ताण अधिक घेतला तर जगण्याची मजा निघून जाते आणि कमी घेतला तर ध्येय गाठण्यासाठी अडचणी येतात. ज्याप्रमाणे समतोल आहार घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे समतोल ताण घ्यावा.

सिनेमा बघायला जाताना देखील मी आठवडाभर आधी नियोजन करतो. मग त्या दिवशी माझे मन मी प्रसन्न ठेवतो. कोणत्या मोठय़ा उपाहारगृहात सायंकाळी जेवणासाठी जायचे असल्यास त्याची तयारीही मी सकाळपासूनच करतो. सकाळी किती खावे आणि कसे खावे हे ठरवून घेतो. त्यामुळे सायंकाळच्या जेवणाची चव मनसोक्त चाखता येते. त्यामुळे मन प्रसन्न होते. कामाचा कधीही कंटाळा कधीही मी करत नाही. काम म्हणजे एक कार्यक्रम आहे असे मनाशी ठरवून घेतले तर एक उत्साह निर्माण होतो. प्रत्येक गोष्ट काहीतरी मजेशीर आहे हे लक्षात ठेवले तर कोणताही ताण येत नाही. चित्रपट बघताना आशयपूर्ण असलेले चित्रपट पाहतो. अनेक पुस्तके वाचतो. पुस्तकांमध्ये कादंबरी प्रकार वाचतो.पुस्तक वाचून पूर्ण करणे हे माझे ताणमुक्तीचे एक साधन आहे.

काही वेळा लेख लिहायचे असतात त्यावेळी हे वाचन महत्त्वाचे ठरते. अनेक कामावर जाणाऱ्या महिलांना वेळेत जेवण बनवणे हा एक प्रकारचा ताण असतो. अशावेळी २० मिनिटात आपले सगळे जेवण बनवून होणार आहे हे मनात ठेवणे महत्त्वाचे असते. दोन भाज्या, डाळ, चपाती हे सगळे जेवण २० मिनिटात बनवून पूर्ण होते. आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली की कामाचा ताण हलका होतो. त्यामुळे कामाचा कंटाळा जातो आणि उत्साह निर्माण होतो. लहान मुले डॉक्टरला बघून रडायला सुरुवात करतात. मात्र त्या लहान मुलांना आपण डॉक्टर काकांबरोबर गप्पा मारायला सांगतो तेव्हा त्यांची भीती आपोआपच दूर होते.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान