16 October 2019

News Flash

काळजी उतारवयातली : मूत्रपिंड विकाराचे निदान नि उपचार

क्रोनिक किडनी फेल्युअरच्या शेवटच्या अवस्थेत म्हणजे जेव्हा किडनीचे कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी होते

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नीलम रेडकर

मूत्रपिंडाचे काही विकार इतक्या गंभीर स्वरूपाचे असतात की त्यांचे कार्य पूर्ववत करणे अवघड असते. म्हणूनच मूत्रपिंड विकारांचे निदान लवकर झाले पाहिजे. एका मूत्रपिंडाचे काम थांबले तरी दुसऱ्याच्या साहाय्याने शरीराचे सर्व काम सुरळीत पार पडू शकते. परंतु दोन्ही मूत्रपिंडे कायमस्वरूपी निकामी झाल्यास डायलिसिस किंवा मूत्रपिंड रोपण हे दोनच पर्याय उरतात.

मूत्रपिंड विकारांचे निदान- मूत्रपिंड विकारांचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास त्यावर प्रभावीपणे उपचार करून क्रोनिक किडनी फेल्युरचा संभाव्य धोका टाळू शकतो. मूत्रपिंडाच्या आजारामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचीही शक्यता वाढते. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजारांवर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे आहे. वर्षांतून एकदा खालील चाचण्या करून आपण मूत्रपिंडांची कार्यक्षमता तपासू शकतो-

युरिन रूटीन : लघवीतून जाणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण या चाचणीतून कळते. युरिन अल्बुमिन क्रिएटिनिन रेशोच्या प्रमाणामुळे मूत्रपिंडाला किती प्रमाणात इजा झाली हे समजते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये लघवीतून जाणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. मूत्रपिंडाचे कार्य तपासण्यासाठी रक्तातील युरिया, क्रिएटिनीन, हिमोग्लोबीन, युरिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, फास्फोरस या घटकांची तपासणी करणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाची अल्ट्रासोनोग्राफी करून काही मूत्रपिंड विकारांचे निदान होऊ शकते. जसे की क्रोनिक किडनी फेल्युअर झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचा आकार लहान होतो. या चाचणीने मूत्रपिंडाचे कार्य तपासू शकत नाही तर रचना दिसते.

मूत्रपिंड विकारांवरील उपचार- मूत्रपिंड विकारांवरील उपचार हे मूत्रपिंडाचा आजार तात्पुरता  की कायम स्वरूपाचा (क्रोनिक डिसिज) यावर अवलंबून आहे.

अ‍ॅक्युट किडनी फेल्युअर ज्या कारणांनी झाला आहे, त्यावर मात केली तर मूत्रपिंडाचे कार्य पूर्ववत होते आणि त्यातून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु या आजाराकडे दुर्लक्ष केले किंवा उपचार घेण्यासाठी विलंब केला तर मूत्रपिंडे कायमस्वरूपी निकामी होऊ शकतात.

क्रोनिक किडनी फेल्युअर ७० टक्के रुग्णांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांमुळे होतो. म्हणूनच रक्तदाब आणि मधुमेहाची औषधे नियमितपणे घेतली पाहिजे आणि शरीरातील साखरेचे आणि रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित ठेवले पाहिजे.

डायलिसिस- क्रोनिक किडनी फेल्युअरच्या शेवटच्या अवस्थेत म्हणजे जेव्हा किडनीचे कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी होते, तेव्हा रक्तामध्ये टाकाऊ घटकांचे प्रमाण वाढते. बाधा आणणाऱ्या गंभीर घटना घडू शकतात. डायलिसिस म्हणजे मूत्रपिंडाचे काम यंत्र करते. शरीरातील हानीकारक द्रव्ये आणि पाणी रक्तातून बाहेर काढण्याचे डायलिसिस हे माध्यम आहे. रुग्णांच्या सोयीनुसार आणि आजारानुसार हेमोडायलिसिस किंवा पेरिटोनिय डायलिसिस मूत्रपिंडविकारावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार रुग्ण घेऊ शकतात.

मूत्रपिंडरोपण – डायलिसिसपेक्षा मूत्रपिंडरोपण हा क्रोनिक किडनी फेल्युअरच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. कारण नव्या मूत्रपिंडाच्या रोपणामुळे सर्वसाधारण आणि निरोगी आयुष्य जगता येते. परंतु योग्य दाता मिळणे, शरीरातून नवीन मूत्रपिंड नाकारले जाणे, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जंतुसंसर्ग होणे हेही धोके असू शकतात. परंतु योग्य काळजी घेतल्यास आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही उपचारपद्धती अवलंबल्यास रुग्णांना होणारे फायदे हे डायलिसिसपेक्षा नक्कीच जास्त आहेत.

घ्यावयाची खबरदारी- मूत्रपिंड कायमस्वरूपी खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. म्हणूनच हे दोन्ही आजार नियंत्रित ठेवणे फार गरजेचे आहे.

*      वेदनाशामक औषधे घेताना काळजी घ्या. डायक्लोफेनॅक, अ‍ॅक्लिोफेनॅक ही औषधे दीर्घकाळ घेतल्यास मूत्रपिंडाचा विकार होऊ शकतो. जेन्टामायसिन, सल्फा ही प्रतिजैविकेसुद्धा काही रुग्णांमध्ये मूत्रपिंडाला इजा करू शकतात. म्हणूनच वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा.

*      आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा. अति मिठाच्या सेवनाने शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो.

*      रोज भरपूर पाणी प्या. दररोज दीड ते दोन लिटर पाणी प्या.

*      मूत्राचा आवेग रोखू नका.

First Published on April 23, 2019 3:02 am

Web Title: chronic kidney disease diagnosis and treatment