06 April 2020

News Flash

सुगंधित मोगरा

मोगरा वर्गातील फुलझाडांना नवीन फांदीवरच कळ्या येतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात झाडाचे पोषण झाले तर पुढे फुले जास्त येतात.

शहर शेती : राजेंद्र श्री. भट

गॅलरीमध्ये कुंडीत लावल्या जाणाऱ्या बहुवर्षांयु फुलझाडीत भारतभर आवडणारे फुलझाड म्हणजे मोगरा. हे सुगंधित पांढऱ्या फुलांचे, अनेक वर्षे टिकणारे फुलझाड आहे. फुले सामान्यपणे उन्हाळ्यात येतात. याचा आकार व विस्तार झुडपाएवढा ठेवता येतो अथवा वेलीसारखी वाढ करता येते. भारतात मोगऱ्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. दक्षिण भारतात मोगऱ्याला मल्लिगे म्हणतात. आता वर्षभर फुलणारा मोगरा उपलब्ध झाला आहे व त्याची लागवड सर्वत्र होत आहे. बटमोगरा, पुणे मोगरा, वसई मोगरा, मोतिया, मदनबाण असे मोगऱ्याचे काही प्रसिद्ध प्रकार आहेत. हे सर्व प्रकार आधार मिळाल्यास वेलीसारखे वाढू शकतात.

अभिवृद्धी – मोगऱ्याची लागवड जून फांद्यांपासून होते. लागवडीसाठी किमान वीतभर लांबीची निरोगी फांदी घ्यावी. फांदीवरील सर्व पाने काढून टाकावीत. जमिनीत जाणाऱ्या भागाला रूट हॉर्मोन म्हणजे मुळे फुटणारे संजीवक (कॅरडेक्स) लावावे. वातावरणात आद्र्रता ८० टक्केपेक्षा जास्त असते तेव्हा मुळे फुटतात. साधारणपणे ३-४ महिन्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला फांद्या फुटून साधारण ९ सेंमी वाढल्यानंतर त्यांची टोके कापावीत, म्हणजे पानांच्या बगलांमधून नवीन फांद्या फुटतात. जेवढय़ा फांद्या जास्त तेवढे झाड चांगले वाढते. पुढे फुलेसुद्धा जास्त मिळतात.

मोगरा वर्गातील फुलझाडांना नवीन फांदीवरच कळ्या येतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात झाडाचे पोषण झाले तर पुढे फुले जास्त येतात. पानांची संख्या, सूर्यप्रकाश मिळण्याचा कालावधी व मातीत असणारे सेंद्रिय घटक व जिवाणू यावर झाडाचे पोषण अवलंबून असते. झाडाच्या पानांनी तयार केलेले अन्न फांद्यांत साठवले जाते.

कुंडीतील मोगऱ्याला फेब्रुवारी महिन्यात पाणी बंद करावे. फांद्यांची हलकी छाटणी करावी. पाने काढून टाकावीत. तीन-चार दिवस पाण्याची विश्रांती झाल्यावर पाचव्या-सहाव्या दिवशी पाणी द्यावे. या वेळी पाण्यात थोडे गोमूत्र, थोडे गाईचे शेण मिसळून द्यावे. जीवामृत दिल्यास फारच उत्तम. नवीन धुमारे फुटून साधारण महिन्या-दीड महिन्यात फुले सुरू होतात. जुलैपर्यंत फुले मिळू शकतात. पोषणासाठी दर १५ दिवसांनी खते द्यावीत. यात जीवामृत अर्धा लिटर, कडुनिंब पेंड २ चमचे, कोणतेही ‘मील’ नावाचे खत २ चमचे दर १५ दिवसांनी द्यावे. मांसाहारी लोकांनी मासे, मटण, चिकन धुतलेले पाणी झाडाला घालावे. शाकाहारी लोकांनी मोड आलेली कडधान्ये व धान्ये (सप्तधान्यांकुर) वाटीभर घेऊन मिक्सरमधून बारीक करून दोन ते चार लिटर पाण्यात मिसळावी व ते पाणी झाडाला द्यावे. यामुळे फूट सतत येत राहील व फुले मिळत राहतील.

घरातील ओला कचरा कुंडीतील मातीवर टाकत राहावे. त्यावर चिलटे आली तर हळद व पाण्याचे मिश्रण करून त्यावर शिंपडावे. अशा प्रकारे मोगऱ्याची लागवड करून आपण वातावरण सुगंधित करू शकतो. मोगऱ्याचा सुगंध शरीरातील उष्णता कमी करणारा आहे. म्हणून मोगरा उन्हाळ्यात फुलतो. मोगऱ्याला जास्तीत जास्त ऊन आवश्यक असते.

rsbhat1957@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:03 am

Web Title: city farming fresh mogra akp 94
Next Stories
1 प्रेमाचं गॅजेट
2 वादळ असताना घरावरील पत्रे उडून का जातात?
3 उपकरणातून जलशुद्धी
Just Now!
X