राजेंद्र भट

आपल्या आहारात बऱ्यापैकी वापरला जाणारा बटाटा आपण वाफ्यात लावू शकतो. थंड हवामान बटाटय़ाला पोषक असते. महाराष्ट्रात अतिपावसाचा प्रदेश सोडून इतर प्रदेशांत पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बटाटा होऊ शकतो. हिवाळ्यात जास्त उत्पादन येते. तापमान ३३ अंशांपेक्षा जास्त झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हिवाळ्यात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान लागवड झाल्यास डिसेंबर-जानेवारीतील थंड हवामान बटाटय़ासाठी पोषक ठरते. या पिकाचा कालावधी प्रजातीप्रमाणे ९० ते १२० दिवस असतो.

बटाटय़ाचे देशपातळीवरील संशोधन केंद्र हिमाचल प्रदेशात कुफरी येथे आहे. बटाटा हा सोलानेसी वर्गात असून वांगी, टोमॅटो, धोत्रा या वर्गात मोडतात. बटाटय़ाची लागवड करण्यासाठी शीतकटिबंधातील बटाटे बियाणे म्हणून वापरतात. आपल्याकडील बटाटे बियाणे म्हणून वापरल्यास बटाटय़ाच्या आतमध्ये बांगडीसारखा कुजलेला भाग आढळतो. त्याला बांगडी रोग असे म्हणतात. हे टाळण्यासाठी शीतकटिबंधात तयार झालेले बटाटे वापरले जातात.  बटाटे लहान आकाराचे असल्यास लागवडीसाठी कापायची गरज नसते. मात्र मोठे असल्यास त्याचे साधारण २५ ते ३५ किलोग्रॅमचे तुकडे करावेत. त्यावर एक-दोन डोळे असावेत. बीजप्रक्रियेसाठी गाईचे शेण आणि गोमूत्र एकत्र करून त्यात बटाटे ५-१० मिनिटे बुडवून ठेवावेत. त्यानंतर लागवड करावी. याव्यतिरिक्त ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी १ लिटर पाण्यात ५ ग्रॅम किंवा ५ मिलिलिटर मिसळावी. त्यात बटाटे बुडवावेत आणि नंतरच लावावेत.

बटाटय़ाचे झाड गुडघ्याएवढे उंच होते. त्याची पाने टोमॅटोच्या पानांसारखी दिसतात. साधारण ५०-६० दिवसांनी बटाटे लागण्यास सुरुवात होते. बटाटे मातीच्या वर आल्यास हिरवे होतात, कारण त्यांच्यात विषारी घटक तयार होतात. त्यामुळे बटाटे वर दिसू लागल्यास त्यात मातीची भर घालावी. या झाडांना टोमॅटोच्या फुलांसारखीच फुले येतात. त्यानंतर पाने पिवळी पडू लागतात. या वेळी बटाटे तयार झालेले असतात. पाने पिवळी पडू लागली की पाणी देणे थांबवावे. शक्य झाल्यास झाड कापून टाकावे. ४-५ दिवसांनंतर बटाटे उकरून काढावेत. स्वच्छ करून सावलीत वाळवावेत. नंतर हवेशीर जागी साठवावेत. साठवलेल्या बटाटय़ांना मोड येतात. ते वेळोवेळी काढावेत.